॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥
– प्रा. रमेश सप्रे
आपलं असंच नसतं का? ग्रंथ वाचतो, प्रवचन-कीर्तनांना जातो, तीर्थक्षेत्रांच्या वार्या करतो, जपतपव्रतं क्वचित यज्ञयागही करतो. पण जे सांगितलं जातं त्यानुसार वागत मात्र नाही. संतांना याचं खूप वाईट वाटतं. समर्थ रामदास म्हणूनच म्हणतात…
… घरी कामधेनू पुढे ताक मागे ॥
… उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे |
एका गावात एक साधू येऊन वडाच्या झाडाखाली राहिला होता. तीन महिने झाले. लोकांना तो शांत, प्रसन्नचित्त साधू देवमाणूस वाटू लागला. अनेकजण आपल्या कौटुंबिक अडचणी घेऊन त्याच्याकडे जाऊ लागले. तोही अंतःप्रेरणेनं मार्ग सुचवून त्यांना चिंतामुक्त करू लागला. हे सारं पाहून एक युवक त्या साधूजवळ जाऊन म्हणाला, ‘साधु महाराज, मी आपल्याला कधी काहीही देवाचं करताना पाहिलं नाही. ना जप-तप, ना व्रत-वैकल्य, ना नमस्कार-प्रदक्षिणा, ना वाचन-पारायण, ना देवदर्शन वा मंदिरभेटी… तरीही आपण सदा शांतप्रसन्न कसे असता?’ त्याच्या या प्रश्नावर छान हसून साधू म्हणाला, ‘बेटा, त्याचं असं आहे. मी एकच साधना करतो. जिथं असतो, तिथं असतो अन् जे करतो, ते करतो.’ असं म्हणून तो ध्यानस्थ बसणार इतक्यात तो युवक म्हणाला, ‘तुम्ही म्हणालात ते निरर्थक आहे. तसे सर्वचजण जिथं असतात, तिथं असतात नि जे करतात, ते करतात.’ साधू त्याची पाठ थोपटत म्हणाला, ‘बेटा, घरी जा. आणि उद्या याच वेळी परत ये. पण स्वतःकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवून बघ… तू असतोस तिथं असतोस का? अन् जे करतोस, ते करतोस का?’ ‘ठीक आहे’, म्हणत तो युवक घरी आला.
अंघोळ करण्यासाठी स्नानगृहात गेला. स्नान करताना त्याच्या छातीत धस्स झालं. ‘बाप रे, किती काम राहिलंय आपलं. फाइलींचा नुसता ढीग साचलाय टेबलावर.’ लगेच त्यानं स्वतःला फटकारलं. ‘अरे, मी स्नानगृहात आहे की ऑफिसमध्ये? नि आत्ता अंघोळ करतोय की फाइली पाहतोय? … स्नान उरकून देवासमोर मनात विचार – दोन दिवसांनी असलेल्या इन्स्पेक्शनचे. कारखान्याची पाहणी करून वृत्तांत तयार करायचा होता.’ प्रार्थना करताना स्वतःशीच बोलला, ‘आत्ता मी देवघरात आहे की कारखान्यात? आणि प्रार्थना करताना मनात वृत्तांत लिहिण्याचा विचार कशाला? छे, काही खरं नाही आपलं!’
देवघरातून तडक जेवायला आला. गेल्यावर्षी इन्स्पेक्टरनं पुढच्या वर्षी सुधारण्यासाठी म्हणून काही सूचना केल्या होत्या. यावर्षी तो त्याप्रमाणे काम चाललंय की नाही हे नक्की पाहणार. आपण सारं नीट तपासायला हवं. यांत्रिकपणे जेवताना पाहून आई त्याला विचारते, ‘तुझी आवडती भाजी केलीय, बाबू. आवडली ना? लक्ष कुठंय तुझं?’ यावर चमकून त्यानं म्हटलं, ‘आँ! मेथीची भाजी केलीस होय. लक्षातच आलं नाही माझ्या.’ त्याक्षणी तो ऑफिसातला बाबू होता. कारकून! पुढे झोपेच्या वेळीही तो मनानं शयनकक्षात कुठं होता?
