परिचारिका बनवतो  सांगून ४७ जणांना गंडा

0
74
संशयित पूजा शंके

२५ लाख लुटले; अल्पवयीनासह दोघे ताब्यात
गोवा मेडिकल हॉस्पिटल येथे नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवून ४७ व्यक्तींना २५ लाख २३ हजार रुपयांना ठकवल्याच्या आरोपावरून कुडचडे पोलिसांनी झरीवाडा-दवर्ली, नावेली येथील पूजा दामोदर शंके ऊर्फ डॉ. पूजा माने (३२) तसेच त्याच्या एका अल्पवयीन साथिदारास कुडचडे पोलिसांनी अटक केली.
कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक रवींद्र देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, शिरोडा येथील सुप्रिया शामराव देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार परिचारिकेची नोकरी देण्याचे सांगून काकोडा येथील एका अल्पवयीन आरोपीने कुडचडे बाजारात एका हॉटेलजवळ बोलावले. तक्रारदार वडलांसोबत तेथे गेली व १० हजार रु. दिले. त्यावर आरोपीने रिवण येथे डॉ. पूजा माने यांच्याकडून दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तेथे आरोपींनी फिलिप लोबो यांचे घर नऊ हजार प्रति महिना भाडेपट्टीवर घेतले. तेथे आणखीही अनेकांना त्याने पैसे घेऊन प्रशिक्षण दिल्याचे कळते.
दरम्यान, अल्पवयीन आरोपीने कुडचडे येथे थोडेसे प्रशिक्षण घेतले होते. ती जुजबी माहिती सांगून उपस्थितांना त्याने भुलवले व नोकरीचे आमिष दाखवून काहींकडून लाख, काहींकडून ५० हजार रु., काहींकडून २५ हजार रु. उकळले. त्यांना गोवा मेडिकल हॉस्पिटल लिहिलेल्या पावत्याही दिल्या.
मेडिकल हॉस्पिटल नावाच्या पावत्या तसेच डॉ. पूजा माने, हॉस्पिसियो हॉस्पिटल, असे लिहिलेला रबर स्टँप पोलिसांनी जप्त केला आहे. पूजा शंके हिला चार दिवसांचा रिमांड देऊन कुडचडे पोलीस स्थानकात ठेवले असून काकोडा येथील १७ वर्षीय अल्पवयीनाची रवानगी अपना घरात केली आहे.