पर्रीकरांच्या ‘त्या’ विधानाचा कॉंग्रेसकडून निषेध

0
75

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी पणजीतील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांसमोर बोलताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना उद्देशून काढलेले उद्गार हे निषेधार्ह असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे.
दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना कुणीही सामान्य माणसाने फोन केला तरी ते घ्यायचे. कारण ते काहीही काम करीत नसल्याने त्यांना फोन उचलून बोलायला वेळ मिळायचा असे पर्रीकर यांनी काढलेले उद्गार दिगंबर कामत यांचा अपमान करणारे असल्याचे कामत म्हणाले. दिगंबर कामत यांनी सदैव सर्वसामान्य लोकांसाठी काम केले. तसेच सर्वसामान्य कार्यकर्ते व लोकांचा मान राखला असे सांगून अशा नेत्यावर निराधार आरोप केल्यास ते सहन केले जाणार नाही असे कामत यांनी म्हटले आहे.
पर्रीकर यांनी नोकर्‍यांसंबंधी केलेले विधानही निषेध करण्यासारखेच आहे. एका भाजप कार्यकर्त्याला सरकारी नोकरी नाकारण्यात आल्यास अन्य दहा भाजप कार्यकर्त्यांना ती देण्यात आल्याचे पर्रीकर यांनी जे म्हटले आहे त्यासंबंधी आम्हाला असे विचारायचे आहे की सरकारी नोकर्‍या या केवळ भाजप कार्यकर्त्यांनाच देण्यात येत आहेत काय. नोकर्‍यांसाठीच्या मुलाखतीत जे उमेदवार गुणवत्तेद्वारे परीक्षेत उत्तीर्ण होत असतात त्यांचे काय. भाजप कार्यकर्त्यांची मुले असलेल्या उमेदवारांना नोकर्‍यात सामावून घेता यावे यासाठी मुलाखतीच्या निकालात हस्तक्षेप करण्यात येतो काय, असा प्रश्‍नही  कामत यांनी उपस्थित केला.