पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

0
15

योगसाधना- 675, अंतरंगयोग- 261

  • डॉ. सीताकांत घाणेकर

काही व्यक्तींना स्वतःच्या श्रीमंतीबद्दल गर्व असतो व त्यापायी ते अनेक अनैतिक गोष्टी करतात. असे करून मागील संचित व प्रारब्धामुळे जी संपत्ती प्राप्त झाली होती, तिचे पर्यवसान अशा वागण्यामुळे पुढील आयुष्यातील जन्माचे संचित व प्रारब्ध खराब करण्यात होते.

भगवंताने आपली बुद्धी वापरून अत्यंत कष्टाने हे विशाल ब्रह्मांड बनवले. त्यात अनेक घटक आहेत- सजीव व निर्जीव. मानवाची बुद्धी या सगळ्याचा विचार करण्यास कमी पडते. तोदेखील निसर्गाचा एक छोटा घटक आहे. सर्व सृष्टी अत्यंत रहस्यमय आहे. मोठमोठ्या बुद्धिवंतांनादेखील सृष्टीचे गूढ सर्वतोपरी आकलन झालेले नाही. शेवटी तेदेखील मर्त्य मानवच ना!
अनेकांनी या रहस्यांबद्दल वेळोवेळी माहिती दिली आहे. पण थोडे चिंतन केले तर लक्षात येते की, हे सर्व ज्ञान अपुरेच आहे. आध्यात्मिक रहस्यांवर सखोल अभ्यास झाला तो फक्त आपल्या भारतातच.
हल्लीच्या लेखांत आपण ‘व्हॉट्सॲप’वर आलेल्या काही छान अशा रहस्यांवर विचार करीत आहोत. आता आणखी काही संदेश बघूया-
जिच्या उदरात जन्म होतो ती माता
जिच्या उदरात जातो ती माती

हेच माणसाचे जीवन आहे. फक्त एका वेलांटीचा फरक. दोन्ही घटक- माता व माती- सर्व जीवसृष्टीचा सांभाळ करतात. माता सुरुवातीला गर्भरूपात सांभाळते. तद्नंतर जन्म झाल्यानंतर आपल्या मुलांची सर्व तऱ्हेने व्यवस्थित काळजी घेते- अगदी बालपणापासून ते प्रौढत्वापर्यंत. मातेचे ऋण खरेच अद्वितीय आहे. ते कधीही फेडता येणार नाही. शास्त्रकार भगवंतालादेखील मातेचेच रूप मानतात. मानवाचा मातेकडील संबंध तसे पाहिले तर मर्यादितच असतो. मृत्यूनंतर हा संबंध संपतो. आता कोण आधी जाणार हे ठरलेले नसते, म्हणजे आम्हाला माहीत नसते. पण मातेच्या उदरात जन्मापूर्वी असतो हे नक्की.
जिच्या उदरात जातो ती माती. तीदेखील आपली धरती माताच आहे. जीवसृष्टीच्या सर्व गरजा ती पुरवते. यासाठी वेगळी यादी द्यायची गरज नाही, प्रत्येकाला हे माहीत आहे. त्या मातेलादेखील आपण विष्णुपत्नी मानतो. पदस्पर्श करण्याआधी तिची क्षमा मागतो. सकाळी उठल्यावर उभे राहण्याच्या वेळी ही प्रार्थना म्हणायची प्रथा होती. आता आपल्यातील कितीजण असे करतात अथवा त्यांना माहीत आहे हा संशोधनाचा विषय असू शकतो.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे॥

  • समुद्ररूपी वस्त्र धारण करणाऱ्या, पर्वतरूपी स्तन असणाऱ्या व भगवान विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्विमाते, तुला मी नमस्कार करतो. माझ्या पायांचा तुला स्पर्श होणार आहे याबद्दल तू मला क्षमा कर.
    या प्रथेमागे आणखी एक उच्च उद्देश दिसतो. एरव्ही आपण कुणालाही भेटलो की हस्तांदोलन करतो. म्हणजे हाताने स्पर्श करणे पाप नाही, उलट ती एक चांगली प्रथा आहे. त्या स्पर्शामध्ये किती ऊब आहे हे कळते. काहीजण थोडा वेळ हात हातात धरून हलवतच राहतात. जास्तकरून अनेक काळानंतर भेट झाली तर अथवा जिवलग मित्र असेल तर.
    याउलट आपल्या पायांना ते स्थान नाही. चुकून जरी कुणाला पाय लागला तर लगेच आपण क्षमा मागतो. मला इथेच या प्रथेचा गर्भितार्थ दिसतो. काहीजण दुसऱ्याला- माणसाला, प्राण्याला (कुत्र्याला)- रागाने लाथ मारतात. म्हणजे ते पाप करतात.
    पोलिस गुन्हेगाराला लाथा मारतात. स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी परकीय राज्यकर्त्यांनी (पोर्तुगीज, ब्रिटिश) कितीतरी लाथा स्वातंत्र्यसैनिकांना मारल्या. मला वाटते जर हा संस्कार लक्षात ठेवला तर कुणीही कुणाला लाथ मारणार नाही. पण आपण कर्मकांडच करतो; त्यामागील तत्त्वज्ञान व भाव समजून घेत नाही.
    मानवी जीवनात काही गोष्टी नक्की आहेत. आपला जन्म केव्हा होणार व मृत्यू केव्हा येणार हे नक्की असले तरी आपणास त्याचे ज्ञान नसते. शास्त्रकार म्हणतात- माणूस जन्म घेतो तेव्हा ते मूल रडते (पहिला श्वास घेण्यासाठी) व इतर हसतात. मृत्यूच्या वेळी तो माणूस हसतो व बाकीचे रडतात. तो माणूस हसतो असे म्हणण्यामागेही एक उच्च तत्त्वज्ञान आहे- आत्मा परत आपल्या मातेकडे म्हणजे परमात्म्याकडे जातो. येथे एक गोष्ट नमूद करायला हवी- ज्या व्यक्ती सत्कर्म करतात त्याच हसत जाऊ शकतात. म्हणून प्रत्येकाने जीवनात जेवढे सत्कर्म होईल ते करायला हवे म्हणजे मृत्यूची भीती वाटत नाही.

