केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सादर केलेला पणजी मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा आपण स्वीकारला असून लवकरच यासंबंधीची माहिती राजपत्रात प्रसिद्ध होईल व त्याचबरोबर निवडणूक आयोगालाही कळविले जाईल, असे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
पणजी मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याचे निवडणूक आयुक्तांना कळविल्यानंतर निवडणूक आयुक्त पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करतील. पर्रीकर यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील भाजप आमदारांची संख्या २० बनली आहे तर एकूण सदस्यांची संख्या ३९ झाली आहे.पणजी मतदारसंघ रिक्त झाल्याने राजकीय पक्ष आपापले उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू करतील. पर्रीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आपण पणजी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा सांताक्रुजचे कॉंग्रेस आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी केली आहे. त्यामुळे बाबूश कोणता निर्णय घेतील यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसले तरी सिद्धार्थ कुंकळकर यांच्या नावाची चर्चा चालू आहे. तर कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी असल्याची घोषणा पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केली आहे.