परवाने मिळाल्यानंतर म्हादईवरील ‘कळसा-भांडुरा’चे काम : सिद्धरामय्या

0
4

वन खात्याचा आवश्यक तो परवाना मिळवल्यानंतर म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती काल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. काल विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते बोलत होते.

म्हादई जलतंटा लवादाने यापूर्वीच कळसा-भांडुरा या पेयजल प्रकल्पांतर्गत 3.90 टीएमसी एवढ्या पाण्याच्या वापरासाठी परवानगी दिली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

कर्नाटक सरकारच्या कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटक सरकार वळवू पाहत असल्याने गोव्याचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

या पार्श्वभूमीवर दै. ‘नवप्रभा’ने काल गोव्याचे जलसंसाधनमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम सुरू करणार आहोत असे म्हटले म्हणून त्यांना ते सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावरील पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. यदाकदाचित त्या दिवशी सुनावणी झाली नाही तर ती कुठल्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.