पर्वरीतील अपघातात दुचाकीचालक ठार

0
6

पर्वरी येथे काल बोलेरो या मालवाहू वाहनाच्या धडकेने एक दुचाकीचालक रस्त्यावर कोसळला आणि त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या अन्य एका वाहनाच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. ब्रिदन विठ्ठल साळगावकर (44, रा. पेडणे) असे मृत दुचाकीचालकाचे नाव आहे. वेगाने वाहन चालवून दुचाकीचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही वाहनचालकांना पर्वरी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 7 वाजता येथील बा. भ. बोरकर मार्गावरून बोलेरोचालक अरुण वासुदेव शानभाग (60, रा. मेरशी) याच्या वाहनाची (क्र. जीए-07-एफ-8495) कोकेरो सर्कलपाशी पल्सर दुचाकीला (क्र. जीए-11-बी-1009) ने जाणाऱ्या धडक दिली असता ब्रिदन साळगावकर हा तोल जाऊन रस्त्यावर पडला. त्याचवेळी अल्ताफभाई अमरेलिया (48, रा. गुजरात) याच्या ट्रक (क्र. जीजे-03-बीवाय-6408) ने रस्त्यावर पडलेल्या ब्रिदन याला ठोकरले. या अपघातात तो जखमी झाला. त्याला गोमेकॉमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून दोषींवर भा. दं. सं. 279, 304(अ) कलमाखाली गुन्हा नोंदवला असून, दोन्ही वाहनचालकांना ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक सीताराम मळीक पुढील तपास करीत आहेत.