पर्यटकांची ऑनलाईन फसवणूक; तीन टोळ्यांतील 5 जणांना अटक

0
4

>> उत्तर गोवा पोलिसांची कारवाई; दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगालमधून संशयित अटकेत

डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर गोवा पोलिसांनी कारवाई करत तीन ऑनलाईन टोळ्यांचा पर्दाफाश केला. जलक्रीडासफरी, होमस्टे बुकिंगच्या नावे पर्यटकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी उत्तर गोवा पोलिसांनी दिल्ली, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधून 5 जणांना अटक केली आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी काल दिली.

गेल्या जानेवारीमध्ये, ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे बनावट हॉटेल खोल्या विकून पर्यटकांची फसवणूक करणारी आंतरराज्य सायबर क्राइम टोळीचा उत्तर गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला होता, तेव्हापासून पोलिसांनी तत्सम ऑनलाईन फसवणूक प्रकरणांचा तत्परतेने तपास करण्यास सुरुवात केली होती.
उत्तर गोवा पोलिसांना तीन प्रमुख ऑनलाईन घोटाळ्यांचे नेटवर्क यशस्वीपणे उद्ध्वस्त केले आहे. या टोळ्या सक्रियपणे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून गोव्यातील पर्यटकांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होते, त्यांचा विश्वास संपादून आर्थिक फसवणूक करत होते, अशी माहिती अक्षत कौशल यांनी दिली.

जलक्रीडासफरी तिकिट घोटाळा
राज्यातील जलक्रीडासफरी तिकिट घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. मयंक जैन, हरिश जैन (रा. शादीपूर, दिल्ली) आणि शशांक वर्मा (बुडौन, दिल्ली) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. गोव्यातील जलक्रीडासफरी उपक्रमांची बनावट तिकिटे ऑनलाईन विकल्याच्या अनेक तक्रार पर्यटकांनी 1930 या पोर्टल आणि ऑनलाईन पद्धतीने केल्या होत्या. या प्रकरणी पर्वरी आणि पणजी पोलीस स्थानकात बनावट जलक्रीडासफरी तिकीट फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

होमस्टे घोटाळा
राज्यातील गोवा होमस्टे घोटाळा प्रकरणामध्ये कर्नाटकातून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिलीप कुमार विश्वकर्मा (40, रा. बिदर कर्नाटक) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ऑनलाईन माध्यमातून होम स्टे बुक करणाऱ्या पीडितांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कळंगुट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयिताने अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेवर निवासाचे आश्वासन देऊन आगाऊ पैसे घेतले. पेमेंट झाल्यावर त्याने पीडितांचे नंबर ब्लॉक केले. विश्वकर्मा याच्याविरोधात देशभरात अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती अक्षत कौशल यांनी दिली.

सेक्स टॉय विक्री घोटाळा
सेक्स टॉय विक्री घोटाळ्यात पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शुभेंधू कुमार दास (37, रा. कोलकाता) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयित आरोपीकडून ई-कॉमर्स वेबसाईटवर सेक्स टॉय विकण्याच्या बहाण्याने गोव्यातील पर्यटकांची फसवणूक केली जात होती.