पर्यटक संख्या दीड कोटींवर नेण्याची सरकारची योजना

0
98

गोव्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या पुढील दोन वर्षांत दीड कोटींवर नेण्याची सरकारची योजना असून त्यासाठी आवश्यक ती साधनसुविधा उभारण्याचे काम सुरू आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या सध्या ५० ते ६० लाख एवढी आहे. मात्र, पुढील दोन वर्षांत तो दीड कोटीं होणार असल्याचे सुतोवाच काल त्यांनी केले. मोठ्या संख्येने येणार्‍या देशी पर्यटकांमुळे राज्यातील साधनसुविधेवर ताण येत आहे काय, असे पत्रकारांनी विचारले असता त्यानी वरील माहिती दिली.

राज्यात सहापदरी व चार पदरी महामार्ग तयार करण्यात येत आहेत. तसेच पणजीतील मांडवी नदीवर तिसरा पूल उभारण्यात येत आहे. तर जुवारी नदीवर दुसरा पूल बांधण्यात येत आहे. हे महामार्ग व पुल उभे झाल्यानंतर मोठी सोय होणार आहे. हे महामार्ग व पुल उभे झाल्यानंतर मोठी सोय होणार आहे. किनारपट्टीवरही साधन सुविधा उभारण्यात येत आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले. आपण जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलो तेव्हा राज्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या कमी होती. आपण उचललेल्या पावलांमुळे ती वाढली. २०१२ साली जेव्हा आपण मुख्यमंत्री बनलो तेव्हा राज्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या २५-२६ लाखांच्या आसपास होती. आता ती संख्या ५० ते ६० लाखांवर पोचली असल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले. पुढील दोन वर्षांच्या काळात हीच संख्या दीड कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी कुणालाही बियर पिऊ नका असे म्हटले नव्हते
आपण केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले की मी कुणालाही बियर पिऊ नका असा सल्ला दिला नव्हता किंवा त्याविषयी भीतीही व्यक्त केली नव्हती. त्याविषयी आपण फक्त चिंता व्यक्त केली होती. चिंता व्यक्त करणे यात काहीही गैर नसल्याचे ते म्हणाले.

सरदेसाईंच्या वक्तव्याचा विपर्यास : मुख्यमंत्री
विजय सरदेसाई यांनी पर्यटकांविषयी जे उद्गार काढले त्याचा एक तर विपर्यास करण्यात आला असावा अथवा सरदेसाई यांनी आपणाला जे म्हणायचे होते ते योग्य प्रकारे मांडले नसावे, असे पर्रीकर यांना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले. सरदेसाई यांनी केलेले विधान हे चिथावणी देणारेही नव्हते असे पर्रीकर यानी स्पष्ट केले.