परिवर्तनाच्या वाटसरू

0
158

– मनस्विनी प्रभुणे
स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असते. कुटुंबाला एकत्रित बांधण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. असं म्हणतात की महिलांच्या अर्थिक-सामाजिक परिस्थितीकडे बघितले असता तुम्हाला त्या देशाची संस्कृती समजू शकते. हे झाले अभ्यासकांचे निकष, परंतु महिला आज पुरुषांच्या बरोबरीने अर्धे आकाश पेलताना दिसत आहेत हेही सत्य नाकारता येणार नाही. मन बधीर करणार्‍या घटना आजूबाजूला घडत असताना सकारात्मक विचार जपणार्‍या आणि हेच सकारात्मक विचारांचे बीज सर्वत्र पसरवणार्‍या अनेकजणी आहेत. महिलांचा जीवनस्तर उंचवावा यासाठी अनेक पातळींवर विविध प्रयोग सुरू आहेत, ज्यामध्ये महिलांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा मनाला जातो.महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण असे शब्द अजून जिथे पोहोचले नाहीत त्या गावपातळीवर महिलांचे जीवन अधिक कष्टमय वाटते. पण याही परिस्थितीत त्या आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी धडपड करतात हेही कौतुकास्पद आहे. आपल्या ग्रामीण भागात डोकावले असता ‘महिला मंडळ’ आणि ‘बचत गटांनी’ या महिलांमध्ये एक छान जाळे विणलेले दिसते. अगदी काही वर्षांपूर्वी बचत गटाच्या बैठकांना महिला उघडपणे जात नव्हत्या. घरातले दडपण, कोण काय म्हणेल याची भीती असायची. परिवर्तन हे हळूहळू आणि कृतीमध्ये, विचारांमध्ये सातत्य ठेवल्याने होते हेच खरे. महिलांमधील चिकाटी आणि उमेद या दोन गोष्टींमुळे आज त्या आर्थिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या आहेत.
‘मायक्रो ङ्गायनान्स’ची दोरी महिलांच्या हाती
प्रत्येक महिला आपल्यापरीने बचत करत असते. पण या बचतीला एक नियमित स्वरूप मिळावे यासाठी महिला अगदी अनौपचारिक पद्धतीने एकत्र येऊ लागल्या आणि एकत्र येऊन बचत करू लागल्या, ज्याला ‘भिशी’ असेही म्हणले गेले. याच भिशीने पुढे ‘मायक्रो ङ्गायनान्स’ म्हणजेच बचतगटांनी जागा घेतली. यात ङ्गायदा एक झाला की सगळ्या आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवली जाऊ लागली आणि बचतगट बँकेशी लिंक केल्यामुळे बँकेकडून गटातील महिलांना कर्जही मिळू लागले, जे आजवर कधी मिळत नव्हते. पूर्वीही महिला एकत्र येऊन बचत करायच्या. अडीअडचणीच्या प्रसंगी कायम गावातल्या सावकाराकडे जायच्या. सावकार त्यांच्याकडून बेहिशेबी व्याज घ्यायचा. पण बचतगट बँकेशी लिंक झाल्यामुळे सावकारी अगदी मोडून पडली. बँकेच्या व्यवहारात महिलांचा सहभाग वाढला. पोलिस स्टेशन आणि बँक ही दोन अशी ठिकाणे आहेत जिथे ग्रामीण भागातील महिला जायला आजही घाबरतात. परंतु बचतगटांमुळे त्यांची ही भीड चेपली गेली.
