परीक्षा? नव्हे, सत्त्वपरीक्षा!

0
48
  • अंजली आमोणकर

आयुष्यातील प्रत्येक गोष्ट संपेल, परंतु परीक्षा काही संपणार नाहीत- असा माझा पूर्ण समज आहे. समज कशाला… खात्रीच झालीय समजा! रात्र-रात्र जागून, मरमरून अभ्यास करून दिलेल्या परीक्षा संपल्या; पण त्या दिवसरात्र सामोर्‍या येणार्‍या फालतू परीक्षा मात्र असा वैताग आणतात की यँव!!

आयुष्यातील प्रत्येक गोष्ट संपेल, परंतु परीक्षा काही संपणार नाहीत- असा माझा पूर्ण समज आहे. समज कशाला… खात्रीच झालीय समजा! रात्र-रात्र जागून, मरमरून अभ्यास करून दिलेल्या परीक्षा संपल्या; पण त्या दिवसरात्र सामोर्‍या येणार्‍या फालतू परीक्षा मात्र असा वैताग आणतात की यँव!!

तुमच्या डोळ्यांसमोर मोठ्ठं प्रश्‍नचिन्ह नाचत असेल की कोणत्या परीक्षांबद्दल मी बोलतेय? पण दैनंदिन जीवनात रोज पन्नास वेळा या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका सोडवाव्या लागतात. सुरुवात होते कामवालीपासून. ती येणारच खूप उशिरा. तोपर्यंत एक डोळा घड्याळावर व दुसरा डोळा दारावर ठेवून तुम्ही कामं आटोपत असता. कामं उरकत आली की ही शुक्राची चांदणी उगवणार आणि तुम्हालाच सवाल करणार- ‘‘सांगा बरं वैनी, मी वेळेवर का नसेल येऊ शकले?’’ तुमच्या महत्त्वाच्या कामांची वाट लागलेली असते. हातातला वरवंटा तिच्या टाळक्यात घालावा असं नाही वाटणार तुम्हाला? जोडप्यानं बाजारात गेलो की दुकानदार वेगळंच उखाणे घालतो- ‘‘काय भावसाब, सांगा बरं वैनींना हवा तोच मसाला मी कसा पैदा केला असेन?’’ भावसायबांच्या मनातलं कुत्सित उत्तर तुम्ही आणि तुम्हीच वाचू शकत असता.

