पर्पल महोत्सव ही दिव्यांगांसाठी चळवळ ः राज्यपाल

0
2

आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाचा शानदार समारोप

21 राजदूतांचा सन्मान, चार दिवस विविध कार्यक्रम संपन्न

पर्पल महोत्सव हा केवळ एका उत्सवापेक्षा जास्त आहे. ही दिव्यांगासांठी चालवलेली एक चळवळ आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मदतीचे लाभार्थी म्हणून नव्हे तर अधिकारी असल्याचा विश्वास दर्शवते असे सांगून राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव 2025 च्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल श्री. राजू बोलत होते.
यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि भारतातील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती व पदाधिकारी उपस्थित होते.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभाग आणि गोवा सरकारच्या अपंग व्यक्तींसाठी राज्य आयुक्त कार्यालयाने आयोजित केलेल्या या महोत्सवात भारत आणि जगभरातील मान्यवर, प्रतिनिधी आणि कलाकार सहभागी झाले होते.

सन्माननीय पाहुणे केरळचे राज्यपाल श्री. आर्लेकर यांनी, पर्पल महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नाही, तो सक्षमीकरण आणि समानतेचा संदेश असून असे उत्सव दिव्यांग व्यक्तींमधील लपलेली प्रतिभा आणि ऊर्जेला बाहेर काढत असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, पर्पल महोत्सव हा सक्षमीकरण, समानता आणि संधीची चळवळ बनला आहे. या महोत्सवातून उपजीविकेच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. नवोपक्रमाला प्रेरणा दिली आहे आणि ‘पर्पल इकॉनॉमी’ला जन्म दिला आहे असे सांगून विद्यार्थ्यांपासून उद्योजकांपर्यंत प्रत्येक सहभागीने मानसिकता बदलण्यात आणि क्षमता साजरी करण्यात भूमिका बजावली असल्याचे स्पष्ट केले.

अनेकविध कार्यक्रम
गेल्या चार दिवसांत, महोत्सवात कार्यशाळा, सांस्कृतिक सादरीकरण आणि संवादी चर्चासत्रांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागींनी अर्थपूर्ण चर्चा केली, प्रेरणादायी अनुभव सादर केले.
समाजकल्याण मंत्री श्री. फळदेसाई यांनी, आम्हा सर्वांना गोव्याचा अभिमान, आपल्या लोकांचा अभिमान आणि या अथक पर्पल चळवळीचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

21 ॲम्बेसिडरचा सन्मान
सांगता समारंभात 21 पर्पल ॲम्बेसेडरचा सत्कार आणि पर्पल न्यूजलेटरच्या अनावरणातून उत्कृष्ट कामगिरीची ओळख करून देण्यात आली. या उत्सवात विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कला सादर केली. डिसॅबिलिटी अलायन्स, व्हिक्टरी आर्ट्स फाउंडेशन, बासुरी अँड ब्लिस, मिरॅकल ऑन व्हील्स, 7 नोट्स, मानसी घोष आणि पर्पल रेन कॉन्सर्ट यांनी मनमोहक सादरीकरण केले.
राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गावकर यांनी दिव्यंगत्व विकासाचे उपक्रम शहरी भागाच्या पलीकडे नेण्याची गरज अशल्याचे सांगत टाटा स्टील फाउंडेशनचे आभार मानले.