परदेश प्रवासात विघ्ने ः व्हिजा तारखांचा घोळ

0
6
  • धनंजय जोग

परदेशी जाणारे प्रवासी जेव्हा काही कारणाने जाण्या-येण्याच्या तारखा बदलतात तेव्हा बदललेल्या, नव्या तारखांना सयुक्तिक व्हिजा प्रवास कंपनीनेच मिळविला पाहिजे. हे जर केले नाही तर परदेशात त्या देशाच्या नियमानुसार अनेक अडचणी उद्भवू शकतात.

एक जुनी म्हण आहे- ‘केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार॥’ मराठीत आहे पण संस्कृतचा प्रभाव स्पष्ट दिसतो. अर्थ असा की, प्रवास, ज्ञानी लोकांशी मैत्री आणि अनेकांना भेटणे हे ज्ञान मिळवण्याचे उत्तम मार्ग! आणि म्हणून सगळे भारतीय, त्यातल्या त्यात आपण गोवेकर प्रवास-प्रिय आहोत. गोव्यातील स्वयंपाकी आणि खलाशी जगभर फिरणाऱ्या जहाजांवर कित्येक वर्षे नोकऱ्या करत आहेत. अनेक भारतीय परदेशीदेखील स्थायिक झाले. पारतंत्र्याच्या काळात जुलुमी राजवटींखाली मात्र जनता तेव्हढा प्रवास करू शकली नाही- भुकेली रयत खाण्याची चिंता करणार का प्रवासाला जाणार?
गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक शतकांच्या गरिबीतून आपण वर येत असल्याची लक्षणे दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीची बातमी होती की, गेल्या 10 वर्षांत भारतातील 24 कोटी लोक गरिबीची रेषा ओलांडण्यात यशस्वी झाले आहेत. आज भारतीय पुनः केल्याने देशाटन… करताना दिसतात. अनेक देशांत आपली ओळख ‘खर्च करणारे पर्यटक’ अशी झाली आहे. सर्वसाधारणपणे आपण सरळमार्गी व शांतताप्रिय म्हणूनदेखील नावाजलेले आहोत.
तर अशा या पार्श्वभूमीवर प्रसाद पुजारी (सांकेतिक नावे) कुटुंबासह प्रवासास निघाला. गाजलेल्या आणि अतिगर्दीच्या ठिकाणी जायचे नाही असे ठरले. वेगळी अनोखी शहरे जिथे साधारण पर्यटक जात नाहीत ती निवडली गेली. या प्रवासदौऱ्याची संपूर्ण जबाबदारी प्रसादने ‘निसर्ग ट्रॅव्हल्स’ या आस्थापनावर सोपवली. प्रवास गोवा ते कायरो (इजिप्त), तेथून लारनाका (सायप्रस देश) आणि परतताना कायरोमार्गे दुबई आणि मग घरी गोव्यास परत असा ठरवला. ‘निसर्ग ट्रॅव्हल्स’ यांचे काम केवळ तिकिटे खरीदणे एवढेच नसून त्या-त्या देशांचे व्हिजा (प्रवेशाची परवानगी) मिळवणे आणि तेथील हॉटेल्सचे आरक्षण करणे हेदेखील होते. वाचकांनी जाणलेच असेल की या दौऱ्यावर इजिप्त, सायप्रस व संयुक्त अरब अमिरात (यूएई) या तीन देशांना भेटी द्यायच्या होत्या. निसर्ग ट्रॅव्हल्सचा व्यवस्थापक या नियोजनासाठी प्रसादशी अनेक दिवस संपर्क ठेवून होता. सोयीनुसार आणि उड्डाण वेळांच्या मर्यादा सांभाळून अनेक तारखा बदलल्या गेल्या; पण अखेर तारखा व हॉटेल बुकिंगसह सगळा कार्यक्रम ठरला.

