राज्यात जलक्रीडा बोटींना पर्यटन खात्याचा ना हरकत दाखला (एनओसी) बंधनकारक करण्यात आला आहे. जलक्रीडा बोटींसाठी खास मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.
हल्लीच कळंगुट येथे समुद्रकिनाऱ्यावर एका जलक्रीडा बोटीला झालेल्या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता, तर अनेक पर्यटक जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर जलक्रीडा बोटींना पर्यटन खात्याचा ना हरकत दाखला बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या बंदर कप्तान खात्याकडून जलक्रीडा बोटींना परवाना दिला जातो. जलक्रीडा बोटीसाठी पर्यटन खात्याकडून ना हरकत दाखला घेतलेला नसेल, तर यापुढे बंदर कप्तान खात्याकडून परवाना दिला जाणार नाही, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.
पर्यटन खात्याने क्रूझ बोटीवर गोमंतकीय संगीत, कला व खाद्य संस्कृती उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यटन खात्याने क्रूझ बोटमालकांना क्रूझवर गोमंतकीय संगीत, कला व खाद्य संस्कृती उपलब्ध करण्याचा आदेश दिला आहे, असेही खंवटे यांनी सांगितले. सोशल मीडियावर काही जणांकडून गोव्यातील पर्यटनाबाबत चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. या पर्यटक हंगामात गोव्यात पर्यटकांची संख्या बरीच वाढली आहे, असा दावाही त्यांनी केला.