पर्रीकरांना पद्मभूषणमुळे राज्यात आनंद

0
143

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल काल राज्यातील कित्येक राजकीय नेत्यांनी आनंद व्यक्त केला. मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याने गोव्याचे नाव मोठे झाल्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या नेत्यांनी व्यक्त केल्या.

केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की कै. मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याने गोव्याबरोबरच भारतभरातील लोकांना आनंद झाला आहे. मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्री म्हणून केलेले कार्य सुपरिचित आहे. गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानं शेट तानावडे म्हणाले की देशाने मनोहर पर्रीकर यांचा मरणोत्तर यथोचित सन्मान केला आहे. पर्रीकर यांनी गोव्यात विकासाची गंगा आणली. गरीब जनतेसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावला. तसेच देशाचे संरक्षण मंत्री बनल्यानंतर तर त्यानी खूप चांगले काम करून तेथे आपली छाप सोडली. वीजमंत्री निलेश काब्राल म्हणाले की मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याने गोव्याचे नाव मोठे झाले आहे. पर्रीकर हे विकास पुरुष होते असे ते म्हणाले.

माजी खासदार नरेंद्र सावईकर म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळणे ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पर्रीकर यांचे कर्तृत्व हे फार मोठे आहे. एवढा मोठा नागरी सन्मान मिळवणारे ते गोव्यातील पहिलेच राजकीय नेते असल्याचे सावईकर म्हणाले. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर म्हणाले की मनोहर पर्रीकर यानी गोव्याचे मुख्यमंत्री असताना तसेच नंतर केंद्रीय संरक्षण मंत्री असताना केलेले काम हे फार मोठे आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मनोहर पर्रीकर यानी आपले संपूर्ण जीवन हे गोव्याच्या विकासासाठी खर्ची घातले. पर्रीकर हे एक हुशार, द्रष्टे नेते होते.

राज्यपाल मलीक यांच्याकडून आनंद

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी राष्ट्र, समाज तसेच गोवा राज्यासाठी उत्कृष्ठ सेवा बजाविल्याबद्दल त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या संदेशात राज्यपाल पुढे म्हणतात स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत गोव्यातील लोकांसाठी अथक योगदान दिले. त्यांनी गोवा राज्यासाठी आणि गोमंतकीयांसाठी दिलेले मौल्यवान योगदान सतत स्मरणात राहणार आहे.