पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची विधानसभेत माहिती
पर्यटन मुद्द्यांवरून विधानसभेत खडाजंगी
राज्यात येणाऱ्या पर्यटकांची माहिती गोळा करण्यासाठी 1 एप्रिल 2025 पासून सर्व हॉटेल्स, गेस्ट हाउस इत्यादींसाठी पर्यटक माहिती व्यवस्थापन यंत्रणा अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच, जास्त खर्च करणाऱ्या पर्यटकांसाठी एअरलाइन प्रोत्साहन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सभागृहात दिली.
राज्य विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना विरोधी आमदारांनी विदेश दौरे, प्रश्नांना अपुरी उत्तरे या मुद्यांवरून घेरले. विरोधी गटातील आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी याच मुद्यावरून सभापतींच्या आसना समोरील हौदात धाव घेऊन प्रश्नांना योग्य उत्तरे देण्याची मागणी लावून धरली.
आमदार विरेश बोरकर यांनी उच्च दर्जाच्या पर्यटकांना आकर्षित करण्याबाबत पर्यटक योजनेबाबत प्रश्न विचारला होता. त्यात मागील तीन वर्षांतील विदेशी पर्यटकांची माहिती मागितली होती. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिलेल्या उत्तराने आमदार बोरकर यांचे समाधान झाले नाही. केंद्र सरकारकडून विदेशी पर्यटकांची मागील तीन वर्षांतील माहिती प्राप्त झाली नाही. विधानसभेच्या पुढील अधिवेशनामध्ये विदेशी पर्यटकांबाबत माहिती दिली जाईल, असे उत्तर पर्यटन मंत्री खंवटे यांनी दिले.
राज्यात येणाऱ्या पर्यटकांची माहिती गोळा करण्यासाठी 1 एप्रिल 2025 पासून सर्व हॉटेल्स, गेस्ट हाउस इत्यादींसाठी पर्यटक माहिती व्यवस्थापन यंत्रणा अनिवार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री खंवटे यांनी दिली.
राज्यात मागील ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत गोव्यातील पर्यटनाबाबत सोशल मिडियावर अपप्रचार करण्यात येत होता. तथापि, गोव्यात पर्यटकांची संख्या कमी नव्हती. सर्व हॉटेल्सचे बुकिंग 100 टक्के होते. गोव्यात येणारी विमाने सुध्दा फुल्ल होती. सुमारे 22 टक्के पर्यटकांमध्ये वाढ झाली. राज्यात रशियन, युकेमधील पर्यटकांबरोबरच इतर विदेशी देशातील पर्यटकांची संख्या वाढत आहे. पोलंडमधून 26 विमानांतून पर्यटक आले आहेत. उझ्बेकिस्तान, कझाकिस्तान या देशात गोव्यातील पर्यटनाबाबत प्रसिद्धी केली जात आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री खंवटे यांनी दिली.
राज्यात येणाऱ्या पर्यटकांची नोंद ठेवण्यासाठी वेब आधारित यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. त्यामुळे दररोज हॉटेल्स, गेस्ट हाउस व इतर पर्यटक निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची माहिती गोळा करण्यास मदत होणार आहे, असेही पर्यटन मंत्री खंवटे यांनी सांगितले.
जास्त खर्च करणाऱ्या पर्यटकांसाठी एअरलाइन प्रोत्साहन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. थेट उड्डाण कनेक्टिव्हिटी, ई-व्हिसा सुधारणा इत्यादी उपाययोजनांवर सरकार विचार करत असल्याची माहिती पर्यटन मंत्री खंवटे यांनी दिली.पर्यटन खात्याकडून वारसा, संस्कृतीबाबत माहिती दिली जात आहे. राज्यात वर्षभर होणाऱ्या विविध उत्सवांचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. शिगमो, कार्निव्हल या उत्सवांबरोबर सांजाव, चिखलकाला यांना चालना दिली जात आहे. पर्यटन खात्याच्या उत्सवामध्ये वीरभद्रचा समावेश करण्यावर विचार केला जात आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.
पर्यटन मंत्र्यांवर
प्रश्नांचा भडिमार
परदेश दौऱ्यांवर कोट्यवधी खर्च तसेच प्रश्नांना उत्तरे देताना अपुरी माहिती सादर केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून भंडावून सोडले.
2019 ते 2023 दरम्यानच्या काळात पर्यटन खात्याने सरकारी निधीतून 40 कोटी रुपये परदेश दौऱ्यांवर खर्च केल्याचे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले. पर्यटन खात्याने आयोजित केलेले परदेश दौरे गोव्यासाठी खरोखर फायदेशीर आहेत की केवळ पैशांचा अपव्यय आहे, असा प्रश्न आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी उपस्थित केला.
पर्यटन मंत्र्यांचे ओएसडीच्या विदेश दौऱ्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ओएसडीच्या विदेश दौऱ्याच्या बिलांना अजूनपर्यंत काही कारणास्तव मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पर्यटन खात्याचा खर्च ओएसडीच्या विदेश दौऱ्याच्या बिलाच्या रक्कमेचा समावेश करण्यात आलेला नाही, असे पर्यटन मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे प्रदर्शन आणि स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. संबंधित एजन्सींना ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीमध्ये पॅनेल केले जाते, ज्या योग्य निविदा प्रक्रियेद्वारे परदेशी सहलींसाठी नियुक्त केल्या जातात, असे पर्यटन मंत्री खंवटे यांनी सांगितले.
खंवटे व बोरकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक
आमदार बोरकर यांनी पर्यटन खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केल्यानंतर मंत्री खंवटे आणि आमदार बोरकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली. सभापती रमेश तवडकर यांनी हस्तक्षेप करून सभागृहात शिस्तीचे पालन करण्याची सूचना केली. आमदारांनी अचूक प्रश्न विचारावा. त्यांना समर्पक उत्तरे मिळतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात नाहीत. राज्य सरकारकडून कॅसिनोला प्रोत्साहन दिले जात आहे, अशी टीका आमदार बोरकर यांनी केली.