पर्यटकांना लुबाडणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई

0
14

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा; ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठ मैदानावर ६२ वा गोवा मुक्तीदिन साजरा

राज्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य दिले जाणार असून, पर्यटकांना त्रास देणार्‍यांची यापुढे गय केली जाणार नाही. पर्यटकांना त्रास देणार्‍या आणि लुबाडणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित ६२ व्या राज्यस्तरीय गोवा मुक्तीदिन सोहळ्यात बोलताना दिला.

यावेळी गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम, ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरकारच्या विविध खात्यांचे सचिव, वरिष्ठ सरकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जागतिक पातळीवर गोव्याची प्रतिमा उंचावण्याची गरज आहे. राज्यात पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांकडून विमान, वाहतूक आणि हॉटेल्सपर्यंत जादा शुल्क आकारून गैरफायदा घेतला जात आहे. राज्य सरकार असे प्रकार खपवून घेणार नाही. टॅक्सीमालक आणि चालकांचा बेशिस्त कारभार सहन करणार केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात पर्यटकाभिमुख वातावरण आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व संबंधितांनी योगदान देण्याची गरज आहे. राज्यात पर्यटकांना उत्तम वाहतूक सुविधा देण्यासाठी टॅक्सी व्यावसायिक, टूर ऑपरेटर यांचे सहकार्य आवश्यक आहे. पर्यटनाभिमुख पायाभूत सुविधा उच्चस्तरीय पर्यटकांना गोव्यात आकर्षित करू शकतात, ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गोव्याचा देशात पहिला क्रमांक लागतो. राज्यातील बेरोजगारी दर कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. युवा वर्गाला स्वयंरोजगारासाठी कौशल्य शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. महिला सक्षमीकरणावरही भर दिला जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील खाण उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार गांभीर्याने काम करीत आहे. लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा, शिक्षण आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गोव्याला एक आदर्श राज्य म्हणून आकार देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘स्वयंपूर्ण गोवा २.०’ मध्ये शेती व इतर स्वयंव्यवसायांत लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावीपणे काम केले जात आहे. राज्यात शेतीला चालना देण्यासाठी माती वाचवा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तत्त्वांनुसार उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुक्तीलढ्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार
गोव्याच्या मुक्तीलढ्याच्या इतिहासाला अत्यंत महत्त्व असून, इतिहास जतन करण्यासाठी आणि मुक्तीलढ्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माहिती खात्याने पिंटोचा बंड, राणेंचा बंड आणि कुंकळ्ळीच्या चिफटेन उठावावर प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून मुक्तीदिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीदिनानिमित्त गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या. गोवा मुक्तीलढ्यात सहभागी सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करीत आहोत. आम्ही गोव्याच्या विकासासाठी काम करीत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील गोवा मुक्तीदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. गोवा मुक्तीसाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन, असे राष्ट्रपतींनी ट्विट संदेशात म्हटले आहे.