वाचकांना समजलेच असेल की तीन वेगवेगळ्या देशांत प्रवास व प्रसादच्या सोयीच्या तारखा देऊ शकणारी कोणतीही एकच विमान कंपनी नव्हती, म्हणून ‘निसर्ग’ यांनी तिकिटांची खरेदी पुढीलप्रमाणे केली : गोवा- कायरो- लारनाका, परत कायरोमार्गे दुबई हा प्रवास ‘इजिप्त-एअर’च्या विमानांनी. दुबई ते मस्कतद्वारे गोवा ही तिकिटे ‘ओमान-एअर’ कंपनीची. येताना मस्कत येथील थांबा वाढल्यामुळे ‘निसर्ग’ यांनी प्रसादला सांगितले की या ठिकाणी तुम्हास विमान बदलून पुढील प्रवास करायचा आहे. तेथे 10 तासांच्या वर थांबा असल्यामुळे तेवढ्या वेळेसाठी एअरपोर्ट ते हॉटेल व परत जाणे-येणे हे विमान कंपनीतर्फे मोफत मिळेल. पण प्रसादने पहिले की, हातात मिळालेल्या कोणत्याही तिकिट वा कागदपत्रावर तसा उल्लेख नव्हता.

प्रसादने वरील गोष्ट लिखित स्वरूपात हातात असावी असा आग्रह धरताच मात्र ‘निसर्ग’ म्हणाले की ‘ओमान-एअर’ यांनी ही मोफत सोय देणे थांबवले आहे. अर्थात यामुळे परिस्थिती अशी झाली की, प्रसाद व कुटुंबाला मस्कत शहर पाहता येणार नव्हते. एवढेच नव्हे तर मस्कत एअरपोर्टवर पुढच्या विमानोड्डाणाची 10 तास प्रतीक्षा करत बसावे लागले असते. हे खूपच गैरसोयीचे होणार असल्याने प्रसादने मस्कत एअरपोर्टवर कमी वेळ थांबून दुसऱ्या एखाद्या विमानाने गोव्यात पोचता यावे अशी व्यवस्था करावी अशी ‘निसर्ग’ला विनंती केली. ठरलेल्या दिवशी हे शक्य नव्हते म्हणून मग दुबईत आणखी एक दिवस राहून पुढच्या दिवशी निघावे असे ठरले. असे केल्याने मस्कत येथे केवळ दोनच तास थांबावे लागले असते. त्यासाठी माणशी रु. 3200 वाढून त्यासह एकूण सगळे प्रवास, राहणे व व्हिजाचा खर्च रु. 2,43,000 प्रसादने दिला.

‘निसर्ग’ यांनी तीन देशांच्या- इजिप्त, सायप्रस आणि यूएई- व्हिजांसाठी मागितलेली स्वतःची व कुटुंबीयांची सगळी कागदपत्रे प्रसादने पुरवली. निघण्याच्या तारखेपेक्षा थोडे दिवस आधीच प्रसादला सगळी विमान तिकिटे व हॉटेल रिजर्व्हेशन्स हातात मिळाली. जातानाचा प्रवास (गोवा-कायरो-लारनाका) सुखरूप व अडचणींविना पार पडला. पण परतीच्या लारनाका- कायरो- दुबई या ‘इजिप्त-एअर’ विमानाच्या उड्डाणासाठी लारनाका विमानतळावर पोहोचताच पहिली अडचण उद्भवली. इजिप्त-एअर अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, या मंडळींच्या यूएईच्या (दुबई) व्हिजांमध्ये गफलत झालेली आहे. प्रसादच्या यूएई व्हिजाची तारीख त्याच दिवशी संपत होती. बायको व मुलीचा यूएई व्हिजा दोन दिवस आधी ते लारनाकामध्ये असतानाच संपलेला!
आपण परदेशी जातो तेव्हा त्या देशाचा व्हिजा आपल्या पासपोर्टवरच शिक्क्याच्या स्वरूपात उपलब्ध करतात. (अपवादात्मक कधी कागदावर व्हिजा मिळतो, पण तो कागद पासपोर्टलाच जोडतात). पासपोर्ट स्वतःकडेच असल्यामुळे व्हिजाच्या तारखा प्रवाशास माहीत असल्या पाहिजेत. पण अनेक देश आपल्या भाषेतच व्हिजाचा तपशील लिहितात. उदा. कतार, यूएई व आखाती देशांचा व्हिजा अरबी भाषेत असतो. फक्त शब्दच नाही तर त्या भाषेतील 1, 2, 3 इ. आकडेदेखील आपणास ओळखू येत नाहीत. ते जगभर व भारतातदेखील प्रचलित असलेल्या इंग्रजीतील आकड्यांपेक्षा वेगळे असतात. आणि म्हणूनच असे प्रवासी सहसा निसर्ग ट्रॅव्हल्स किंवा तत्सम अनुभवी प्रवास कंपनीवर हे काम सोपवतात. वाचकांनी लक्षात ठेवावे की, तुम्ही स्वतः जेव्हा अशा परदेश प्रवासास निघाल तेव्हा प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याच्या तारखा/वेळांव्यतिरिक्त त्या देशाच्या मिळालेल्या व्हिजाच्या तारखादेखील तपासा. अनेक देश फिरल्यामुळे माझा वैयक्तिक अनुभव असा की, थोडे जास्त पैसे खर्चावे पण अतिरिक्त काळाचा व्हिजा घ्यावा. उदा. पाच दिवस टोकियोला राहायचा कार्यक्रम बनविला आणि सात दिवसांचा व्हिजा घेतला तर सगळे ठीक असे वाटते. पण प्रत्यक्षात हवामान किंवा इतर कारणांमुळे उड्डाण रद्द झाले किंवा दुसरीकडे उतरवावे लागले आणि तुम्ही चार दिवस उशिरा टोकियोस पोहोचलात तर तीन दिवसांतच जमेल तेवढी स्थळे पाहून परतावे लागेल. त्याहून जास्त तफावत झाली तर एअरपोर्टवरूनच तुम्हास परत पाठविले जाईल.

अर्थात प्रसाद व कुटुंबीयांना परदेशप्रवासाचा जास्त अनुभव नव्हता. व्हिजामधील अरबी तारखा त्यांनी पडताळून तरी पाहिल्या असतील का याची शंकाच आहे. हे सगळे काम प्रसादने ‘निसर्ग’वर सोपवल्यामुळे (आणि त्यांनी या आयोजनाचा भरपूर मोबदला घेतल्यामुळे) निसर्ग ट्रॅवल्सनेच व्हिजा व प्रवास तारखांचा समन्वय साधणे आवश्यक होते. वर म्हटल्याप्रमाणे व्हिजा व त्या देशात आगमन आणि निघण्याच्या ठरलेल्या तारखा यांमध्ये संपूर्ण मेळ हवा. ‘निसर्ग’सारख्या प्रवास कंपन्यांना हे माहीत असायला हवे. होते असे की सुरुवातीस ठरलेल्या तारखांनुसार त्या-त्या देशांचे व्हिजा मिळवले जातात; पण कुटुंबासह जाणाऱ्या प्रवाशांना वेळोवेळी काही कामे/अडचणी उद्भवतात. असे होऊन प्रवासाच्या तारखा बदलल्यास नवीन तारखांनुसार व्हिजा मिळविणे आवश्यक. हे कधी विसरले जाते. ‘निसर्ग’च्या बाबतीत असेच घडले.

तर मग आपण प्रसाद आणि कुटुंबीयांचे पुढे काय झाले ते बघू. ते आजतागायत लारनाका (सायप्रस) येथेच अडकलेले आहेत की दुबईला जाणे विसरून आणि तेथील हॉटेल आरक्षणाच्या पैशांवर पाणी सोडून त्यांना लारनाकाहूनच थेट भारतात परतावे लागले? अर्थात नाही! एक-दोन शत्रू देश वगळता जगभर भारत व भारतीयांना प्रेम व आदर मिळतो. अभिमानाने सांगावेसे वाटते की, इजिप्त (ज्यास आपण हजारो वर्षांपासून ‘मिश्र देश’ म्हणून संबोधतो) व यूएईचे भारताशी उत्कृष्ट संबंध आहेत. प्रसाद व कुटुंबीयांनी एजिप्त-एअर अधिकाऱ्याला हे सांगून विनंती केली की, तुमच्या देशासारखेच आमचे यूएईशीदेखील मैत्रीपूर्ण नाते आहे. अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिले की यूएईने आमचा व्हिजा कधीच नाकारलेला नाही. नियोजनात आमच्याच चुकीमुळे व्हिजाच्या तारखा उलटून गेल्या आहेत. यामुळे तुम्ही, म्हणजेच इजिप्त-एअर यांनी आम्हास दुबईत उतरविले तर तुमच्या देशाचे व यूएईचे संबंध कदापि बिघडणार नाहीत. प्रसादचे हे संयमपूर्ण आणि हुशारीचे बोलणे संबंधित अधिकाऱ्यांना पटले व अशा तऱ्हेने ते दुबईस पोहोचले.

