पराग नगर्सेकरांची पर्यावरण संचालक पदावरून बदली; रवी झा यांची नियुक्ती

0
116

राज्य नागरी सेवेतील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काल काढण्यात आले. दक्षिण गोव्यात वादग्रस्त ठरलेले पर्यावरण संचालक पराग नगर्सेकर यांची बदली गिमार्डच्या प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. तर नवे पर्यावरण संचालक म्हणून आयएएस अधिकारी रवी झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कामगार आयुक्तपदी जयंत तारी तर अबकारी आयुक्त, दोन्ही जिल्हाधिकारी, लोकसेवा आयोगाचे सचिव, गोवा मनोरंजन सोसायटी, पालिका आयुक्त नगरविकास संचालक अशा वेगवेगळ्या पदांवर आयएएस अधिकारी नियुक्त केले गेले आहेत.
माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संचालकपदी श्रीनेत कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली असून गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा तसेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
कामगार आयुक्त गोपाळ पार्सेकर यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (द्वितीय) तसेच आग्नेल फर्नांडिस यांची दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (द्वितीय) पदावर बदली करण्यात आली आहे.

महसूल खात्याचे संयुक्त सचिव अँथनी डिसोझा यांच्याकडे एनआरआय विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगाचे अधीक्षक शामसुंदर परब यांना गृहनिर्माण खात्याच्या संयुक्त सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. सुरेंद्र नाईक यांना दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (प्रथम) पदावर नियुक्त करण्यात आले आहे. विजय परांजपे यांना शिष्टाचार खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सार्वजनिक गार्‍हाणे खात्याचे संचालक व प्रशासकीय सुधारणा खात्याचे अतिरिक्त सचिव या पदांचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
शिक्षण खात्याच्या प्रशासकीय संचालक मेघना शेटगावकर यांच्याकडे संजय स्कूलच्या सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. राज्य नागरी सेवेतील कनिष्ठ अधिकारी दीपेश प्रियोळकर यांची आदिवासी कल्याण खात्याच्या उपसंचालकपदी तसेच कौशल्य विकास खात्याच्या उपसंचालक दीप्ती काणकोणकर यांना सहकार खात्याच्या उपनिबंधकपदी नियुक्त करण्यात आले आहे.