परीक्षा ‘नीट’ घ्या

0
19

वैद्यकीय व दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठीच्या ‘नीट’ ह्या प्रवेश परीक्षेसंदर्भात यंदा जो काही सावळागोंधळ चालला आहे तो अतिशय संतापजनक आणि ह्या अशा प्रकारच्या केंद्रीय प्रवेश परीक्षांआड दडलेल्या प्रचंड प्रमाणातील शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक दर्शवणारा आहे. यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत 1563 मुलांना वाढीव गुण दिले गेले होते, ते काल सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले आणि ह्या मुलांना येत्या 23 जूनला फेरपरीक्षा देण्याचा पर्याय दिला आहे. यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत जो काही गोंधळ ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घातला तो खरोखर चीड आणणारा आहे. यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत तब्बल 67 विद्यार्थी 720 पैकी 720 गुण मिळवून ‘पहिले’ आले. त्यातील सहा विद्यार्थी हरियाणातील फरिदाबादच्या एकाच केंद्रावरचे होते. ह्या ऑनलाइन परीक्षेत विज्ञानविषयक 180 प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. प्रत्येक योग्य उत्तराला चार गुण असतात, तर एका चुकीच्या उत्तरामागे एक गुण कापला जातो. त्यामुळे सर्वच्या सर्व 180 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाराच 720 गुण मिळवू शकतो. 180 पैकी 179 प्रश्नांची उत्तरे बरोबर आली व एक उत्तर चुकले तर एकूण गुण 179 गुणिले 4 वजा 1 मिळून 715 होतात. शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिलेलेच नसेल तर हे गुण 179 गुणिले 4 मिळून 716 होतात. पण ह्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना 718 आणि 719 गुण मिळाल्याचे आढळले, जे गणितीय दृष्टीने अशक्यप्राय आहे. मग हे गुण कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित केला गेला तेव्हा एनटीएने सांगितले की आम्ही काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स म्हणजे वाढीव गुण दिले आहेत. हे गुण का दिले गेले तर त्याचे कारण सांगितले गेले की एनसीईआरटीच्या जुन्या पुस्तकात चुकीचे उत्तर होते व नव्या पुस्तकात ती चूक सुधारण्यात आली आहे, त्यामुळे दोन्ही पुस्तकांतील उत्तर बरोबर गृहित धरून काहींना वाढीव गुण दिले गेले. वाढीव गुण देण्यामागचे दुसरे कारण सांगितले गेले की काही परीक्षा केंद्रांत प्रश्नपत्रिका द्यायला विलंब झाल्याने हे सर्वोच्च न्यायालयाच्या 2018 मधील एका निवाड्यानुसार हे वाढीव गुण दिले गेले. पण ह्या वाढीव गुणांचा परिणाम असा झाला की जेथे दरवर्षी एखाद दुसरा विद्यार्थीच ह्या परीक्षेत 720 पैकी 720 गुण प्राप्त करू शकतो, तेथे यंदा तब्बल 64 विद्यार्थी पहिले आले आणि दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाल्याने ज्यांची उत्तरे चुकलेली होती, त्यांनादेखील वाढीव गुणांची ही खिरापत मिळून त्यांची गुणसंख्या प्रचंड वाढली. निकालातील ह्या सावळागोंधळावर टीका होणार ह्याची जाणीव एनटीएलाही असावी, कारण ह्या परीक्षेचा निकाल आधी घोषित केलेल्या तारखेपेक्षा दहा दिवस आधी व अगदी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याच दिवशी जाहीर केला गेला. संपूर्ण देश लोकसभा निकालांच्या धामधुमीत असल्याने ह्या निकालातील सावळागोंधळ नजरेस येऊ नये यासाठीच ही धूर्त चाल खेळली गेली हे उघड आहे. यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय येण्यास आणखी एक कारण ठरले आहे ते म्हणजे बिहारमध्ये एक टोळी पकडली गेली, ज्यांच्याकडे ह्या परीक्षेची प्रवेशपत्रे आणि पुढची तारीख घातलेले धनादेश सापडले. त्यामुळे ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपये उकळून फोडण्यात आल्या होत्या अशा संशयास जागा राहिली. हे सगळेच उद्वेगजनक आहे. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करून जेईई आणि नीटसारख्या महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षांसाठी मेहनत घेतात, त्यांच्यावरचा हा सरळसरळ अन्याय आहे. मुळात ह्या ज्या केंद्रीय प्रवेश परीक्षा होतात, त्यांच्या मागे खासगी कोचिंग क्लासेसचे प्रचंड जाळे निर्माण झालेले आहे, जे ह्या परीक्षांत यश मिळवून देण्याचा वायदा करीत पालकांकडून लाखो रुपये उकळत असतात. शिक्षण हा सरळसरळ धंदा बनलेला आहे. शालांत परीक्षा मंडळाच्या परीक्षांना ह्यामुळे काही किंमतच उरलेली नाही. गोरगरीबांची, खेड्यापाड्यांतील मुले ह्या केंद्रीय प्रवेश परीक्षांना सामोरे जाऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे. राज्यांचे अभ्यासक्रम ह्या परीक्षांस पूरक नाहीत. परिणामी ग्रामीण, गोरगरीब मुलांवर सरळसरळ अन्याय करणारी ही परीक्षा पद्धती आहे. परंतु सर्व राज्यांना ती स्वीकारण्यास भाग पाडले गेले आहे. गोव्यानेही आपली जीसेट परीक्षा रद्द करून जेईई आणि नीटच्या जबड्यात आपल्या विद्यार्थ्यांना ढकलले आहे. खेड्यापाड्यांतील गोरगरीबांच्या, सर्वसामान्यांच्या ज्या मुलांना हे अतिरिक्त कोचिंग परवडत नाही, त्यांनी ह्या परीक्षांना सामोरे कसे जायचे? त्यांचा वाली कोण? ह्या प्रवेश परीक्षांतील सावळागोंधळ, त्यासाठीच्या खासगी कोचिंगचा झालेला सुळसुळाट हा सगळा एक बडा शैक्षणिक बाजार आहे हेच यातील सत्य आहे.