दुसरे दिवशी संध्याकाळी साधूकडे गेला. साधूच म्हणाला, ‘बेटा, कसा आहेस?’ डोळ्यात पाणी आणून तो युवक म्हणाला, ‘साधुमहाराज, मी एक काम करताना दुसर्या कामाचा विचार करत होतो नि एका ठिकाणी असताना मनानं दुसर्याच ठिकाणी होतो.’
‘हेच तुझ्या अस्वस्थतेचं, बेचैनीचं, अशांतीचं खरं कारण आहे. तू वर्तमानकाळात जगतच नाहीस. चालू क्षण उपभोगत नाहीस. ‘आत्ता’ कधी साजरा करत नाहीस.’
किती खरे आहेत साधूचे उद्गार! आपण सारेजण असंच वागत असतो ज्यावेळी किंवा ज्याप्रसंगी आपण समोर असलेला क्षण जगत असतो तेव्हा आनंदात असतो. आपली मनःशांती ढळण्याचं प्रमुख कारण भूतकाळातल्या आठवणी नि भविष्यकाळातल्या चिंता आपल्याला त्रास देतात. आपला वर्तमानकाळ अशा प्रकारे आपला आपणच नासवतो.
यासाठी अनेक सत्पुरुषांनी स्वतः जगून सांगितलेलं असतं. पण हे सांगतात ते हेही सांगायला विसरत नाहीत की ‘आम्ही जगतो-वागतो तसे वागू नका तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे वागा’. पू. गोंदवलेकर महाराजांचं सांगणं मार्मिक आहे. ‘खरा साधू तर योग्य ते सांगेलच. पण भोंदू साधूसुद्धा आपण खोटे आहोत हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून योग्य तेच सांगेल.’ त्याप्रमाणे वागणं आपल्या हिताचंच असेल.
या संदर्भात एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. एक शिक्षक विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन गेला होता. मार्गावर एका संतांचं समाधिमंदिर होतं. मंदिरात गेल्यावर समाधीचं दर्शन घेऊन झाल्यावर मंडपात सारे विसावले. भिंतीवर अनेक साधुसत्पुरुषांच्या प्रतिमा टांगल्या होत्या. त्या पाहताना एका चौकस विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला, ‘गुरुजी, विडी-सिगरेट ओढणं (धूम्रपान करणं) वाईट असतं ना? मग या साधूंच्या हातात चिलीम कशी? त्यात तंबाखू घालूनच ती ओढतात ना?’ सगळ्या मुलांचं लक्ष आता गुरुजी काय उत्तर देतात याकडे होतं. शांतपणे हसून गुरुजी म्हणाले, ‘चांगला आहे तुझा प्रश्न. पण याचं उत्तर या साधुमहाराजांच्या चरित्रात मिळतं. एक आहेत तुकाई महाराज. पू. गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरु. त्यांच्या हातातली चिलीम कायम रिकामीच असे. तोंडासमोर धरून ‘जय गुरू’ म्हटलं की त्यातून धूर निघत असे. तसंच या श्रीगजानन महाराजांच्या हातातही चिलीम आहे. ती पेटवण्यासाठी बाहेरून काडी पेटवून धरावी लागत नसे. आतल्या योगाग्नीने ते ती पेटवीत असत. तुम्हाला आज सार्या गोष्टी कळणार नाहीत. तुम्ही हेच लक्षात ठेवा की धूम्रपान हे जीवघेणंच असतं. या कोणत्याही साधुसंतांनी ‘धुम्रपान करा’ म्हणून सांगितलं नाही. त्यांनी स्वच्छ सुंदर जीवनाचाच उपदेश केला.
