भाजपकडून भव्य स्वागताची जय्यत तयारी; दाबोळीहून पणजीत मिरवणुकीने येणार केंद्रीय संरक्षण मंत्री होण्याचा मान प्राप्त झालेले मनोहर पर्रीकर यांचे आज गोव्यात आगमन होणार असून भाजपने त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी केली असल्याचे भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आज संध्याकाळी ४ वा. पर्रीकर यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. यावेळी हजारो कार्यकर्ते विमानतळाबाहेर त्यांचे स्वागत करणार आहेत.मनोहर पर्रीकर हे यावेळी विमानतळाबाहेर दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. केवळ पाचच मिनिटे ते यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नंतर कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासह मिरवणुकीने त्यांचे पणजीत आगमन होणार आहे. नंतर संध्याकाळी ५ वा. ते पणजीत भाजप कार्यालयाजवळ उत्तर गोव्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नंतर संध्याकाळी ६.३० वा. संरक्षण मंत्री या नात्याने पणजीतील हॉटेल मांडवीमध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. पर्रीकर यांच्या स्वागतासाठी गोवाभरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने दाबोळी व पणजी येथे हजर रहावे, असे आवाहन विनय तेंडुलकर यांनी यावेळी केले. पर्रीकरांनी घेतला खात्याचा आढावा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल खात्याचा आढावा घेतला. संरक्षण खात्याच्या अंतर्गत विषय, विचाराधीन करार, चालू असलेले प्रकल्प, सिमाविषयक मुद्दे, आदींची माहिती घेतली. काल सकाळी ८.३० वा. ते खात्यात दाखल झाले. तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी त्यांना आपापल्या विभागाबद्दल माहिती दिली. येत्या दिवसांत पर्रीकर प्रत्यक्ष स्थळांना भेटी देणार गोव्यातील दोन्हीही खासदारांना मंत्रिपदे देऊन केंद्रातील भाजप सरकारे गोव्याविषयीचे आपले प्रेम दाखवून दिले असल्याचेही तेंडुलकर यावेळी म्हणाले. श्रीपाद नाईक यांना दिलेली पर्यटन व संस्कृती ही महत्त्वाची व स्वतंत्र ताबा असलेली खाती काढून घेण्यात आली आहेत त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.