पराभूत झालो; पण विजयाची क्षमता दाखवली : उत्पल

0
30

>> मिरामार समाधी स्थळी मान्यवरांनी वाहिली मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली

विधानसभा निवडणुकीत आपण थोड्या मतांनी पराभूत झालो तरी, पणजीवासियांची मने जिंकली आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याची क्षमता आपल्यामध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. आपल्याला निवडणुकीसाठी कमळ निशाणी मिळाली असती, तर निश्‍चित अडीच ते तीन हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झालो असतो, असे मत उत्पल पर्रीकर यांनी काल व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या तिसर्‍या पुण्यतिथी दिनी उत्पल पर्रीकर यांनी मिरामार येथे समाधी स्थळावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळाली असती, तर नऊ हजारांच्या आसपास मते मिळाली असती. पराभव झाला असला, तरी पणजी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहे. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठाचा वापर केला जाणार आहे, असेही उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.

मनोहर पर्रीकर यांच्या तिसर्‍या पुण्यतिथीनिमित्त काल मिरामार येथील समाधी स्थळावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार नीळकंठ हर्ळणकर, आमदार बाबूश मोन्सेरात, आपचे आमदार व्हिन्झी व्हिएगस व इतरांनी मिरामार येथे समाधीस्थळी मनोहर पर्रीकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

मनोहर पर्रीकर यांनी देश आणि राज्याच्या विकासात दिलेले योगदान कधीच विसरले जाऊ शकत नाही, असे राज्यपाल पिल्लई यांनी म्हणाले.
मनोहर पर्रीकर यांचे राज्यातील साधनसुविधांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान आहे, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, प्रशासन आणि नेतृत्वाची उणीव भासते. त्यांनी राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे भाजपमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली आहे, असे विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.
राज्यातील साधनसुविधांच्या विकासामुळे मनोहर पर्रीकर सदैव स्मरणात राहतील. ते दूरदृष्टी असलेले नेते होते, असे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

वैयक्तिक आणि राजकीय नाते संबंध यांच्यात फरक असतो. उत्पल पर्रीकर यांच्याशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत, असे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. उत्पल पर्रीकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या प्रश्‍नावर बोलताना तानावडे म्हणाले की, राजकीय पक्षाचे कार्य करणे प्रत्येकाच्या इच्छेनुसार अवलंबून असते.