पर्यटनाभिमुख राज्य म्हणून जगात ओळख असलेल्या गोव्यामध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच एका शॅकमध्ये पर्यटकाची निर्घृण हत्या होते ही घटना धक्कादायक आहे. पर्यटकांशी गैरवर्तनाच्या असंख्य घटना गोव्यात सातत्याने घडत असतात. शॅक्स आणि हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांकडून येथे सुटी घालवण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीय पर्यटकांवर दांडगाई चालते. अन्य प्रांतांतून येणाऱ्या ह्याच पर्यटकांमुळे आपले पोट चालते ह्याचाही ह्या धटिंगणांना अशावेळी विसर पडतो. वादावादी, बाचाबाची, मारामारी हे प्रकार तर नित्याचे आहेतच, परंतु एखाद्याचा जीव जाईपर्यंत त्याच्यावर प्राणघातक हल्ला होणे ही घटना तर गोव्यासाठी अतिशय लांच्छनास्पद आहे. परंतु दरवर्षी गोव्याच्या आतिथ्यशील संस्कृतीला धक्का पोहोचवणाऱ्या अशा घटना घडतात आणि गोव्याची आत्यंतिक बदनामी होते. आधीच गोव्याकडे येणारा पर्यटकांचा ओघ अन्यत्र वळू लागलेला गेल्या काही वर्षांत दिसतो आहे. विशेषतः कौटुंबिक पर्यटकांनी तर गोव्याकडे कधीच पाठ फिरवली आहे. गोव्याऐवजी शेजारच्या कोंकण आणि केरळकडे त्यांची पावले वळली आहेत. विदेशी पर्यटक गोव्यात मोठ्या प्रमाणावर येतात, परंतु स्थानिक अर्थव्यवस्थेला त्याचा काडीचाही फायदा नसतो. त्यामुळे विदेशी पर्यटकांच्या डॉलरसाठी लाळ घोटणारे गोव्यातील पर्यटन व्यावसायिक जरी देशी पर्यटकांकडे तुच्छतेच्या नजरेतून पाहत असले, तरी त्यांना खरा व्यवसाय हे देशी पर्यटकच देत असतात हे त्यांना समजायला हवे. ज्यांचे पोटच पर्यटन व्यवसायावर चालते त्यांनी तरी त्यांच्याशी किमान सभ्यतेने वागायला हवे. पर्यटकांकडूनही अनेकदा गैरवर्तन होत असते हेही नाकारण्यात काही अर्थ नाही. विशेषतः रेन्ट अ कार किंवा रेन्ट अ बाईक घेऊन भटकणारी पर्यटकांची जी टोळकी असतात ती येथे केवळ खा, प्या, मजा करा ह्याच उद्देशाने आलेली असतात. कॉर्पोरेट जगतातील नोकऱ्यांतून हाती खुळखुळणारा पैसा आणि महानगरांतून आल्याची ऐट ह्या थाटात गोव्यात धुमाकूळ घालायला येणाऱ्या ह्या पर्यटकांची वेगळीच तऱ्हा असते. परंतु जशा पर्यटकांनी गोव्यात आल्यावर सभ्यतेच्या मर्यादा पाळायला हव्यात, तशाच गोमंतकीयांनी देखील आपल्याकडून या पाहुण्यांशी विनाकारण गैरवर्तन तर होत नाही ना ह्याचे भान ठेवायलाच हवे. विशेषतः पर्यटन व्यावसायिकांनी तर आपल्या पाहुण्यांशी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. शॅक्स ही गोव्यात नववर्षासाठी येणाऱ्या पर्यटकांचा वाढता ताण लक्षात घेऊन त्यांना जेवण्याखाण्याची सोय पुरवण्यासाठी पुरवली जाणारी तात्पुरती हंगामी सोय आहे. परंतु अनेकांनी गोव्याच्या किनारपट्टीवर कायमस्वरूपी बस्तान ठोकले आहे. शेवटी न्यायालयीन आदेशानंतर काही शॅक्सची बारमाही बांधकामे पाडलीही गेली होती, परंतु पुन्हा जैसे थे स्थिती दिसते आहे. पर्यटकाची हत्या झालेल्या शॅकचा परवाना आता पर्यटन खात्याने निलंबित केला आहे. कळंगुट भागात पर्यटकांची सतावणूक करणाऱ्या दलालांविरुद्ध नुकतीच धडक कारवाईही झाली. परंतु अशा प्रकारच्या दलालांचा सर्वत्र सुळसुळाट आहे. गोव्याच्या हद्दीत पर्यटकांची वाहने प्रवेशली की त्यांचा ह्या दलालांकडून पाठलाग सुरू होतो. ही टोळधाड पाहून गांगरलेले पर्यटक मग त्यांच्या फशी पडतात. पर्यटक म्हणजे जणू सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून तिला कापण्याची अहमहमिकाच लागते. हॉटेलांतील, शॅक्समधील खाद्यपदार्थांच्या दरांवर सरकारचे काही नियंत्रण आहे की नाही? एकीकडे पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांकडून चाललेली लुटालूट, दुसरीकडे किनारपट्टी भागातील शॅक्स आणि अन्य व्यावसायिकांकडून चाललेली लुटालूट ह्या सगळ्या अनुभवामुळे येथे येणारे पर्यटक अत्यंत कटू अनुभव घेऊन परत जाताना दिसतात. अनेकदा समाजमाध्यमांतून त्यांचे हे कटू अनुभव व्यक्त होतात आणि गोव्याची प्रतिमा मलीन होते. मुळात पर्यटन व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांना पर्यटकांशी कसे वागावे, त्यांना कसे हाताळावे ह्याचे समुपदेशन गरजेचे आहे. पर्यटकांकडून अरेरावी होत असेल तर त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेले पोलीस दल आहे. शॅक्स आणि बारमालकांनी कायदा हाती घेण्याची गरजच नाही. एखाद्या पर्यटक गटाकडून गैरवर्तन होत असेल तर ते पोलिसांना पाचारण करू शकतात. परंतु क्षुल्लक कारणावरून पर्यटकांशी होणारी बाचाबाची, मारामारी, हिंसक हल्ले हे प्रकार सरकारने मुळीच खपवून घेऊ नयेत. अशा प्रत्येक घटनेतील संबंधितांविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे. मग मध्यस्थी करायला आलेल्या राजकारण्यांनाही चार हात दूर ठेवावे. तरच गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला शिस्त लागेल आणि गोव्याची अकारण चाललेली बदनामी थांबेल.