>> वनमंत्री विश्वजीत राणे यांचे सुतोवाच; योजना पूर्णत्वासाठी ५ ते १० वर्षांचा कालावधी लागणार
पर्यावरण पर्यटनासंबंधीच्या एका मोठ्या योजनेचा आपण पाया घालू पाहत असून, खर्या अर्थाने पूर्णपणे ही योजना पूर्णत्वास येण्यास ५ ते १० वर्षांचा काळ लागू शकतो, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या योजनेखाली पहिल्या टप्प्यात अभयारण्यात सहलींचे आयोजन, तसेच तेथे रात्रीच्या निवासाची सोय करणे, यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पर्यावरण पर्यटनविषयक योजनेसाठी सत्तरी तालुक्यातील सुर्ल व काणकोण तालुक्यातील खोतीगाव येथे ‘कॅम्पिंग साईट्स’ची सोय करण्यात येणार असून, या ठिकाणी अत्याधुनिक तंबू उभारण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील अभयारण्यांमध्ये जंगल सफारींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या अभयारण्यांत ‘इको ट्रॅकिंग’चीही सोय करण्यात येणार आहे. म्हादईपासून चोर्ला, दूधसागर, नेत्रावळी अशी इको ट्रॅकिंगसाठीची सोय करण्यात येणार आहे, असेही राणे म्हणाले.
अभयारण्यातील वन्यजीव प्राणी अधिवास महत्त्चाचा असून, वन्य प्राण्यांची संख्या वाढावी, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच अभयारण्य क्षेत्रात पक्षी निरीक्षण केंद्राचीही स्थापना करण्यात येणार आहे. स्थानिक लोकांसह पर्यटकांना अभयारण्यात सहलींसाठी जाण्यास प्रोत्साहित करण्यास येणार असून, त्यासाठी आवश्यक रस्त्यांसह अन्य साधन-सुविधा उभारण्यात येणार आहे, असेही राणेंनी सांगितले. बोंडला येथील प्राणी संग्रहालयाचा खासगी सहभागाने विकास करण्यात येणार आहे. मोरजी आणि गालजीबाग येथील कासव संवर्धन केंद्राचा विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.
पर्यावरण पर्यटनामुळे स्थानिक युवकांना पर्यावरण पर्यटनामुळे रोजगारही प्राप्त होऊ शकेल. वेगवेगळ्या ठिकाणी ‘इको हब’ची स्थापना करण्यात येणार असून, त्यातही युवकांचा सहभाग असेल, असे राणेंनी सांगितले.
केंद्रीय वनमंत्र्यांची सोमवारी भेट घेणार
पर्यावरण पर्यटनाचा प्रस्ताव घेऊन आपण सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय वनमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे विश्वजीत राणे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पर्यावरण पर्यटनासाटी विविध योजना असून, या योजनांचा राज्या सरकारला फायदा मिळणार असल्याचेही ते म्हणाले.