>> 500 पर्यटकांची बोगस हॉटेल बुकिंगच्या नावाखाली फसवणूक; ग्वाल्हेर आणि हैद्राबादच्या चौघा भामट्यांना अटक
सुमारे 500 पर्यटकांची हॉटेल बुकिंगच्या नावाखाली फसवणूक करून कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या एका टोळीला पकडण्यात हणजूण व कळंगुट पोलिसांना यश आले आहे. ही टोळी बोगस म्हणजे गोव्यात अस्तित्त्वातच नसलेल्या हॉटेलच्या खोल्यांचे बुकिंग करून पर्यटकांना गंडा घालत होती. या टोळीने बोगस ऑनलाईन हॉटेल बुकिंगचा धंदा जोरात चालवला होता. अटक केलेल्या भामट्यांची नावे सौरभ दुसेजा, सईद मुख्तार, महम्मद फिरोज व महम्मद अजउद्दीन सैफ अशी आहेत. यापैकी सौरभ हा ग्वाल्हेरचा, तर अन्य सर्व जण हे हैद्राबादचे आहेत.
गोव्यात स्वत:चे एकही हॉटेल अथवा लॉज नसलेल्या या टोळक्याने इंटरनेटच्या माध्यमातून हॉटेलच्या खोल्यांची बुकिंग सेवा सुरू केली होती. गोव्यात अस्तित्त्वातच नसलेल्या बोगस हॉटेलची छायाचित्रे हे टोळके इंटरनेटवर टाकत असत. हॉटेलच्या आलिशान इमारतींची व खोल्यांची, तसेच स्वीमिंग पूल आदींची छायाचित्रे इंटरनेटवर टाकून पर्यटकांना ते आकर्षित करीत होते. तसेच मोठी सवलत देणारी पॅकेज जाहीर करीत असत. त्यामुळे पर्यटक त्यांच्याकडे मोठ्या संख्येने हॉटेलचे बुकिंग करीत होते. अशा एकूण 500 पर्यटकांची फसवणूक या टोळीने केली असल्याचे उघड झाले आहे.
ही टोळी लेेज्ञळपस.उेा या वेबसाईटच्या माध्यमातून हॉटेल बुकिंगच्या नावाखाली पैसे घेत होती. आगाऊ बुकिंग करून नंतर पर्यटनासाठी गोव्यात आल्यानंतर या टोळक्याकडे बुकिंग केलेल्या पर्यटकांना आपण फसवले गेल्याचे कळून चुकल्याने अशा पर्यटकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर टोळीच्या मुसक्या आवळल्या.
वेबसाईट कुठची?
लेेज्ञळपस.उेा ह्या वेबसाईटचा वापर टोळीकडून होत होता. संशयितांनी ह्या वेबसाईटवर हॉटेल्सची आकर्षक छायाचित्रे टाकून त्याच्या बुकिंगसाठी पर्यटकांना आकर्षित केले होते.
पहिली तक्रार चंदीगडमधील पर्यटकाची
या प्रकरणी सर्वप्रथम पंकज धिमानी या चंदीगड येथून आलेल्या पर्यटकाने तक्रार नोंदवली होती. त्याच्याकडून हॉटेल बुकिंगसाठी ह्या टोळीने 20 हजार रुपये घेतले होते. या घटनेनंतर अन्य शेकडो पर्यटकांनी गोव्यात आणि अन्य राज्यांत देखील यासंबंधी तक्रारी नोंदवल्या.
आरोपींचे गोव्यात दुकाने व व्यवसाय
अटक केलेल्या आरोपींपैकी काहींची गोव्यात दुकाने व इतर व्यवसायही आहेत. त्यापैकी काही जणांवर चोरीचे गुन्हेही नोंद झालेले आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.
टोळी 2022 पासून सक्रिय
ही टोळी गेल्या तीन वर्षांपासून म्हणजेच 2022 सालापासून राज्यात सक्रिय होती. गोव्यात येऊन येथील पर्यटन व पर्यटकांच्या आवडीनिवडी याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी हा बोगस धंदा सुरू केला होता.