गोव्यात पर्यावरणपुरक उद्योग आणण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवित असल्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. वेर्णा येथील औद्योगिक वसाहत येथे पेलॉन गोवा फिलामेंट कंपनीच्या औद्योगिक प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
गोव्याला अधिक रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक विकासाची गरज आहे; परंतु त्याचवेळी या सौदेबाजीत आपल्या पर्यावरणाची हानी होणार नाही हे पाहावे लागेल. त्यामुळे पर्यावरणपूरक उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यावर सरकार भर देत आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.
राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणूकदारांना सोयीस्कर बनविण्यासाठी, व्यावसायिक कार्य सुलभ करण्यास सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
गुदिन्हो यांनी औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी गोव्यातील तरुणांना कौशल्य वाढविण्यावर भर दिला. स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्यात म्हणून बाहेरील राज्यातून मनुष्यबळ वापरण्याची पद्धत कमी करावी लागेल, असेही ते म्हणाले. त्यांनी पेलॉन गोवा फिलामेंट कंपनीला त्यांच्या नवीन प्रयत्नासाठी शुभेच्छा दिल्या.
गोव्यातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छ आणि हरित उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार सातत्याने कठोर प्रयत्न करीत आहे, असे सिक्वेरा म्हणाले.
यावेळी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, पेलॉन गोव्याचे सल्लागार सुदिन नाईक यांचे भाषण झाले. सेराफिन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष फिलिप हेंडल, कामिल ग्र्झलेक, मेघा कपूर, फ्लोरियन किसलिंग, पेलॉन गोवाचे सीईओ बर्नहार्ड सेहमिट, दीपक कुमार व इतर उद्घाटन समारंभास उपस्थित होते.