हा विषय फार गूढ व अत्यंत चिंतनीय आहे. प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने अभ्यास करण्यासारखा आहे. या विषयात जीवनाचे तत्त्वज्ञान सामावलेले आहे.
दुसरा संदेश असा-
जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवले
पहिली व शेवटची आंघोळ दुसरेच घालतात.
मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार
स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार
तरीदेखील माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणे कठीण!
बालपणी ऐकलेली एक काव्यपंक्ती आठवली- ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’ खरेच, ही काव्यपंक्ती प्रत्येकाने विचार करण्यासारखी आहे. या सर्व घटना सर्वांना सविस्तर माहीत आहेत, तरीदेखील आपणातील बहुतेकजण त्यावर गंभीरपणे विचार करीत नाहीत.
बहुतेकजण जन्मभर पुष्कळ कष्ट करून संपत्ती मिळवतात अन्‌‍ त्यात वावगे असे काही नाही. पण त्या संपत्तीचा सदुपयोग सर्वजणच करतील हे निश्चित नाही. काहीजण तर एवढे कंजूष असतात की योग्य उपभोगदेखील घेत नाहीत. अशा लोकांची संपत्ती त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याकडे जाते. नातेवाईक भोगतात.
त्याशिवाय आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे, थोड्या व्यक्ती वाईट मार्गाने संपत्ती गोळा करतात. ही संपत्ती दुसऱ्याच्या शापाबरोबर आपल्या घरी आणतात. जोपर्यंत प्रारब्ध चांगले असते तोपर्यंत हे लोक मजा करतात; पण जेव्हा केव्हा वाईट वेळ यायला सुरुवात झाली की मग त्यांचे भोग, त्यांच्या वेदना, त्यांची दुःखे बघवत नाहीत. भारतीय संस्कृतीप्रमाणे संपत्तीला म्हणूनच लक्ष्मीची उपमा दिली गेली आहे. ती चांगल्या मार्गाने कमवावी (आशीर्वादांबरोबर), तसेच ती सत्कर्मांसाठी वापरावी. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, ती अष्टलक्ष्मी आहे- धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी. यातील प्रत्येक नावाला- शब्दाला सखोल अर्थ आहे. त्यामागे एक विशिष्ट तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे लक्ष्मीबद्दल विचार करताना योग्य तऱ्हेने करणेच श्रेयस्कर आहे.
त्याशिवाय लक्ष्मी ही विष्णुपत्नीदेखील आहे. तिचा योग्य वापर केला तर ती प्रसन्न होईलच, पण भगवान विष्णूदेखील आशीर्वाद देतील. लक्ष्मीचे वाहनसुद्धा योग्यच आहे- हत्ती. यामागील तत्त्वज्ञान म्हणजे, आपल्या घरात लक्ष्मी येताना पुढच्या मोठ्या दारातून वाजतगाजत यावी; मागच्या दारातून अथवा मागे हात ठेवून किंवा टेबलाखालून नको! आजच्या जमान्यात तर ही देवाण-घेवाण अशी चालते हे सर्वांनाच माहीत आहे.
तथाकथित अशिक्षित व्यक्तीलादेखील या संदेशातील बहुतेक गोष्टी थोड्या तरी माहीत आहेत. तरीदेखील अनेक व्यक्ती स्वार्थी व अहंकारी असतात. त्यांना स्वतःच्या श्रीमंतीबद्दल गर्व असतो व त्यापायी ते अनेक अनैतिक गोष्टी करतात. असे करून मागील संचित व प्रारब्धामुळे जी संपत्ती प्राप्त झाली होती, तिचे पर्यवसान अशा वागण्यामुळे पुढील आयुष्यातील जन्माचे संचित व प्रारब्ध खराब करण्यात होते.
आपले योगसाधक योगशास्त्राचा अभ्यास करतात. त्यांना यातील बहुतेक ज्ञान आहे व ते त्याप्रमाणे आचरणदेखील करतात.