पर्यटन खात्याने एसओपी जाहीर न केल्याने राज्यात हॉटेल्स बंदच

0
191

पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी राज्यातील हॉटेल काल गुरुवार २ जुलैपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. तथापि, पर्यटन खात्याने हॉटेल सुरू करण्याबाबत एसओपी जाहीर न केल्याने हॉटेल सुरू होऊ शकली नाहीत. दरम्यान, पर्यटन खात्याकडून हॉटेलसाठी एसओपी जाहीर केल्यानंतर हॉटेल सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांनी दिली.

पर्यटन खात्याकडे २६० हॉटेल मालकांनी हॉटेल सुरू करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. राज्यातील हॉटेल सुरू करण्यासाठी खास शिष्टाचार प्रक्रिया तयार केली जात आहे. या एसओपीनुसार हॉटेल मालकांना अनेक अटीचे पालन करावे लागणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जास्त पर्यटक येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे जास्त हॉटेल मालक आपला हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास आत्ता इच्छुक नाहीत. मालकांना कर्मचारी व इतर समस्या आहेत.

राज्यातील तारांकित हॉटेल मालकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज केलेले नाहीत. एक, दोन, तीन स्टार हॉटेल व लहान हॉटेल व्यावसायिकांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
पर्यटन खात्याने हॉटेल सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर लगेच हॉटेल सुरू करणे शक्य होणार नाही. हॉटेलचे कर्मचारी, सॅनिटायझेशन आदी काम करावे लागणार आहे. ह्या कामासाठी कमीत कमी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागेल अशी माहिती हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी दिली. परराज्यातून व्यावसायिक व इतर विविध कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना राहण्यासाठी हॉटेल सुरू होण्याची गरज आहे. राज्य सरकारने हॉटेल सुरू केल्यानंतर बार ऍण्ड रेस्टॉरंट सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी धोंड यांनी केली.
दरम्यान, काल उशिरा पर्यटन खात्याकडून हॉटेल्स सुरू करण्यासाठी एसओपी जारी करून हॉटेल्स सुरू करण्यास मान्यता दिली आहे.