मनःशांतीसाठी, आपल्या भल्यासाठी साधुसंतांचा उपदेश महत्त्वाचा असतो. त्यांच्या सार्या सवयी आपल्यासाठी नसतात. लो. टिळकांना सुपारी खाण्याची सवय होती. अग्रलेखाचं चिंतन करताना कधी कधी ते सुपारीचं खांड (तुकडा) तोंडात टाकत असत. म्हणून काही त्यांच्या या सवयीचं अनुकरण करून त्यांच्यासारखे केसरीतले अग्रलेख लिहिता येणार नाहीत. असं म्हटलं जातं, ‘लोकमान्य टिळकांचा अडकित्ता (सुपारी कातरण्यासाठी लागतो तो) गिरवू नका. त्यांचा कित्ता गिरवा. म्हणजे त्यांची देशभक्ती, निर्भयता, स्वाभिमान यांचं अनुकरण करा कारण त्यांच्या लेखनातून, व्याख्यानातून सिंहासारखं गर्जून ते हेच सांगतात. लोकमान्य ‘केसरी’ वर्तमानपत्र फक्त चालवत नव्हते, तर ते स्वतःच केसरी (सिंह) होते.
याचा अर्थ ऊठसूठ जो कोणी भगवे किंवा पांढरे कपडे घालून येईल अन् जे सांगेल ते मनःशांतीसाठी योग्यच असेल असं नाही. ते सांगणारा सत्पुरुष हवा. निरपेक्षपणे लोकांचं हित साधण्यासाठी उपदेश करणारा हवा. ‘आधी केले मग सांगितले’ हे सत्पुरुषाचं लक्षण आहे. जे जे काही तो करतो-सांगतो त्यात मानवाचं हितच असतं. कल्याणाचा मार्ग असतो.
नुसतं वाचन, श्रवण नको. त्यावर नुसतं मनन-चिंतनही पुरेसं नसतं. याविषयी एक विचार करण्यासारखा प्रसंग संतांच्या प्रवचनात सांगितला जातो.
एक तरुण नशीब काढण्यासाठी शहरात येतो. गावाकडे म्हातारी आई व धाकटी बहीण असते. वडील गेल्यामुळे कुटुंब त्यालाच चालवायचं असतं. आईचे औषधोपचार व बहिणीचं शिक्षण यासाठी पैसे तो पाठवत असे. पण ते पुरेसे नसत. एकदा आई खूपच आजारी पडली नि बहिणीचीसुद्धा फी थकल्यामुळे तिला शाळेतून काढण्यापर्यंत पाळी आली. त्याला पत्रं लिहिली पण पैसे काही आले नाहीत. गावाकडून एक माणूस शहरात गेला असताना त्याला भेटला. ‘पत्रं मिळाली ना?’ असं विचारल्यावर डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, ‘असे आत या.’ देवघरात नेऊन देव्हार्यात ठेवून हळदकुंकू फूल वाहिलेली ती पत्र दाखवून गदगदल्या स्वरात म्हणाला, ‘पूज्य आईकडून आलेली, प्रिय बहिणीनं लिहिलेली ही पत्रं पहा. मला देवापेक्षाही पवित्र वाटतात. मी रोज त्यांची पूजा करतो.’ हे ऐकून तो भेटायला गेलेला सद्गृहस्थ म्हणाला, ‘मूर्खा, पत्रांची पूजा काय करतोस? ती वाचून त्याप्रमाणे वागून (आईला पैसे पाठवून) फाडून टाकली असतीस तरी चाललं असतं.’
त्या मुलाला आपली चूक कळाली. त्यानं पैसे देऊन त्या गावकर्याला सांगितलं, ‘मी लवकरच येऊन भेटीन. हे पैसे त्यांना द्या अन् काळजी घ्या म्हणून सांगा.’
