
येथील परळ एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील उड्डाण पुलावर काल सकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १३ पुरुष, ८ महिला व एका बालकासह २२ जण मरण पावले. तसेच ३३ जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकजण गंभीर आहेत. या स्थानकावर सकाळी १० वा. च्या सुमारास दोन्ही ट्रॅकवर एकाच वेळी ट्रेन आल्यामुळे मोठी गर्दी उडाली. त्यानंतर उड्डाण पुलावर क्षमतेपेक्षा प्रचंड गर्दी झाली व त्यातच अज्ञातांकडून पूल कोसळण्याची अफवा पसरविण्यात आल्याने पुलावरील प्रत्येकजण उतरण्याचे प्रयत्न करू लागल्याने गोंधळ उडाला व मोठी चेंगराचेंगरी झाली. पायाखाली तुडवले गेल्याने व श्वास कोंडून २२ लोकांचा मृत्यू झाला. पावसानेही या संकटात भर टाकली.
या दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दुःख व्यक्त केले आहे.
अतिशय अरुंद पूल, क्षमतेहून अधिक लोक त्यातच पाऊस यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य व रेल्वे प्रशासनाविरोधात विरोधकांनी टीका केली आहे.
या दुर्घटनेतील मृतांची नावे मुकेश मिश्रा, सचिन कदम, मयुरेश हळदणकर, अंकुश जैस्वाल, सुरेश जैस्वाल, ज्योतिबा चव्हाण, रोहित परब, ऍलेक्स कुरिया, हिलोनी देठिया, चंदन, गणेश सिंह, महम्मद शकील, मसूर आलम, शुभलता शेट्टी, सुजाता शेट्टी, श्रद्धा वरपे, मीना वरुणकर, तेरेसा फर्नांडिस
दुर्घटनेची उच्चस्तरीय
चौकशी होणार ः रेल्वेमंत्री
परळ चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली. दुर्घटनेतील मृतांप्रती त्यांनी दुःख व्यक्त केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेची राज्य सरकारतर्फे चौकशी केली जाणार व जबाबदार असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे कालच रेल्वे मंत्र्यांहस्ते उपनगरी ट्रेनच्या वेळापत्रकाचे उद्घाटन होणार होते. मात्र ते नंतर रद्द करण्यात आले.