शाळेच्या इन्स्पेक्शनला गेले असता तिथल्या मुख्याध्यापकांनी तर कडीच केली,
‘‘आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही भक्कम माध्यान्ह आहार देतो. त्याकरिता सावकाराचं पोल्ट्रीफार्म उपयोगात आणतो. (म्हणजे पैशांचं साटंलोटं) तिथली अंडी मुलांना उकडून रोज देतो.’’
‘‘इतक्या मुलांना? ती पण रोज-?’’
आश्‍चर्यानं मी विचारलं. पण माझ्याच झिंज्या उपटायची वेळ माझ्यावर आली, जेव्हा मुख्याध्यापक म्हणाले,
‘‘सांगा बरं, तिथल्या कोंबड्या एका वेळेस किती अंडी देत असतील?’’
रागानं मी म्हटले,
‘‘मी त्यांची बाळंतपणं करायला जाते काय?’’
ख्यॅ… ख्यॅ… हसत मुख्याध्यापकांनी शेरा मारला-
‘‘तुम्ही फारच गमतीदार बोलता बॉ…’’
नातलग आणि मित्रमंडळी तर जणू गळच टाकून बसलेली असते- केव्हा तुम्ही त्यांच्या जाळ्यात सापडता व केव्हा ते तुमच्याशी उंदीर-मांजराचा खेळ सुरू करतात! त्यातही नेमकी एखादी वस्तू, घर, वाहन नवीन असेल तर ऑप्शनविना बक्षीस नसलेला ‘कौन बनेगा करोडपती’चा खेळ सुरू होतो. तिथे तरी निदान तीन ऑप्शन देऊन करेक्ट ऑप्शन निवडायला लावतात. इथे तर तुम्ही सगळ्या जगाचं जनरल नॉलेज कोळून प्यायला आहात अशा आविर्भावात तुमची चाचणी घेतली जाते. ‘‘सांगा बरं, काय भावानं जमीन/ टाइल्स/ रेती/ चुना/ सिमेंट घेतलं असेन? कोणता पेंट वापरला आहे ओळखा बघू… पडद्याचा कपडा कुठून शोधला असेन… बागेतील अमुक रोपं कुठून पैदा केली असतील-? कोणतं खत आम्ही वापरतो ओळखा…’’ अशी जी लांबण लागते की सहनशीलतेचा अंत होतो. वरवर चेहर्‍यावर हसू आणलं तरी मनात अशी काही दुरुत्तरं उमटलेली असतात, जी सांगून सोय नाही. बाहेर हॉलमध्ये ही परीक्षा चालू असते, तर आतमध्ये पळ काढताच मालकीणबाईने साड्या, क्रॉकरी, किचनमधील विविध उपकरणं व रेसिपिज यावर एक वर्कशॉप घ्यायला सुरुवात केलेली असते. ‘ह्यॅः ह्यॅः, छान-छान’ करून-करून तुमची मुंडी व बत्तीशी त्सुनामीमध्ये भरकटल्यासारखी हलून हलून तुटायच्या बेतात आलेली असते. या सर्वांवर रिफ्रेशमेंट म्हणून तुम्हाला गृहप्रवेशाला आलेल्या आहेरातल्या नव्या टी-सेटमधून अर्धा कप चहा पाजला जातो. ‘‘सांगा बरं कोणती चहापत्ती?’’ असं म्हटल्याबरोबर जीव घेऊन धूम पळण्याशिवाय गत्यंतरच नसतं. (पाहुण्यांना हाकलायची नवी पद्धत म्हणून ही आयडिया वापरत असावेत अशी एक दुष्ट शंका कायम माझ्या मनात ठाण मांडून बसते!) मध्यमवर्गीयांवर वकिलाकडे जाण्याची फारशी वेळ येत नाही; पण डॉक्टरकडे मात्र ‘चारधाम यात्रे’लाही घालणार नाही, असे व इतके खेटे असतात. आधीच आजारानं बेजारलेले तुम्ही डॉक्टरच्या भडिमाराला तोंड देता देता पुरेसे झेलपाटता. शिवाय, काहीही बोलायची किंवा विचारायची चोरी! ‘‘डॉक्टर कोण आहे, मी का तुम्ही?’’ असा प्रश्‍न करून तुम्हाला गप्प केलं जातं. मोठमोठ्या औषधांच्या याद्या, टेस्ट, रिपोर्टस्‌ची भेंडोळी घेऊन खालमानेनं तुम्ही तंबूत परतता. परीक्षा व लढाई- दोन्हीत नापास होऊन.

एखादा दिवस असा उजाडतो की सगळं कसं मनासारखं नीट घडत असतं. आज आपण इतरांची परीक्षा घे-घे घेऊन सर्वांना नास्तनाबूत करायचं या विचारात असतानाच शेंडेफळ गणित, इतिहास, विज्ञान अशा तुम्हाला न आवडणार्‍या विषयाचं पुस्तक घेऊन येतं. उत्साहाच्या भरात त्याच्या डिफिकल्टीज सोडवता सोडवता ‘हे काय, पप्पा-मम्मी, तुम्हाला इतकं पण माहीत नाही?’ या प्रश्‍नाशी तुम्ही ठेचाळता. दुर्दैवानं तुमच्या हातात परत प्रश्‍नपत्रिका द्यायला सुरुवात केलीय याबद्दल तुमची खात्री चिरंजीवांच्या प्रश्‍नावरून पटते- ‘सांगा बरं, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आडनावं काय-काय होती?’ यावर- ‘मी त्यांना बर्थ सर्टिफिकेट किंवा रेशनकार्ड वाटायला गेले होते का?’ असं तोंडावर आलेलं उत्तर तुम्ही महत्प्रयासानं गिळून टाकता. मनातल्या मनात दडपून टाकलेली सर्व अर्वाच्य दुरुत्तरे शुद्धीत येऊन फणा काढू लागतात. पण लेकरावर वाईट संस्कार नकोत म्हणून गप्प राहता व न बोलता बाहेर जायला निघता. एकदम लक्षात येतं की दारावरची बेल नॉनस्टॉप कर्कश वाजतेय. ‘बघ गं कोण ते!’- बसल्या जागेवरून तुम्हाला फर्मान येतं. खाडकन दार उघडून समोरच्यावर राग काढत तुम्ही म्हणता- ‘क्काय? बेल मोडायचीय का?’ आणि एकदम तुमच्या लक्षात येतं- उमेदवारीतून तुमचं प्रमोशन पेपर सेटरमध्ये झालंय.