पर्यावरणरक्षण आपले आद्य कर्तव्य

0
256

– म. कृ. पाटील
एकविसाव्या शतकात वैश्‍विक उष्णता हवामानात बदल, बेभरवशाचा नैऋत्य-इशान्य मोसमी पाऊस, बर्फ खंड वितळणे, समुद्राच्या जलस्तरात वाढ, पर्यावरणाचा र्‍हास, निसर्ग सान्निध्यात सेकंड होम, त्सुनामी, ढगफुटी, महत्त्वाच्या शहरात पाणी तुंबणे, रेल्वेचा मेगा ब्लॉक, दरडी कोसळणे, महापुराने जीवीतहानी, नदी-नाल्यांनी दिशा बदलणे ही आणि अशा प्रकारच्या वाक्यांनी दूरदर्शन पटल व वर्तमानपत्रांचे रकाने भरतात. त्यावर अनेक विचारवंत, पत्रकार, समाजसेवक, पर्यावरणप्रेमी, राजकीय नेते यांचे विचारमंथन होत असते. विकसनशील देशाला शाश्‍वत विकासाकडे नेण्यासाठी नियोजन करून त्याचा लेखाजोखा घेण्याचा कल असतो. पण क्षणिक फायद्यासाठी नियोजनाला तिलांजली देत सर्वकाही घडत असते. या सर्वांचा परिणाम मात्र जनतेला भोगावा लागतो.पृथ्वीवरच्या हवामानात झपाट्याने होत असलेल्या व दीर्घकाळ टिकणार्‍या बदलांना हवामान वातावरण बदल असे संबोधले जाते. ध्वनिप्रदूषण, अन्नप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण, प्लॅस्टिकचा कचरा, इ-कचरा या सगळ्या मानवनिर्मित समस्या आहेत. पृथ्वीच्या अंतर्गत भागात नैसर्गिक प्रक्रिया घडत असतात. मानवाचा अतिहव्यास आणि स्वार्थी प्रक्रियांमुळे निसर्गावर, पर्यायाने पर्यावरणावर होणारा विघातक परिणाम या बदलास कारणीभूत असू शकतो. याचा परिणाम मानवाच्या दैनंदिन जीवनावर, कार्यक्षमतेवर सातत्याने होत असतो. शासन, सामान्यजन, समाजातील विविध घटक, स्वायत्य संस्था, उद्योजक, व्यावसायिक, राजकीय नेते यांनी एकत्र येऊन संघटीतपणे प्रदूषण समस्येचा सामना करण्याची आज नितांत गरज आहे. जे काही करावयाचे आहे ते दुसर्‍यांनी करावे ही मानसिकता समाजामध्ये रुजलेली आहे. या मानसिकतेत बदल झाला, तर पर्यावरण समस्या आणि विकास याचा समन्वय होऊन कार्य करणे सोपे होईल.
गेल्या दशकात ‘पर्यावरण’ हा संपूर्ण जगासाठी चर्चा, कार्यशाळा, शिखर परिषदांचा विषय झालेला आहे. पर्यावरणीय शास्त्रज्ञांनी वेळोवेळी धोक्याची सूचना देऊनही पर्यावरण समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वसुंधरादिन, पर्यावरणदिन, वनसंवर्धनदिन, निमशासकीय पातळीवर मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरे केले जातात. एकदा का तो उत्साह ओसरला की पुढच्या वर्षापर्यंत त्याची आठवणसुद्धा होत नाही. त्या दिवसांत भित्तीचित्रे, जाहिराती, वक्तृत्व लेखन, चित्रकला आणि घोेषवाक्य अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. सतत आठ दिवस सदर कार्यक्रमाची बातमी वर्तमानपत्रात झळकत असते. या सर्वांतून समाजप्रबोधन आणि अर्थ (पैसा) खर्च करूनही हेतू सफल होत नाही असे दिसून येते. उलट पर्यावरणाचा र्‍हास न थांबता दिवसेंदिवस भौमितिक पद्धतीने वाढत चालला आहे. या समस्येवर नियोजनबद्ध म्हणजे जंगल नियोजन चिरंतन शाश्‍वत विकास हेच उत्तर आहे. जून-जुलै महिन्यांत वन संचालनालय, कृषी संचालनालय अनेक वृक्ष रोपांचे वितरण करतात. लाखो रोपटी लावली जातात. त्यांपैकी किती रोपटी जगली, वाढली याचा लेखाजोखा घेतला जात नाही. तो लेखाजोखा प्रतिवर्षी घ्यायची तरतूद व्हायला हवी.
