- ऍड. प्रदीप उमप
डिचोलीमध्ये एक अल्पवयीन मुलगा नशेत आढळल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून नुकताच व्हायरल झाला. देशातील युवा पिढीच नव्हे, तर लहान मुलांमध्येही पर्यायी नशेचे व्यसन ज्या वेगाने पसरत चालले आहे, तो समाज आणि सरकारसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. परंतु वाममार्गाने भरपूर कमाई करण्यासाठी युवा पिढीला व्यसनाच्या दुनियेत ढकलणार्यांच्या समोर कायदा आणि सुव्यवस्था हतबल झालेली दिसते.
नशेच्या परंपरागत स्रोतांच्या विरोधात जागरूकता मोहिमा चालविल्या जातात; पण आजकाल चिंतेची बाब अशी की, पर्यायी नशेचे व्यसन प्रचंड वेगाने वाढू लागले आहे. सामान्यतः व्यसनाच्या संज्ञेत तंबाखू, सिगारेट, बिडी, गुटखा, दारू, भांग, चरस, हेरॉइन अशा पदार्थांचाच समावेश केला जातो. परंतु काही पदार्थ नशेच्या संवर्गामध्ये समाविष्ट केले जात नसतानासुद्धा त्यांच्यात परंपरागत मादक पदार्थांच्या तुलनेत कितीतरी अधिक घातक नशा आहे, हे अनेकांना ठाऊकही नसते. अशी नशा पंक्चर काढण्यासाठी वापरले जाणारे सोल्यूशन, व्हाइटनर, थिनर, कङ्ग सिरप, रंग, आयोडेक्स, ङ्गेविक्विक आणि इंजेक्शनवाटे घेतल्या जाणार्या एव्हिल, ङ्गोर्टबीन, ङ्गेनार्गन, केटामिल आदी पदार्थांमध्ये असते. नशा देणारी ही रसायने आणि औषधे स्वस्तात आणि सहजगत्या दुकानांत उपलब्ध होतात. नशेच्या ओढीने युवा वर्ग कङ्ग सिरपचा वापर दारूसारखा करू लागला आहे. त्यामुळे कङ्ग सिरपला असलेली मागणी वेगाने वाढू लागली आहे. बहुतांश कङ्ग सिरपमध्ये कोर्डिन, सीटीएम, ङ्गेनाइलएङ्गिरिन आदी घटकपदार्थ असतात. हे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन केल्यास नशा चढते. काही युवक नशेसाठी कङ्ग सिरपप्रमाणेच विशिष्ट इंजेक्शनांचाही वापर करीत आहेत.
अशा पर्यायी स्वरूपाच्या नशेच्या आहारी जाणारी मुले आणि युवक सामान्यतः १४ ते ३० वयोगटातील असतात. अशा मुलांचे कंपू चहाच्या टपर्यांवर किंवा वेगवेगळ्या गल्ल्यांच्या नाक्यांवर पाहायला मिळतात. अशा युवकांना जेव्हा नशा करण्याची हुक्की येते तेव्हा त्यांची पावले मेडिकल स्टोअर्सकडे वळतात. जर दुकानात कङ्ग सिरप मिळाले नाही, तर हे युवक इंजेक्शनची चौकशी करतात. चिंता करायला लावणारी बाब अशी की, एव्हिल नावाचे इंजेक्शन औषधांच्या दुकानांत अवघ्या तीन रुपयांत सहजगत्या विकत मिळते. वास्तविक, कोणत्याही प्रकारचे औषध मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकाच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकायचे नाही, असा सरकारी नियम आहे. मग ते खोकल्याचे औषध असो वा अन्य कोणतेही औषध असो. परंतु नफ्याच्या हव्यासापोटी काही दुकानदार अशा प्रकारे औषधांची विक्री मोठ्या प्रमाणावर करतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या औषधांच्या अनधिकृत वापरावर निर्बंध आणण्यासाठी युवकांनाच प्रशिक्षित केले जाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपण आपल्या आयुष्याशी खेळ करीत आहोत, हेही न समजण्याच्या वयात मुले या नशेच्या आहारी जाऊ लागली आहेत. स्टेशनरीच्या दुकानांमध्ये व्हाइटनरची विक्री करण्यावर बंदी नाही. त्यामुळे तोही सहजगत्या उपलब्ध होतो. ज्या कंपन्या व्हाइटनर तयार करतात, त्यांच्याकडे त्याचे पेटेन्ट असतात. व्हाइटनर विकण्यासाठी कोणत्याही प्रकारचा परवाना आवश्यक नसतो. व्हाइटनर हे पॉलिव्हिनाइल क्लोराइडचे (पीव्हीसी) एक संयुग आहे. पीव्हीसी पाण्यात विरघळू शकत नाही. ते विरघळविण्यासाठी अल्कोहोलयुक्त द्रवपदार्थ गरजेचा असतो. त्यामुळेच व्हाइटनरसारख्या पदार्थांचा वापर नशेसाठी केला जातो.
अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर व्हाइटनर तयार करणार्या कंपन्यांनी व्हाइटनर थिनरचे मिश्रण तयार करून उच्च सुरक्षा असलेल्या पॅकिंगमध्ये विक्री करीत असल्याचा दावा केला होता. परंतु आजही हा पदार्थ सहजपणे उपलब्ध होतो, हे वास्तव आहे. आयोडेक्स खाऊन नशा करण्याची प्रवृत्तीही वाढताना दिसत आहे. सामान्य परंपरागत नशेच्या तुलनेत कितीतरी अधिक घातक असणारे हे नशेचे पर्यायी पदार्थ किशोरवयीन आणि युवकांना आपल्या जाळ्यात ओढू लागले आहेत; कारण हे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत.
अल्कोहोलयुक्त द्रवपदार्थ आणि रसायने रक्ताभिसरण संस्थेवर थेट हल्ला चढवितात. अशा स्थितीत कमी वयाची व्यक्ती कोमामध्येही जाऊ शकते. श्वासाद्वारे केल्या जाणार्या नशेमुळे श्वसनक्रियेवर विपरित परिणाम होतो. रासायनिक प्रभावामुळे अंतर्गत जखमा होऊ शकतात. या प्रकारच्या नशांमुळे आमाशय आणि यकृत यांसारख्या अवयवांवर गंभीर दुष्परिणाम होतात आणि कर्करोगासारखे दुर्धर आजारही डोके वर काढू शकतात. डेंडराइट आणि व्हाइटनरचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास थेट मेंदूवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्या शुष्क पडू लागतात आणि विचार करण्याची शक्ती मंदावत जाते. त्याचप्रमाणे, ङ्गोर्टबीन इंजेक्शन आणि कोर्डिनयुक्त कङ्ग सिरप यांचे सातत्याने सेवन केल्यास बुद्धिभ्रम, स्मरणशक्तीचा र्हास, यकृताच्या समस्या आणि पोट तसेच छातीत वेदना यांसारख्या समस्या निर्माण होतात. नशेचे हे पर्यायी स्रोत मानसिक संतुलनही बिघडविणारे असतात. मेंदूच्या पेशी ही रसायने नष्ट करून टाकतात. एखादा मुलगा अशा प्रकारच्या नशेत अडकलेला आहे की नाही, याची शहानिशा कशी करायची, हा खरे तर मोठा प्रश्न आहे. परंतु काही मुद्दे लक्षात घेतले तर नशेच्या सुरुवातीच्या काळातच अशा व्यसनात मुले गुरङ्गटली आहेत का, याचा छडा लावता येेतो. मुलांच्या पॉकेट मनीच्या मागणीत अचानक झालेली वाढ, घरातून वस्तू नाहिशा होऊ लागणे, मुलांना कामात रस वाटेनासा होणे, जास्तीत जास्त वेळ मुले घराबाहेरच राहणे, खेळण्यात रस नसणे, मुले अंतर्मुख बनणे, घरातल्या व्यक्तींविषयी ती उदासीन बनणे, एकाच ठिकाणी अधिक वेळ बसून राहणे, स्वभावात चिडचिडेपणा आणि आक्रमकता वाढणे, अशी काही लक्षणे नशेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुलांमध्ये दिसतात. याखेरीज मुलांच्या शरीरावर, दंडावर इंजेक्शनची ताजी चिन्हे किंवा सूज दिसणे, अधिक काळ डोळे लाल किंवा मलूल दिसणे, घराच्या बेडरूममध्ये किंवा बाथरूममध्ये इंजेक्शनच्या रिकाम्या सिरिंज किंवा कङ्ग सिरपची रिकामी बाटली आढळणे, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होणे, मुलांनी उधारी किंवा चोरी करणे अशी लक्षणे दिसताच पालकांनी कान टवकारले पाहिजेत.
ही लक्षणे पालकांना अप्रत्यक्षपणे असे सांगतात की, आता आपल्या पाल्याला नशेने अशा टप्प्यावर आणून ठेवले आहे, जिथून पुढे मादक पदार्थांच्या सेवनाची इच्छा कोणत्याही थराला जाऊ शकते आणि प्रसंगी गुन्हा करण्यासही मुले मागेपुढे पाहणार नाहीत. अशा पर्यायी नशेच्या बाबतीत महिलाही मागे नाहीत, हे एक अस्वस्थ करणारे वास्तव आहे. महिलांमध्ये अशा प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दिसू लागले आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात तणाव, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवनातील पेच किंवा घटस्ङ्गोट आदी कारणांमुळे महिलांमध्ये नशेची सवय वाढू शकते. मुले आणि युवकांमध्ये पर्यायी नशेचे व्यसन ज्या वेगाने वाढत आहे, तो समाज आणि सरकारसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. परंतु वाममार्गाने भरपूर कमाई करण्यासाठी युवा पिढीला व्यसनाच्या दुनियेत ढकलणार्यांच्या समोर कायदा आणि सुव्यवस्था हतबल झालेली दिसते. पर्यायी नशेच्या विरोधात सरकार आणि समाज दोहोंनी एक व्यापक मोहीम चालविणे गरजेचे आहे. नशेच्या पदार्थांचा पुरवठा करणार्यांवर कडक कारवाईही झाली पाहिजे. तरच आपण उगवत्या पिढीला घातक अशा या पर्यायी नशेच्या चक्रव्यूहापासून दूर ठेवू शकू आणि एका निरोगी समाजाची पायाभरणी आपल्याला करता येईल.