परप्रांतीय प्रवाशांसाठी एसओपीत शिथिलता आणण्याचे कारण काय?

0
121

 

>> पर्यटकांना पायघड्या, गोमंतकीयांना शुल्क : सरदेसाई

परराज्यातून गोव्यात येणार्‍या प्रवाशांमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळू लागलेले असताना ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ आणखी कडक करायचे सोडून त्यात शिथिलता आणल्याबद्दल काल गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यानी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सोमवारपर्यंत (आज) ही शिथीलता जर मागे घेण्यात आली नाही तर आम्ही गप्प बसणार नाहीत असा इशाराही त्यानी सरकारला दिला.

जी सुधारित एसओपी आहे ती गोव्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग व्हावा यासाठीच तयार करण्यात आली आहे काय असे वाटावे अशीच असल्यासारखे सरदेसाई यानी पुढे स्पष्ट केले आहे. विमानातून येणार्‍या प्रवाशांविषयी सरकारला एवढा पुळका का, असा प्रश्‍न करून त्यांच्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’मध्ये सरकारने शिथिलता का आणली आहे, असा सवाल सरदेसाई यानी काल पत्रकारांना पाठवलेल्या एका व्हिडिओद्वारे केला.

परराज्यातून येणार्‍या प्रवाशांनी गोव्यात येतानाच आपण कोरोना मुक्त असल्याचे प्रमाणपत्र आपल्या राज्यातून आणल्यास सर्वांसाठीच ते चांगले होणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यानी जे म्हटले आहे ते योग्यच असून त्याबाबत गंभीरपणे विचार व्हायला हवा, असही सरदेसाई यानी म्हटले आहे.

राज्यात लॉकडाऊन व हॉटेल्स बंद असताना राज्य सरकार गोव्यात येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी पायघड्या का घालत आहे, असा संतप्त सवालही सरदेसाई यानी केला आहे. राज्य सरकार एका बाजूने गोव्यात येऊ पाहणार्‍या पर्यटकांसाठी पायघड्या घालत असताना गोव्यात परत येऊ पाहणार्‍या मूळ गोमंतकीयांना मात्र ते राज्यात आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे वसूल करून घेत आहे हे खेदजनक असल्याचे सरदेसाई यानी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्याऐवजी आता सरकारी
अधिकारी निर्णय घेऊ लागले
राज्यासाठीचे ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे राज्य सरकारने करायला हवे. मात्र, आता ते आरोग्य सचिव नीला मोहनन या करू लागल्या असल्याचे सरदेसाई म्हणाले. राज्य प्रशासनाचे जहाज बुडू लागले आहे असे दिसून आल्याने सावंत यानी ते सरकारी बाबूंकडे तर सुपूर्द केले नाही ना, असा सवालही सरदेसाई यानी केला.