उद्योजकता आणि मराठी माणूस यांचे नाते नाही आणि मराठी माणसाने फक्त दुसऱ्याची नोकरीच करायची, ह्या सार्वत्रिक समजाला छेद देत आपल्या कर्तृत्वाने उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये उंच उंच भराऱ्या घेणाऱ्या मराठमोळ्या उद्योजकांमधले एक सन्माननीय नाव, जगप्रसिद्ध ‘केसरी टूर्स’चे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचे नुकतेच वयाच्या नव्वदीत निधन झाले. ‘पर्यटनक्षेत्राचे विद्यापीठ’ असा लौकिक असणाऱ्या केसरी पाटील यांनी केवळ आपली ‘केसरी टूर्स’ही कंपनीच मोठी आणि जागतिक दर्जाची केली असे नाही, तर एकूणच जागतिक पर्यटनक्षेत्रामध्ये भारतीय कर्तबगारीचा ठसा उमटवला. ह्या क्षेत्रात उतरणाऱ्या नव्या पिढीसाठी तर ते दीपस्तंभच होते. बंधू राजा पाटील यांच्या ‘राजाराणी ट्रॅव्हल्स’ मध्ये आयुष्याची उमेदीची दशके सहल संयोजक म्हणून घालवल्यानंतर जेव्हा तेथून बाहेर पडण्याचा अकल्पित प्रसंग आला, तेव्हा नैराश्याच्या खाईत जाण्याऐवजी नव्या उमेदीने स्वतःच्या हिंमतीवर त्यांनी पुनश्च हरि ओम् केले. खरे तर त्यांनी त्यावेळी वयाची पन्नाशी गाठली होती. दुसरे कोणी असते, तर निवृत्ती पत्करून हरि हरि करत बसले असते, परंतु केसरीभाऊ डगमगले नाहीत. त्यांनी नव्याने सुरूवात केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या काळी आजच्यासारखी ‘पर्यटन’ ही संकल्पना रुजलेली नव्हती. मध्यमवर्गीयांत तर नव्हतीच नव्हती. त्याच्याकडे आजच्यासारखा तेव्हा पैसाही खुळखुळत नसायचा. त्यामुळे केसरीभाऊंनी नव्याने सुरूवात करताना 1984 साली माहीमच्या एका चाळीत पत्नी सुनितासह दहा बाय दहाच्या खोलीत कार्यालय थाटून आणि केवळ एक टायपिस्ट नेमून राजस्थानची सहल जाहीर केली. ह्या त्यांच्या पहिल्या सहलीसाठी पर्यटक नोंदणी झाली अवघ्या तेराजणांची. पण ‘एक समाधानी पर्यटक शंभर नवे पर्यटक मिळवून देईल’ ह्यावर ठाम विश्वास असणाऱ्या केसरीभाऊंच्या गाठीशी एकवीस वर्षांचा सहल संयोजनाचा अनुभव मात्र होता. त्याच्या बळावर त्या पर्यटकांना त्या सहलीत केसरीभाऊंनी एवढे समाधान मिळवून दिले की पुढच्या काश्मीरच्या सहलीला केवळ तोंडी प्रसिद्धीतून 39 पर्यटकांनी नावे नोंदवली. त्या पहिल्या वर्षी कंपनीची उलाढाल होती जेमतेम दीड लाखाची. ते पैसे तर कर्ज फेडण्यातच गेले. परंतु लवकरच त्यांची विशीतली मुले वीणा आणि शैलेश त्यांना येऊन मिळाली आणि मग ‘केसरी टूर्स’ने कधी मागे वळून पाहिले नाही. सातत्याने पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास कमावला आणि व्यवसाय वाढवत नेला. आज ‘केसरी टूर्स’च्या देशविदेशात शाखा आहेत. देशविदेशात कुठे ना कुठे त्यांच्या सहली सुरू असतात आणि पाचशे कर्मचारी कार्यालयांतून, तर आणखी चारपाचशे सहल संयोजक पर्यटकांसमवेत केसरीचा झेंडा जगभरात फडकवत असतात. काश्मीरपासून लंडनपर्यंत त्यांची कार्यालये आहेत. महिलांसाठी ‘माय फेअर लेडी’, ज्येष्ठांसाठी ‘सेकंड इनिंग्ज’, मुलांसाठी ‘फंटूश’, नवविवाहितांसाठी ‘हनिमुन स्पेशल’, स्वैर भटकंती करू पाहणाऱ्यांसाठी ‘स्ट्रॉबेरी हॉलिडेज’ अशा नवनव्या संकल्पना ‘केसरी’ ने यशस्वी केल्या. गेली चाळीस वर्षे ‘केसरी’ पहिल्या क्रमांकाची जगविख्यात पर्यटनसंस्था बनली आहे ती उगीच नव्हे. केसरीभाऊंची दूरदृष्टीच दीपस्तंभ बनून ह्या प्रवासाची योग्य दिशा दाखवत राहिली. 2013 साली 18 जूनला ह्या वाटचालीत एक मोठे वादळ आले. कन्या वीणा संस्थेतून बाहेर पडल्या आणि पती सुधीर पाटील व सुनिला हिमांशू पाटीलसह त्यांनी ‘वीणा वर्ल्ड’ या नावाने आपले वेगळे विश्व उभारले. कांदिवलीत त्यांनी आपले पहिले कार्यालय सुरू केले आणि दीड महिन्यांत मुंबईत सहा शाखा उभारण्याची घोषणा करून नवी झेप घेतली. येथे केवळ कंपनी फुटली नव्हती. परिवार फुटला होता. मराठी माणसाला हा दूहीचा शाप आहेच. बाळासाहेबांच्या शिवसेनेतून राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले, तेव्हा मराठी माणसाला जेवढे दुःख झाले होते, तेवढेच वीणा पाटील वेगळ्या झाल्या, तेव्हा झाल्यावाचून राहिले नाही. योगायोग म्हणजे वीणा पाटील यांनी आपल्या कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्तेच केले. आज केसरी आणि वीणा वर्ल्ड ह्या दोन्हीही पर्यटन संस्था आपला आब, प्रतिष्ठा राखून यशस्वी वाटचाल करीत आहेत, त्याचा पाया अर्थातच आहे केसरीभाऊंनी घालून दिलेला मूल्यांचा आदर्श. त्यांचे बंधू राजा पाटील यांनीही 62 साली मोठ्या हिंमतीने रेल्वेतली नोकरी सोडून स्वतःची पर्यटनसंस्था उभारली होती. दूरदृष्टीने, धडाडीने ती नावारूपाला आणली होती. केसरीभाऊंनीही त्यांचाच कित्ता गिरवला आणि आज त्यांची मुले, सुना, नातवंडे सगळे मिळून ‘केसरी’ आणि ‘वीणा वर्ल्ड’द्वारे तोच आदर्श पुढे नेत आहेत. केसरी पाटील हे जणू पर्यटन व्यवसायाचे विद्यापीठच आहे असे वर म्हटले ते उगीच नव्हे!