समाजातील प्रत्येकाने, स्वत:हून पर्यावरणरक्षण आणि संरक्षण करण्याची गरज आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येकाच्या मनात पर्यावरण संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी. जनताजनार्दन, बालक-पालक-अध्यापक, पर्यावरण तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि राजकीय नेते या सार्‍यांनी एकसंध होऊन कार्य करायला हवे. प्रत्येक गाव, तालुका पातळीवर ‘पर्यावरण दक्षता’ मंच तयार व्हायला हवेत. गाव, शहर, नगरपालिका हद्दीत शासकीय आणि खासगी किती व कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत याची गणना करून ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालयात नोंद व्हायला हवी. शहराचा विकास करताना वृक्षांचा अडथळा होऊ शकतो. त्या वृक्षाला मुळासकट उचलून, दुसर्‍या ठिकाणी लावता येते. प्रत्येक गावात ‘हरितपट्टा’ म्हणजे पूर्वीसारखी वनराई असायला हवी. ही वनराई अथवा हरितपट्टे म्हणजे गावच्या लोकांना प्राणवायू पुरवठा करणारी केंद्रे ठरायला हवीत. पावसाळा आला की एखादे दुसरे झाड लावून पर्यावरण समस्या कमी होणार नाही. औद्योगिक वसाहतीत वृक्ष संपदा असणे अत्यंत गरजेचे आहे. जमिनीवर हिरवळ तयार केली म्हणजे वृक्ष संगोपन आणि संवर्धन होत नाही. पिवळी फळे देणार्‍या वृक्षाची लागवड व्हायला हवी.
भारतीय सण आणि वृक्ष यांची सांगड पूर्वजांनी कित्येक युगाचा विचार करून घातलेली आहे. भारतीय पंचांगातील २७ नक्षत्राचे आराध्य वृक्ष आहेत. त्या त्या नक्षत्रानुसार जन्मकुंडलीत वृक्षदेवता अथवा आराध्य वृक्ष असतो. प्रत्येक नक्षत्राच्या आराध्य वृक्षाचं पूजन करावयास कुंडलीत वर्तविले असते. आराध्य वृक्षाच्या छायेत शांत चित्ताने बसून राहिल्यास नक्षत्र व वृक्ष यांच्या सहकार्याने मनात शांती निर्माण होऊन सकारात्मक विचारांना चालना मिळते. आपल्या देवदैवतांचेही वृक्षांशी अतुट नाते आहे. देवदैवतांचाही देश-प्रथमेश म्हणजे गणेश याला सर्वात प्रिय वनस्पती दुर्वा, अमृताशिवाय २४ वेगवेगळ्या वनस्पतीही प्रिय आहेत.
कोणत्याही परिस्थितीत त्या हरितपट्ट्याचे हस्तांतरण ‘बिगरशेती’ अथवा औद्योगिक वसाहतीमध्ये होता कामा नये. शहरी भागातही असे हरित पट्टे असायला हवेत. हे हरितपट्टे ‘प्राणवायू’ पुरवठा केंद्रे बनली पाहिजेत. राज्यातील आणि शहरी भागातील पर्यावरणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी वैयक्तिकरित्या व सामूहिकपणे प्रयत्न व्हायला हवेत. जीवन सृष्टीचे मूळ घटक पाच आहेत. जमीन, पाणी, वायू, तेज आणि आकाश यालाच पंचमहाभूते असेही संबोधले जाते. या घटकाचा अतिरेकी अनाठायी वापर केला तर त्यांचा समतोल बिघडतो. त्या घटकाबाबत अनभिज्ञता आणि बेपर्वाई दाखवली तर वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत राहणार आहे. याबाबत राष्ट्रपिता महात्मा गांधीनी म्हटले होते, ‘वुई हॅव् इनफ् रिसोर्सेस् फार अवर नीडस् बट् नॉट् फॉर द ग्रीडस्’ पंचमहाभुतांच्या अनाठायी वापरातूनच पुढे असुरक्षितता सातत्याने वाढत जाते. याकरिता वाढत्या जल, जमीन आणि जंगल प्रदूषणाचे धोके, नैसर्गिक आपत्ती आणि असुरक्षितता या सर्वांचा प्रकर्षाने आणि सम्यक विचार होणे गरजेचे आहे. या दूरदृष्टीने शालेय अभ्यासक्रमात ‘पर्यावरण’ या विषयाचा अंतर्भाव इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत करण्यात आला आहे.