दुबई येथे अर्थात व्हिजाच्या तारखा उलटल्यामुळे सुरुवातीस त्यांना एअरपोर्टवरूनच पुढे मायदेशी जाण्यास सांगितले गेले. सध्या आपले या देशाशी संबंध चांगले आहेत हे वर म्हटले आहेच. एव्हढे की या अधिकृतपणे इस्लामी देशात हल्लीच मोठे मंदिर बांधण्याची त्यांनी परवानगी दिली व उद्घाटनास आपल्या मा. प्रधानमंत्र्यांना बोलविले. येथे भारतीयांचे स्वागत केवळ पर्यटक म्हणून नव्हे तर पूर्ण वेळ राहून नोकऱ्या करण्यासाठीदेखील होते. भारतीय हे सहसा व्यवहारात सचोटीचे व प्रामाणिक असल्यामुळे येथील अनेक आस्थापने, बँका व सरकारी खात्यांमध्येदेखील भारतीय काम करताना दिसतात. यामुळे प्रसादने दुबई विमानतळाच्या व्हिजा अधिकाऱ्यास भेटून विनंती केली. या सहृदयी गृहस्थाने बदललेल्या प्रवास तारखा, त्यामुळे संपलेला व्हिजा व केलेले हॉटेल रिजर्व्हेशन हे सगळे पाहिले तेव्हा त्याने ओळखले की हे बेकायदेशीर वास्तव्यास आलेले लोक नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या नियमानुसार व आपला अधिकार वापरून त्याने 1485 दिऱ्हम (अदमासे रु. 35,000) आकारून 96 तासांचा व्हिजा दिला. असे चार दिवस दुबईत राहून- मूळच्या ‘ओमान-एअर’च्या तिकिटाची मुदत संपल्याने- प्रसाद मग एअर इंडियाची तिकिटे खरेदी करून घरी परतला.

प्रसाद जेव्हा निसर्ग ट्रॅव्हल्सविरुद्ध आयोगात आला तेव्हा आम्हास हे सगळे कळले. प्रार्थनेत त्याने अतिरिक्त करावा लागलेला खर्च व मनस्ताप इ.साठी भरपाई म्हणून रु. 16 लाख मागितले. दोन्ही बाजूच्या वकिलांनी लेखी निवेदने दिली व तोंडी युक्तिवाद ऐकविले. वर म्हटल्याप्रमाणे व्हिजा व प्रवास तारखांमध्ये मेळ राखण्याची जबाबदारी ‘निसर्ग’ यांची होती यात संशय नाही. परदेशी जाणारे प्रवासी जेव्हा काही कारणाने जाण्या-येण्याच्या तारखा बदलतात तेव्हा बदललेल्या, नव्या तारखांना सयुक्तिक व्हिजा प्रवास कंपनीनेच मिळविला पाहिजे. हे जर केले नाही तर परदेशात त्या देशाच्या नियमानुसार अनेक अडचणी उद्भवू शकतात. निसर्ग ट्रॅव्हल्स यात कमी पडले. यामुळेच प्रसाद व कुटुंबीयांना आर्थिक नुकसानी, अडचणी व मनस्ताप झाला म्हणून त्यास आम्ही रु. 4 लाख भरपाई व रु. 15,000 खर्च देवविला.

योग्य कालावधीचा व्हिजा असण्याचे महत्त्व कदापि कमी लेखले जाऊ नये. आजच्या प्रकरणातील प्रसादचे नशीब असे की तो बायको व मुलीसोबत होता. जगभरचे हुशार विमानतळ अधिकारी हे प्रवासी व्यक्तींना पाहून व त्यांच्याशी बोलून हेतू ओळखू शकतात. नियोजनात चुकलेले पण सभ्य असे हे कुटुंब आहे ही गोष्ट अधिकाऱ्याने ओळखली व मोठी अडचण आली नाही. एवढेच नव्हे तर त्याने स्वतःच्या जबाबदारीवर चार दिवसांचा व्हिजा दिला.
एखाद्या वाचकाला या प्रकरणाविषयी किंवा आधीच्या लेखांविषयी काही प्रश्न विचारायचे असल्यास वा टिप्पणी करायची असल्यास अथवा ग्राहक आयोगात फिर्याद करायची असल्यास मी थोडक्यात मार्गदर्शन करू शकेन. त्यासाठी ई-मेल ः वरपक्षेसऽूरहेे.लेा