पर्रीकरांकडून बैठकांचा धडाका

0
169

>> कामकाजाला गती देण्याचे अधिकार्‍यांना आदेश

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजारावर उपचार घेऊन अमेरिकेतून परतल्यानंतर सरकारी पातळीवरील कामकाजाला गती देण्यासाठी वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या बैठकांचे सत्र सुरूच ठेवले आहे. सरकारी पातळीवरील कारभाराला गती देण्यासाठी काल त्यांनी अकरा खात्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली.

सरकारी अधिकार्‍यांना ठरावीक वेळेत महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत केल्या. अकरा खात्याच्या अधिकार्‍यांनी आपआपल्या खात्याच्या कामकाजाची माहिती दिली. निर्धारित वेळेत खात्यातील सर्व कामे मार्गी लागतील, अशी माहिती अधिकार्‍यांनी बैठकीत दिली.

सरकारने गुंतवणूक, उद्योग क्षेत्रात वाढ करून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले आहे. गुंतवणूक, उद्योगाच्या वाढीसाठी हाती घेण्यात आलेली कामे वेळेवर मार्गी लागली पाहिजे. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बैठकीत स्पष्ट केले.