आजच्या घडीला भारतात ३० लाखांहून अधिक बचतगट अस्तित्वात आहेत. प्रत्येक गटात साधारणपणे २० महिला पकडल्या तरी लक्षात येईल की महिलांचा केवढा मोठा सहभाग या सगळ्या उपक्रमात आहे, आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या प्रत्येक महिलेची साधारणपणे १०० रुपये याप्रमाणे बचत पकडली तर ३० लाख बचतगट किती मोठ्या रक्कमेची उलाढाल करत आहेत आणि देशातील एका मोठ्या आर्थिक घडामोडीमध्ये महिलांचा केवढा मोठा हातभार आहे हेही लक्षात येते. महिलांची हीच क्षमता बघून आज अनेक बँका स्वतःहून ग्रामीण भागातील महिलांकडे जात आहेत. या ग्रामीण भागातील महिलांची ताकद बँकांना समजली आहे. महिला आर्थिक उलाढालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात हे त्यांनी ओळखल्यामुळे आज बँका ग्रामीण भागातील महिलांच्या दरी जाऊ लागल्या आहेत. त्यांच्यासाठी विविध योजना तयार करू लागल्या आहेत.
महिलांच्या हाती रोजगारनिर्मिती
देशभरात महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून जे जाळे निर्माण झाले आहे त्यातून काही चांगले प्रकल्प उभे राहिले. स्वतः रोजंदारीवर कुठेतरी मजुरी करायला जाणार्‍या महिला आज अनेक महिलांसाठी रोजगार निर्माण करणार्‍या बनल्या आहेत. आंध्र, कर्नाटकमधील बचतगट आणि त्यातून उभे राहिलेले प्रकल्प बघायला गेलो असता अशी अनेक उदाहरणे बघायली मिळाली जिथे महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि अन्य महिलांनादेखील आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी साहाय्य करत आहेत. एका बचतगटाने ‘सॅनेटरी नापकिन’ बनवण्याचा उद्योग सुरू केला. थोड्याच दिवसांत त्याची मागणी वाढली. गावातील अन्य बचतगटांतील महिलांना या कामात सामावून घ्यावं लागलं. या सर्व महिला शेतात नाही तर जिथे काम मिळेल तिथे रोजंदारीवर काम करायला जायच्या. पण आज त्यांचा स्वतःचा उद्योग उभा राहिला आहे. सगळ्याजणी एकत्र येऊन काम करू लागलो म्हणून झालं, नाहीतर हे होऊ शकलं नसतं, अशी प्रांजळ कबुलीदेखील त्या देतात.
बचतगटाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास
बचतगटांमुळे महिला एकत्र आल्या, बचत करू लागल्या, आर्थिक विकास होऊ लागला, पण याबरोबरीने त्यांना सर्वांगीण विकासाची संधी मिळाली. लहानपणी आपण कायम ‘एकीचे बळ मिळते ङ्गळ’ अशी म्हण ऐकत आलोय, पण बचतगटांच्या माध्यमातून एकत्र येऊन मिळालेले आर्थिक विकासाचे ङ्गळ आणि त्याची गोडी महिलांना आवडली आहे. एकत्र येऊन बचत करणे हाच ङ्गक्त उद्देश आता उरला नाही. आपल्या कुटुंबाच्या चौकटीबाहेर पडून महिला आता आपल्या गावाच्या विकासाचा विचार करताना दिसतात. विकासकामांमध्ये आपला सहभाग दाखवतात. ग्रामसभांना जाऊन एखादा निर्णय पटला नाही तर त्या विरोध दर्शवतात. आरोग्य शिबीर, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, आपल्या गटासाठी व्यवसाय मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करतात, ज्यांमधून आपला स्वतःचा आणि आपल्या गटातील महिलांचा विकास होईल, अशा उपक्रमांमध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. त्यांचा उत्साह अनेक वेळा थक्क करणारा असतो.
