कळंगुटहून झाले होते अपहरण
प्रभुवाडा-कळंगुट येथे राहणार्या एका परप्रांतीय युवकाने शेजारच्या एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर २४ तासांच्या आत स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताला जेरबंद केले. थिवी रेल्वे स्थानकानजीक १९ वर्षीय नसमूर शेख (वय १९) याला अटक करण्यात आली. तसेच त्यासोबत असलेल्या मुलीला तिच्या पालकांकडे देण्यात आले.
रविवारी मुलीच्या वडीलांनी कळंगुट पोलिसात आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यावर पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू केले. दरम्यान, येथील वाड्यावरील काही युवकांना संशयित नसमूर शेख या युवकाने तिला पळवून नेल्याचे समजताच त्यांनी थिवी रेल्वे स्थानकावर रविवारी संध्याकाळपासून शोधाशोध केली. पण ही दोघे त्यांना कुठेच सापडली नाही. त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद आढळला. पण मोबाईलवरून दोघे थिवी, शिरसई भागात असल्याचे ‘लोकेशन’ मिळाले. त्याबाबत खात्री झाल्यावर कळंगुटमधून युवकांनी आणि पोलिसांनी रात्रभर सर्व परिसर पिंजून काल सोमवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास शिरसई येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांनीही रविवारचा संपूर्ण दिवस आणि रात्र थिवी-शिरसई भागात फिरून काढली.
याबाबत कळंगुटचे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, संशयित नसमूर शेख हा बंगाल येथील असून त्या मुलीच्या घराशेजारीच भाडेकरू म्हणून इतर दोन कामगारांसमवेत राहत असे. शेख हा फ्लंबर म्हणून काम करतो. या दोघांची मैत्री असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि या मैत्रीच्या संबंधातूनच त्यानी त्या मुलीला फूस लावून पळवून नेली. आपल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडीलांनी देताच पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन हळर्णकर तसेच विजय पाळणी, गोविंद फटनाईक यांनी कळंगुटच्या युवकांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचून त्याना ताब्यात घेतले.
तसेच नसमूर शेख याने रविवारी पहाटे ३ वाजता तिच्या घराकडून अपहरण केले ते सरळ थिवी रेल्वे स्थानकावर आले तेथून रेल्वेत बसून आपल्या गावी जाण्याचा त्यांचा बेत होता. पण रेल्वे न आल्याने त्यांचा डाव फसला. नंतर त्यानी बसमधून मुंबईला जाण्याचाही प्रयत्न केला. पण तोही प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी लपून राहिले. असेही पोलीस निरीक्षक राजेशकुमार यांनी सांगितले.