पर्ये मतदारसंघात किमान 16 हजार मते मिळणार

0
6

>> आमदार डॉ. दिव्या राणे यांचा दावा

गेल्या दोन वर्षांपासून पर्ये मतदार संघामध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प राबविले. वीज, पाणी, रस्ते सारख्या ज्वलंत समस्या सोडविल्या. येणाऱ्या काळात उर्वरित समस्या सोडविण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना पर्ये मतदार संघातून किमान 16000 मताधिक्य प्राप्त होणार आहे. केलेल्या कामाची मतदार पोचपावती देतील असा विश्वास पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केला.

काल रविवारी संध्या 5 वाजता सार्वजनिक प्रचाराची सांगता झाली. गेल्या दोन महिन्यांपासून पर्येच्या आमदार प्रचारात व्यस्त होत्या. एकूण प्रचारा संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, सार्वजनिक प्रचार संपलेला आहे. भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य प्राप्त होण्यासाठी दोन महिने प्रचारात मग्न होते. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी कोपरा बैठका व जाहीर सभांचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे वैयक्तिक स्तरावर मतदारांशी संपर्क साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार म्हणून मतदारांनी आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते. यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. दोन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लावले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. पर्ये मतदारसंघातील मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या प्रयत्नांना चांगल्या प्रकारचे यश आले आहे. 7 मे रोजी होणारी लोकसभा निवडणूक देशाचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे मतदारांनी आपले पवित्र मत भाजपाला द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आरोग्यमंत्र्यांबरोबर गेले दोन महिने प्रचार
गेले दोन महिने पर्ये मतदारसंघात सातत्याने प्रचार केला. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या मतदारसंघात बराच वेळ खर्च केला. पर्ये मतदारसंघात भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना भरघोस मताधिक्य प्राप्त होणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह विविध ठिकाणी दररोज तीन ते चार कोपरा बैठका घेऊन मतदारांशी संपर्क साधला. मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. प्रत्येक गावांतील मतदारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या असून येणाऱ्या काळात त्या सोडविण्यात येतील. भाजपा देशासाठी का हवा त्याची माहिती प्रचारावेळी आरोग्यमंत्र्यांसह आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचारामुळे दोन महिने अत्यंत व्यस्त होते. विश्रांती न घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यास केलेल्या प्रयत्नांना यश लाभेल असे डॉ. दिव्या राणे म्हणाल्या.