>> उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पर्वरी येथील उड्डाण पुलाच्या कामामुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्याबरोबर रुग्णवाहिकेला वाहतूक सुरक्षित मार्ग ठेवण्यासोबतच उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश काल दिले.
पर्वरी येथे मॉल द गोवा ते ओ कोकेरो जंक्शनपर्यंत वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्वरी येथील उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे वाहतूक वळविण्यात आलेली आहे. हा रस्ता पूर्ण खराब असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत आहे.
गोवा खंडपीठात पर्वरी येथील उड्डाण पुलाच्या कामामुळे होणारे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी, खराब रस्ते यासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
पर्यायी रस्ता देणार
वाहतूक, पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते आणि कंत्राटदार यांची येत्या 3 ते 4 दिवसात संयुक्त बैठक घेऊन वाहतूक सुरळीत ठेवून रुग्णवाहिकेला पर्यायी रस्ता देण्यावर विचारविनिमय केला जाणार आहे, अशी माहिती सरकारच्यावतीने न्यायालयाला देण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 12 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.