स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची मुलभूत जबाबदारी आहे. सभोवतालचा भाग स्वच्छ करताना मनेही स्वच्छ करण्याची गरज आहे. स्वच्छ मनाने कार्य केल्यास संपूर्ण समाज मोठा होईल, असे राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी काल सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेसाठी निमंत्रण दिलेल्या ९ दूतांमध्ये सिन्हा यांचा समावेश आहे. काल संध्याकाळी त्यांनी येथील कदंब महामंडळाच्या बस स्थानकावर केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाणा यांच्या उपस्थितीत कदंब परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेत भाग घेतला.
पंतप्रधानांच्या या मोहिमेस प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे, असे आवाहन सिन्हा यांनी केले. पंतप्रधानांनी ९ दूतांमध्ये आपल्या नावांचा समावेश केल्यामुळे आनंद झाल्याचे सांगितले. आपण गोव्यातील स्वच्छता मोहिमेसाठी ९ दूतांची नियुक्ती करीत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामध्ये किरण बेदी, हेमा सरदेसाई, प्रिन्स पाठक, अशोक भगत, माविन गुदिन्हो, पद्मश्री व्ही. एम. साई आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छता राखणे ही सामाजिक जबाबदारी असून पंतप्रधान मोदीजींच्या या मोहिमेस शंभर टक्के प्रतिसाद मिळेल असा विश्वास केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या भाषणात गुरुवारी २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीम सरकारी कर्मचार्यांकडून ९९ टक्के प्रतिसाद मिळाल्याचे सांगून त्यांनी सर्व कर्मचारी वर्ग व शाळा विद्यालयातील विद्यार्थी-शिक्षक व सर्व संबंधितांचे आभार मानले. आपण दोन तासच कार्यालयात हजर राहून स्वच्छता मोहीम राबविण्यास सांगितले होते. परंतु काही कर्मचारी दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयात साफसफाई करीत होते, ते पाहून समाधान झाल्याचे पर्रीकर म्हणाले.