पराभवच्या भीतीनेच भाजपकडून अमित शहा यांच्या सभा : सुदिन

0
19

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होणार असल्याच्या भीतीने भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोंडा व सावर्डे मतदारसंघातील प्रचारासाठी पाचारण केले असल्याचा आरोप काल सुदिन ढवळीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. फोंडा तालुक्यातील मतदारसंघांत तर आपली डाळ अजिबात शिजणार नाही याची भाजपला जाणीव असून त्याचमुळे भाजपने आता फोंडा तालुक्यातील मतदारसंघातील प्रचारावर भर दिला असल्याचे ढवळीकर म्हणाले. पण भाजपने आता कितीही निकराचे प्रयत्न केले तरी आता त्यांना यश मिळणार नसून फोंडा तालुक्यातील सर्व मतदारसंघांत त्यांचा पराभव अटळ असल्याचे ते म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आपणाला १७ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. यंदा आपणाला १८ हजारांपेक्षा जास्त मते मिळून आपण विषयी होणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या मागे आपल्या मतदारसंघातील मतदार व कार्यकर्ते हे ठामपणे उभे असून विजयासाठी आपणाला ‘आयपॅक’ची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मगोने सदैव चांगले
उमेदवार दिले

दरवेळी मगो पक्षाने चांगले उमेदवार दिलेले असून यंदाही खूप चांगले उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे गोव्यातील मतदारांनी मगो पक्षाच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही ढवळीकर यांनी यावेळी केले.

युतीबाबतचे आरोप निराधार
मगो पक्षाशी युती केलेल्या तृणमूल कॉंग्रेस पक्षावर कॉंग्रेस व भाजपकडून होऊ लागलेले आरोप हे खोटे व निराधार आहेत, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

तृणमूल कॉंग्रेस पं. बंगालमधील लोकांना गोव्यात आणून बसवू पाहत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप खोटा असून लोकांची दिशाभूल करणारा आहे. खरे म्हणजे १९७१ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशातील निर्वासितांना देशात आश्रय दिला होता हे कॉंग्रेसच्या नेत्यांनी विसरू नये, असे ढवळीकर म्हणाले.

तृणमूलच्या नेत्यांनी पं. बंगालमध्ये भाजप समर्थकांची हत्या केल्याचा आरोप भाजपचा आरोप हा धादांत खोटा असल्याचे ढवळीकर म्हणाले. पं. बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने भाजप तृणमूल कॉंग्रेस पक्षावर खोटे आरोप करत असल्याचे ढवळीकर म्हणाले.