पर्वरीतील पुलाच्या कामाचा बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आढावा

0
5

वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पर्वरीतील नवीन उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यात येत असलेल्या समस्यांचा काल आढावा घेतला. यावेळी मुख्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटदाराला विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

पर्वरीतील नियोजित उड्डाण पुलाच्या कामाला जोरात सुरुवात करण्यात आल्याने मुख्य महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी रस्त्यावर खोदकाम केले जात असल्याने खराब झालेल्या रस्त्याची योग्य दुरुस्ती, खड्डे योग्य पद्धतीने बुजविण्याची सूचना करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रिफ्लेक्टिव्ह मटेरियलसह सूचना फलक उभारण्याची सूचना कंत्राटदाराला करण्यात आली आहे.

पर्वरीतील मुख्य महामार्गावरील वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटदाराला आवश्यक सूचना करण्यात आल्या आहे, अशी माहिती पोलीस वाहतूक विभागाचे अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.

कंत्राटदाराला रस्त्याचे योग्य दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावे, रिफ्लेक्टिव्ह मटेरियलसह फलक उभारणे, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी उपाययोजना आदी सूचना करण्यात आल्या आहेत. कंत्राटदाराने वाहनचालक आणि प्रवाशांना उड्डाण पुलाच्या कामामुळे होणारे त्रास दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना तत्काळ हाती घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले आहे.