पर्रीकरांनंतरच्या काळात राज्यात सरकारी नोकऱ्यांची विक्री

0
7

गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारांच्या काळात सुमारे 3 ते 5 हजार सरकारी नोकऱ्यांची विक्री झाल्याचा संशय व्यक्त करून गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मध्य प्रदेश राज्यात जसा व्यापम घोटाळा झाला होता तसा हा घोटाळा असल्याचा आरोप केला. आमदार विजय सरदेसाई यांनी दै. नवप्रभाशी बोलताना वरील आरोप करत या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी व तोपर्यंत राज्यातील नोकरभरती पूर्णपणे बंद ठेवली जावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगितले. ह्या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असल्याचे पुढे सरदेसाई म्हणाले.

सरकारी नोकऱ्यांची पैसे घेऊन विक्री करण्यात आल्याने राज्यातील हुशार, गुणी व बुद्धिमान अशा लायक उमेदवारांवर अन्याय झालेला असून त्यांना न्याय मिळण्यासाठी या घोटाळ्याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

ज्या अधिकाऱ्यांना सेवावाढ देण्यात आलेली आहे त्या अधिकाऱ्यांचा अशा घोटाळ्यांसाठी वापर करण्यात येत असल्याचे सरदेसाई म्हणाले. या घोटाळ्यातील एका संशयिताने आत्महत्या केली आहे ही गंभीर बाब असल्याचेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

राजकीय व्यक्तींचे पाठबळ असल्याशिवाय असे घोटाळे होऊच शकत नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. या घोटाळ्याची सविस्तर चौकशी झाल्यास बरेच काही बाहेर येणार असल्याचा दावा यावेळी आमदार सरदेसाई यांनी केला.

सरकारी नोकऱ्यांची विक्री केली जाते. खासगी क्षेत्रातील नोकऱ्या गोमंतकीयांना मिळत नाहीत आणि आता तर सरकारने गोवा लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जात असलेल्या सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षेत असलेली कोकणी विषयाची असलेली सक्तीही काढून टाकली असल्याचे सरदेसाई म्हणाले.
या घोटाळ्याची चौकशी केली नाही तर गोवा फॉरवर्ड पक्ष गप्प बसणार नसल्याचा इशाराही सरदेसाई यांनी दिला आहे.