आपलं असंच नसतं का? ग्रंथ वाचतो, प्रवचन-कीर्तनांना जातो, तीर्थक्षेत्रांच्या वार्या करतो, जपतपव्रतं क्वचित यज्ञयागही करतो. पण जे सांगितलं जातं त्यानुसार वागत मात्र नाही. संतांना याचं खूप वाईट वाटतं. समर्थ रामदास म्हणूनच म्हणतात…
… घरी कामधेनू पुढे ताक मागे ॥
… उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे |
तया अंतरी सर्वदा तेचि आहे॥
करीं सार चिंतामणी, काचखंडे |
तया मागता देत आहे उदंडे ॥
रामदासांसारख्या संतांनी माणसाची नाडी बरोबर ओळखलेली असते. सारं काही जवळ, नव्हे आतच, असूनही एखाद्या भणंग भिकार्यासारखा सुखशांतीची भीक मागत दारोदार फिरत असतो. या आश्रमातून त्या आश्रमातून; या मठाकडून त्या मठाकडे; या साधूकडून त्या महाराजांकडे सारखा वणवण फिरत असतो. आपली भक्तीची मंदिरं, आराधनेचे देव, उपासनेची स्तोत्रं-मंत्र-ग्रंथ सारखे बदलत राहतो पण मनःशांती काही लाभत नाही. कशी लाभणार? कारण वणवण, भ्रमंती ही बाहेरून बाहेर, या दिशेकडून त्या दिशेला अशीच चालू असते.
एका ठिकाणी स्थिर होऊन, स्तब्ध बसून विचार केला तर कळेल शांतीचा स्रोत, आनंदाचा उगमच नव्हे तर आनंदाचा सागर आपल्या आतच उसळतोय.
कल्पवृक्ष आतच बहरलाय. पण नको त्या नकारात्मक कल्पना थांबवायला नको का? कामधेनू आतच उभी आहे. पण सार्या अनावश्यक, सतत वाढणार्या कामना (इच्छा) आवरायला नकोत का?
चिंतामणी आतच चकाकतोय, पण नको त्या चिंता सोडून योग्य ते चिंतन करायला नको का? परीस (पारसमणी) सुद्धा आतच आहे. पण संतांच्या उपदेशाचं पालन करून जीवनाचं सोनं करायचं का मिडास राजासारखी जीवनाची शोकांतिका करून घ्यायची?
मिडास राजानं देवाला प्रसन्न करून मागितलं, ‘देवा मी हात लावीन त्याचं सोनं बनू दे.’ सार्या वस्तू सोन्याच्या होतात इथपर्यंत ठीक होतं. पण हातात घेतलेल्या अन्नाच्या घासाचं किंवा पाण्याच्या घोटाचं जर सोनं बनू लागलं तर हाल नाही का होणार? अन्न असून सारं वैभव असून उपासमार! कळस तेव्हा होतो जेव्हा धावत आलेल्या आपल्या छोट्या मुलीला तो हातानं धरून उचलतो तेव्हा तीही सोन्याची बनते. सोन्यासारखी मुलगी सोन्याची बनल्यावर मिडास राजाला पश्चात्ताप होतो. देवाला दिलेला वर परत घ्यायला सांगतो.
आपण असे मिडास आहोत का? विचार केल्यावर आतून उत्तर ‘हो’च येईल. सोन्यासारखा नरजन्म, सोन्यासारखा नरदेह (विशेषतः मेंदू), सोन्यासारख्या जीवनातल्या संधी मिळूनही जीवन सोन्याचं म्हणजे सत्ता – पैसा – उपभोग यांनी गच्च भरलेलं बनवण्याच्या नादात सोन्यासारखी नव्हे अमृतासारखी मनःशांती तर गमावत बसत नाही ना? याचा खरंच स्वतःच स्वतःसाठी विचार केला पाहिजे. हाच खरा ‘स्वाध्याय’ आहे जो कधीही चुकवू नकोस. (स्वाध्यायान् मा प्रमदः|) अशी ऋषींची वाणी आहे. पण संत याहून अधिक जिव्हाळ्यानं आपल्या कानामनात कुजबुजतात, नव्हे हितगूज करतात – ‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥ नवा दिवस सुरू झाल्यावर सर्वप्रथम ध्यान-चिंतन-मानसपूजन कर. नामस्मरण कर. दिवसाची सुरुवात अमृतमयी बनव. मन शांत प्रसन्न कर. मग दिवस (व जीवन) सोन्याचं होतं की नाही ते बघ. यासाठी ज्ञानोबा माऊलीची वाणी किती गोड आहे नाही?
‘सोनियाचा दीस आजि अमृतें पाहिला (पहाटला).’ बघू या याप्रमाणं वागून … जगून!