परतीच्या प्रवासापूर्वी मान्सूनने राज्याला झोडपले

0
3

>> दिवसभरात 3 इंच पावसाची नोंद; भातशेतीच्या नुकसानीची शक्यता; आतापर्यंत 170 इंच पाऊस

मुसळधार पावसाने काल राजधानी पणजीसह राज्यातील विविध भागांना झोडपून काढले. काल सकाळपासून दुपारपर्यंत राज्यात सुमारे 3 इंचाहून अधिक पाऊस बरसला. परिणामी राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. काल जोरदार कोसळलेल्या पावसामुळे राज्यातील विविध भागांतील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांची गैरसोय झाली. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्रही पहावयास मिळाले. या पावसामुळे जवळपास कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे मोठे नुकसान होणार आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढला होता. मंगळवारी सकाळी काही वेळ विश्रांतीनंतर 8.30 वाजल्यापासुन पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यातील बऱ्याच भागांत पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यानंर मात्र पावसाचा जोर कमी झाला.
राजधानी पणजीतील बसस्थानक, तसेच जवळपासच्या पाटो परिसरात पाणी तुंबून राहिल्याने नोकरदार वर्ग तसेच अन्य प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. पाणी तुंबून राहिलेल्या रस्त्यावरून जाताना दुचाकीचालकांची बरीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे अटलसेतूवर साचलेल्या पावसाच्या पाण्याची मोठी धार पणजीतील बसस्थानकाजवळील रस्त्यावर कोसळत असल्यानेही प्रवाशांचे हाल झाले. पर्वरी येथे रस्ता पाण्याखाली आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली.
राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळल्याने रस्ते पाण्याखाली गेले, तसेच झाडे उन्मळून पडणे आणि नद्यांच्या पाण्याचा स्तर वाढणे अशा घटनाही घडल्या.

फोंड्यात सर्वाधिक पाऊस
राज्यात काल सर्वाधिक 79 मि.मी. एवढा पाऊस फोंड्यात कोसळला. मडगाव शहरात 45 मि.मी., दाबोळीत 27.2 मि.मी., तर काणकोण येथे 24.3 मि.मी एवढा पाऊस कोसळला. यंदाच्या मोसमात वाळपई येथे सर्वाधिक 215 इंच पाऊस कोसळला आहे.

आतापर्यंत 170 इंच पाऊस
गोव्यात यंदाच्या हंगामात जून महिन्यापासून आतापर्यंत 170 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा पडलेला पाऊस हा 43.7 टक्के एवढा अधिक आहे.

भातशेतीचे नुकसान
काल कोसळलेल्या जोरदार पावसामुळे जवळपास तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे भातशेती आडवी झाली असून, ती कुजून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.