बचतगट आणि महिला यांचे सामर्थ्य ओळखून या उपक्रमाला एक नित शिस्त आणि एक चांगले वळण लावून देण्याचे काम आंध्र, गुजरात, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांनी केले. बचतगटांना शासनाकडून मिळणारे प्रशिक्षण, प्रशिक्षणानंतर या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे, त्यांना प्रसिद्धी मिळवून देणे यासारखे उपक्रम त्या त्या राज्यांतील शासनयंत्रणेमधून झाले. पुणे जिल्ह्यातील बचतगटातील महिलांनी बनवलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळून देण्यासाठी ‘सावित्री’ नावाने पुण्यात एक शॉपिंग सेंटर काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. तेव्हा पुण्यात ‘मॉल्स’ हा प्रकारदेखील नव्हता. नंतर हा उपक्रम ङ्गक्त पुण्यापुरता न उरता अख्ख्या महाराष्ट्रातील बचतगत आणि त्यांची उत्पादने याला जोडण्यात आली. आज बचतगटांनी बनवलेल्या वस्तूंना ‘सावित्री’सारखे ब्रँडनेम मिळालेय. त्यांना बाजारपेठ मिळालीय. असे काम गोवा शासनाने गोव्यातील बचतगटांतील महिलांसाठी केले पाहिजे. गोव्यातील बचतगटांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळाली पाहिजे. ज्या पद्धतीने बँका या महिलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्याप्रमाणे शासनाने गुजरात आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून या महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्यायला हवी.
असाही एक अभिनव प्रयोग
नेत्रावळी हे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर असलेल्या या गावात गेली अनेक वर्षे महिला बचतगट तसे अस्तित्वात होते, परंतु ते चर्चेत तेव्हा आले जेव्हा शासनाने हे गाव ‘आदर्श ग्राम’ म्हणून दत्तक घेतले. या निमित्ताने नेत्रावळीतील बचतगटातील महिला एकत्र आल्या. मुळात गावच इतक्या दुर्गम भागात दूरवर असल्यामुळे बारीकसारीक गोष्टींसाठी सांगे- केपे या गावांवर अवलंबून राहावे लागते. इथे शेती आणि कुळागरात मजुरीचे काम एवढेच महिलांसाठी उत्पन्नाचे साधन आणि यामध्ये मिळून मिळून किती रोजगार मिळणार. महिलांमध्ये काहीतरी करण्याची उमेद होती, पण त्यांना प्रोत्साहन देणारे आतापर्यंत कोणी नव्हते. ‘सेंटर ङ्गॉर डेव्हलपमेंट प्लानिंग अंड रिसर्च’ (सी.डी.पी.आर.) या संस्थेच्या माध्यमातून या गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली.
इथल्या महिला खूप कष्टाळू. पडेल ते काम करणार्‍या आणि प्रयोगशील. त्यांच्यातील हाच उत्साह हेरून सी.डी.पी.आर. संस्थेने या महिलांमध्ये कामास सुरुवात केली. मायनिंग सुरू असताना सेसा स्टरलाईट (त्यावेळची सेसा गोवा) या कंपनीच्या आर्थिक साहाय्याने या भागातील महिलांसाठी केटरिंग आणि शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा पद्धतीचे प्रशिक्षण पहिल्यांदाच या गावात झाले. या पद्धतीची संधी त्यांच्यापर्यंत कधीच चालून आली नव्हती. नेत्रावळी खूप लांब आहे अशी सबब सांगून अनेकजण इथे यायचे टाळतात असा इथल्या महिलांचा अनुभव. पण प्रत्यक्ष आपल्या गावातच आपल्याला प्रशिक्षणाची संधी मिळतेय म्हटल्यावर महिलांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रशिक्षण कार्यक्रमांना दिला. चतुर्थीच्या काळात भरणार्‍या माटोळीच्या बाजाराने नेत्रावळीतील महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्याची संधी तर मिळालीच, पण त्यांच्या या उपक्रमाला भरपूर प्रसिद्धीही मिळाली. सी.डी.पी.आर. संस्था आणि शासनाच्या ‘प्लानिंग आणि स्टेटस्टीक’ विभागाच्या सहकार्याने या गावातील बचतगटातील सर्व महिलांची ‘नेत्रावळी महिला उद्योग समूह’ या नावाने संस्था स्थापन करून देण्यात आली. नेत्रावळीतील महिलांनी जंगलातून गोळा करून आणलेल्या, माटोळीसाठी लागणार्‍या दुर्मीळ अशा वनस्पती, ङ्गळं, फुलं यांची विक्री करणारा बाजार मडगावमध्ये भरवण्यास सुरुवात केली. नेत्रावळीमधील महिलांना यामुळे गावातून बाहेर पडून एक वेगळं जग बघायची संधी मिळाली. यातील काही महिलांना मडगावदेखील माहीत नव्हतं. यातील काही महिला या घरांमधून रोजगारासाठी अशा कधी बाहेर गेल्या नव्हत्या. त्यांच्यासाठी हा वेगळाच अनुभव होता. गेली दोन वर्ष हा बाजार भरवला जातो. महिलांनी अपेक्षा केली नव्हती इतका हा बाजार यशस्वी झाला. दुसर्‍या वर्षी या माटोळी बाजाराच्या नियोजनाच्या टप्प्यावरच महिलांमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसून येत होता.
