राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने दहावीची परीक्षा घेऊन धोका पत्करू नये. तर, दहावीची परीक्षा रद्द करून शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्याने परीक्षेला योग्य पर्याय शोधून काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत काल केली.
यावेळी मगोपचे ज्येष्ठ नेते, आमदार सुदिन ढवळीकर, कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यालये सुरू करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मग, दहावीच्या परीक्षा घेऊन मार्गदर्शक सूचनेचा भंग केला जात आहे, असा दावा श्री. कामत यांनी केला. राज्य सरकारला दोन-तीन दिवसांपूर्वी एक पत्र पाठवून दहावीच्या परीक्षेला पर्याय शोधून काढण्याची विनंती केली आहे. पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनी दहावीच्या परीक्षेला पर्याय शोधून काढल्याचा दावा कामत यांनी केला. दहावीच्या परीक्षेला १८ हजार विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेच्या वेळी मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे ? असा प्रश्न यावेळी श्री. कामत यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारने गोमंतकीयांकडून आकारण्यात येणारे २ हजार रुपये कोविड चाचणी शुल्क व क्वारंटाईऩ शुल्क आकारू नये, अशी मागणी कामत यांनी केली.
आपल्या गावी परत जाण्यासाठी रस्त्यावरून फिरणार्या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी विलंब होत असल्यास त्यांना कामगार निवासात केंद्रात ठेवावे, अशी मागणी कामत यांनी केली.
पणजीत मजुरांची निदर्शने
पणजी परिसरात अडकून पडलेल्या परराज्यातील शेकडो मजुरांनी परत पाठविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांना गावी परत पाठविण्याची मागणी काल केली.
सरकारी आणि पोलीस अधिकार्यांनी निदर्शने करणार्या मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या मजुरांना परत पाठविण्याबाबतचे अर्ज भरून देण्याची सूचना करण्यात आल्यानंतर मजुरांनी निदर्शने बंद करून अर्ज भरून देण्यास सुरूवात केली.
गोवा फॉरवर्डची सरकारवर टीका
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम बनले असून राज्यात गडद होत चाललेल्या कोरोना आपत्तीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. आतापर्यंत राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाडीतच कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याने ती रेल्वेगाडी आता गोव्यात थांबणार नाही व निजामुद्दीन एक्सप्रेस या रेल्वेगाडीत एकही रुग्ण सापडला नसल्याने ती गाडी गोव्यात थांबेल असे मुक्यमंत्र्यांनी कलेले वक्तव्य धक्कादायक असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. रेल्वे कुठली हे महत्त्वाचे नाही तर ती कुठून येते हे महत्त्वाचे आहे. दोन्ही रेल्वे या नवी दिल्लीतून येत आहेत आणि नवी दिल्लीत कोरोनाचे भरपूर रुग्ण आहेत हे समजून घेतले पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले.