पराधीन (की स्वाधीन) आहे जगती पुत्र मानवाचा?

0
6

(संस्कार रामायण)

  • प्रा. रमेश सप्रे

राम ज्यावेळी ‘रघुकुल की रीति चली आयी। प्राण जाय पर वचन न जायी।’ असं ठामपणे म्हणतो नि पित्याच्या वचनपूर्तीसाठी स्वेच्छेने नि आनंदाने चौदा वर्षांच्या वनवासाला निघतो तेव्हा तो पराधीन आहे की स्वाधीन?

पुत्र मानवाचा म्हणजे आपण सारे कृतीने आणि तिच्या परिणामाने बांधलेले (पराधीन) असतो, ही वस्तुस्थिती आहे. यालाच प्रारब्धाचा सिद्धांत असेही म्हणतात. प्रारब्ध म्हणजे आपली पूर्वकर्मे आणि त्यांचे फळ (भोग) हे अटळ आहे. हे वास्तव मानवी जीवनाचा वरवर विचार केला तर खरे वाटते. पण हे सारे स्वीकारायला आपण (मानवाचे पुत्र म्हणजे मानव) खरेच पराधीन आहोत का? यावर ज्याने-त्याने म्हणजे सर्वांनी सखोल विचार (चिंतन) करणे आवश्यक आहे. कारण यातच आपल्या सुखाचे नव्हे तर आनंदाचे रहस्य दडलेले आहे.

राम ज्यावेळी ‘रघुकुल की रीति चली आयी। प्राण जाय पर वचन न जायी।’ असं ठामपणे म्हणतो नि पित्याच्या वचनपूर्तीसाठी स्वेच्छेने नि आनंदाने चौदा वर्षांच्या वनवासाला निघतो तेव्हा तो पराधीन आहे की स्वाधीन?
देहाच्या पातळीवर तो खरोखरच अरण्यवासासाठी तयार होतो; पण मनबुद्धीच्या पातळीवर त्याचा तो निर्णय स्वतःचा असतो. असाच निर्णय सीता नि लक्ष्मणाचा नसतो का? पुढे एकदा लक्ष्मण रामाला विचारतो, ‘रामा, वर-वर म्हणजे उघड-उघड कष्ट, क्लेश यांनी भरलेल्या या वनवासात (वनवासी जीवनात) तू इतका शांत, मुक्त, आनंदी कसा राहू शकतोस?’ खरंतर हा प्रश्न लक्ष्मणाने आपला प्रतिनिधी म्हणून विचारलाय. यावर रामाचे उत्तर आपल्यासाठी मार्गदर्शक नि प्रेरक आहे. दोनच शब्दांचे हे उत्तर आहे- ‘अंतस्त्यागी बहिर्भोगी।’
पुढे भरत तसेच राजगुरू, राजमाता यांच्याबरोबर घडलेल्या चित्रकुटावरील प्रसंगात याचे प्रत्यंतर (प्रचिती) येते. या प्रसंगाचे दोन भाग आहेत. पूर्वार्ध, रामाने भरताला केलेला उपदेश नि उत्तरार्ध, भरताने तोड (उत्तर) म्हणून काढलेला सुवर्णमध्य- रामाच्या पादुका स्वीकारून त्यांच्या साक्षीनं नि प्रेरणेनं चौदा वर्षं अयोध्येच्या सीमेबाहेर (नंदिग्रामात) राहून यशस्वीपणे राज्य करणं.

एका अर्थी ही प्रारब्धाशी केलेली तडजोड नव्हती तर प्रारब्धावर (पूर्वसंचितावर) केलेली मात होती, विजय होता. प्रारब्धाची जशी अटळता आहे तशीच त्याची मर्यादाही आहे. एकनाथांच्या (संतांच्या) शब्दात ‘प्रारब्ध उतरले देहाचिये तटी।’ याचा अर्थ प्रारब्धाचा, त्याच्या भोगांचा (नि उपभोगांचाही) संबंध, प्रभाव देहाशीच निगडीत असतो. आपली मनबुद्धी याबाबतीत स्वतंत्र असते. यासंदर्भात एखाद्या कवितेसारखं इंग्रजीत एक सूत्र आहे- ‘डान्स इन डिफिकल्टीज, सिंग इन सॉरोज अँड व्हिसल इन वरीज्‌‍’ म्हणजे संकटात नाचूया, दुःखात गाऊया नि चिंताग्रस्त असताना शीळ घालूया… अन्‌‍ यासाठी बुद्धीची, विवेकाची मदत घेऊया.
राम-भरत मिलाप दोनदा घडला. वनवासाच्या आरंभी- चित्रकूट प्रसंगात, तसेच वनवासाच्या अखेरीस- नंदिग्रामात घडलेल्या पुनर्मीलन प्रसंगी. चित्रकूट प्रसंगातील राम-भरत संवादाचं- त्यातील त्रिकालाबाधित, चिरंतन तत्त्वज्ञानाचं सर्वात सुंदर सुबोध शब्दांकन आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी गीतरामायणात केलंय जे स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी अजरामर बनवलंय.