नेत्रावळीमधील महिलांना माटोळी बाजाराच्या निमित्ताने एक वेगळं व्यासपीठ मिळालं होतं. ज्यांच्या हातात स्वतः कमावलेले पैसे कधी पडले नव्हते, त्यांच्या हातात या बाजारामुळे बर्‍यापैकी चांगली रक्कम आणि तीदेखील चतुर्थीच्या आधी मिळाल्यामुळे महिला खूश झाल्या. आता मात्र महिलांमध्ये काहीतरी करण्याची उमेद निर्माण झाली. यांतील काही महिलांनी गावात ज्या वस्तू मिळत नाहीत आणि त्यासाठी सांगे- केपेला जावे लागते अशा वस्तूंचे एक दुकान सुरू केले. वेगवेगळ्या बचतगटांतील महिलांनी एकत्र येऊन या दुकानाची सुरुवात केली. या मल्टीपर्पज दुकानाचे उद्घाटन गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. नेत्रावळीतील महिलांच्या उपक्रमांना मनोहर पर्रीकर यांचे कायम मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.
नेत्रावळीत स्ट्रोबेरी शेती
नेत्रावळी पंचायतीमधील अतिशय दुर्गम अशा भागात वेर्ले नावाचे गाव आहे. या गावातील बचतगटातील महिला आणि हे वेर्ले गाव मध्यंतरी चर्चेचा विषय बनले ते इथे महिलांनी केलेल्या स्ट्रोबेरीच्या शेतीमुळे. गोव्यात पण स्ट्रोबेरीची शेती होऊ शकते हे या महिलांच्या प्रयत्नांनी सिद्ध झाले. यासाठी या गावातील काही महिला महाबळेश्‍वरला जाऊन रीतसर प्रशिक्षण घेऊन आल्या. स्ट्रोबेरीच्या शेतीसाठी लागणारी थंड हवा, तसं वातावरण वेर्ले गावात असल्यामुळे हा अभिनव असा स्ट्रोबेरी शेतीचा प्रयोग एकदम यशस्वी झाला. ‘मिनिरल ङ्गौंडेशन’च्या सहकार्याने हा सगळा उपक्रम राबविण्यात आला. आता दरवर्षी इथल्या महिला स्ट्रोबेरीची शेती करू लागल्या आहेत. उत्पन्नाच्या साधनात नवी भर पडली आहे. याबरोबर वेर्ले येथील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना इथे मुक्काम करता यावा या उद्देशाने ‘आंगण’ नावाने इथल्याच कुटुंबांमध्ये मुक्कामाची, जेवणाची सोय करून देऊन महिलांना आणखी एक उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले आहे.
सेंद्रीय भाजीपाला लागवड
नेत्रावळी पंचायतीमधील नुने आणि सावरी भागातील महिलांचा समूह वर्षानुवर्षे सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला करतो. सावरी भागातील महिलांनी गेल्या वर्षी काही टन मिरचीचे उत्पादन घेतले, तर नुनेमधील महिलांनी चिटकी-मिटकी, तांबडी भाजी पिकवली. हे प्रयत्न बघून अग्रीकल्चर डिपार्टमेंटने या महिलांना प्रशिक्षण, भाजीपाल्याची बी-बियाणी, खतं देण्यास सुरुवात केली आहे. इथल्या महिला कष्टाळू तर आहेतच पण प्रयोगशीलदेखील आहेत. त्यांना ङ्गक्त प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाची गरज आहे.