रामायणातील आदर्शांचा (आदर्श व्यक्तींच्या वर्तनाचा नि वक्तव्याचा) कळस शोभावा अशा या प्रसंगी रामाचे काही उद्गार सदैव ध्यानात ठेवूया नि जीवनात उतरवूया. हा एक मोलाचा संस्कार आपण स्वतःवर करून घेऊया. कायमचा!
प्रसंग सर्वांना माहीत आहे. भरत रामाच्या वनवासाबद्दल नि त्यामुळे घडलेल्या शोकांतिकेबद्दल माता कैकयीला दूषणे देतो. तिचं स्वप्न खरं होऊ न देण्याची प्रतिज्ञा करतो नि राजवस्त्रं, राजचिन्हं, राजछत्र (ध्वज) इ. घेऊन रामाला भेटण्यासाठी निघतो. रामाऐवजी स्वतः चौदा वर्षं वनात राहून तापसजीवन जगण्याचा निर्धार भरत व्यक्त करतो. त्याला वसिष्ठ, कौसल्या इतकंच नव्हे तर जिच्यामुळे हे सारं घडलं त्या कैकयीची मान्यता होती. पण रामाचा निर्णय अन्‌‍ निश्चय पर्वतासारखा अढळ राहिला. चौदा वर्षं संपल्याविना अयोध्येला परतणार नाही हा निर्धार राम त्रिवार व्यक्त करतो. पण हे सत्य सांगताना जीवनाबद्दल, प्रारब्धभोगांबद्दल खूप महत्त्वाचं सांगतो. या प्रसंगीच्या गीतरामायणातील सर्वप्रिय गीतातील काही रामवचनं चिंतनासाठी संस्कारांच्या दृष्टीनं पाहूया-

  • दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा- यात आपल्या दुःखात कुणाचाही दोष नाही. त्यामुळे द्वेष, मत्सर, सूड यांना जीवनात स्थान असू नये- हा संस्कार महत्त्वाचा.
  • माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात राज्यत्याग काननयात्रा (वनवास) सर्व कर्मजात
    खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
  • खरं आहे, देहानं राम वनवासात आला. कारण पराधीनता देहाच्या पातळीवर असते. पण राम या सर्व प्रकाराला ‘खेळ’ म्हणतो, त्याप्रमाणे जगतो. ही त्याची स्वाधीनता!
  • तात स्वर्गवासी झाले बंधु ये वनात अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात।
  • पिता दशरथाचा मृत्यू, सीता-लक्ष्मण यांचा वनवास या साऱ्या घटनांकडे राम साक्षीभावानं बघतो. यातून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी नि ते पराधीनतेनं नव्हे तर स्वाधीनतेनं म्हणजे अगतिकतेनं, लाचारीनं नव्हे तर सकारात्मकतेनं स्वीकारण्याची वृत्ती व्यक्त होते.
    आजच्या काळात हा सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे. चित्रकुटावरील भरतभेटीचा हा प्रसंग आपल्याला नवीन नाही. पण त्यातून व्यक्त होणारे मनावरचे संस्कार महत्त्वाचे आहेत. हे सांगण्यासाठी गीतरामायणातील या सदाहरित (एव्हरग्रीन) गाण्याचा माध्यम म्हणून आपण उपयोग केला. असो.
    रामानं प्रारब्धाची किंवा नियतीची अढळता नि त्यातून निर्माण होणारी पराधीनता (परतंत्रता) याचं जीवनाच्या अंगानं वर्णन करतानाच- प्रारब्धभोग भोगताना निरामय, स्वाधीन (स्वतंत्र) जीवनाचा मंत्र सांगितलाय. रामाला अयोध्येत परतवण्याचा संकल्प करून आलेला भरत प्रारब्धामुळे पराधीन आहे की रामाच्या पादुका माथ्यावरून मिरवत आणून त्यांच्या साक्षीनं प्रभावीपणे राज्य सांभाळणारा भरत स्वाधीन आहे याचा निर्णय ज्याचा त्यानं घ्यावा, हो ना?