परकीयांनी लुटले नसेल तेवढे राजकारण्यांनी लुटले

0
69

आमच्या वर्गांत मिस्तीस म्हणजे मिश्र वंशाची मुले असायची. ती एवढी उन्मत्त असत. त्यांना वाटे की आम्ही भारतीय कुचकामी आहोत. आमच्या लोकांना मारणे, चिडवणे, कळ काढणे हेच त्यांचे काम होते. सामान्य गावडे स्त्रियांचा विनयभंग करणे, टोपी घातलेले, धोतर नेसलेले कोणी दिसले की त्यांची टिंगलटवाळी करणे हे प्रकार ते सतत करीत. पोर्तुगिज राजवटीत त्यांना जणू मुक्तहस्त होता. त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नव्हती. मी ह्या अन्यायाविरुद्ध सक्रिय झालो.

* १९४७ साली आपला भारत स्वतंत्र झाला, पण गोवा मुक्त व्हायला १९६१ साल का उजाडावे लागले?

** कारण भारताचे धोरण. केवळ भारताचे धोरण त्याला कारणीभूत होते. भारत सरकार ठाम नव्हते. नेते म्हणून आज पंडित नेहरूंना खूप मोठी मान्यता आहे, पण का हे मलाच कळत नाही. नेहरूंपाशी निर्णयक्षमता नव्हती असे माझे मत आहे. आजही आपल्या नेत्यांचे हेच चालले आहे. अपवाद फक्त इंदिरा गांधींचा. नेहरू आणि तत्कालीन भारतीय नेते जगाला भीत होते. अमेरिका काय म्हणेल, काय करील या भीतीतच ते वावरायचे आणि राष्ट्र चालवायचे. गोव्यातील क्रांतिकारकांनाही ते काही करू देत नव्हते आणि स्वतःही काही करायला बघत नव्हते. आजही आपले नेते असेच वागत नाहीत का? एवढेसे पाकिस्तान आपल्याला तर्‍हेतर्‍हेने त्रास देते आणि देतच राहणार आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र मेणाहून मऊ. शत्रूचा समर्थपणे मुकाबला करण्याची इच्छाच त्या राज्यकर्त्यांना नाही. ताकद खूप आहे, परंतु इच्छाशक्ती नाही. मला आजही वाटते की भारताचे नेतृत्व खूपच पोकळ आहे. पुढार्‍यांच्या व्यक्तिमत्त्वाची छापच पडत नाही. धोरणही फार मिळमिळीत असते.

१९५४ साली आम्ही नगरहवेली मुक्त केली. आमच्यापाशी भरपूर दारूगोळा, हत्यारे होती. आमच्याकडे माणसेही होती. तेव्हाच गोवा आणि दमण, दीवही मुक्त झाले असते, पण भारत सरकारने आमच्यावरच बंदी घातली. त्यामुळे इच्छा असूनही काही करता आले नाही.

* आपण गांधीवाद सोडून क्रांतीवाद का स्वीकारलात?

** मीही प्रारंभी गांधीवादी होतो. अहिंसा, सत्याग्रहावर विश्वास होता आणि तसाच वागायचो. पण नंतर नंतर आम्हाला जाणवू लागले की अहिंसेचा हा मार्ग पोर्तुगिजांना समजत नाही. त्यामुळे त्यानंतर मी क्रांतीचा मार्ग अनुसरला. पोर्तुगिजांच्या लेखी अहिंसेला काही किंमत नव्हती. ते म्हणायचे की, ‘‘कोण गांधी? एका गोळीत आम्ही त्यांना संपवू’’ त्यामुळे आम्ही पोर्तुगिजांना जो हिंसेचा मार्ग कळे, तोच अवलंबिला.

* भारताने अहिंसेच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळवले नव्हते का?

** दोन्ही मार्गांनी. सत्याग्रही मार्गाने आणि क्रांतीकारी मार्गानेसुद्धा. संपूर्ण जगभरातून ब्रिटिशांवर दबाव वाढला होता. जनतेमध्येही असंतोष निर्माण झाला होता, नौदलातही बंड झाले. त्यामुळे त्यांना भारत सोडावा लागला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशकार्याने ब्रिटीश सत्ता हादरली होती. त्यांना उमगले होते की आता भारत सोडण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केवळ अहिंसेने, सत्याग्रहांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येत नाही. भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांचे योगदानही खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे.

* आजच्या गोव्याची स्थिती पाहिल्यास आपण पुन्हा सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक गुलामगिरीकडे चाललो आहोत असे वाटते का?

** आपण फक्त पैशाचे प्रेमी झालो आहोत. संपत्तीपुढे आपले राज्य, राष्ट्र कशाचेही काही वाटेनासे झाले आहे. आपल्या लोकांमध्ये आज राष्ट्रभक्ती असती, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला नसता. विदेशांत काळा पैसा गेला नसता. चारित्र्यसंपन्न माणसे लोप पावू लागली आहेत. ही एक प्रकारची गुलामगिरीच आहे. सध्या राजकारणात प्रवेश करणारे बहुसंख्य हे लोकांचे नव्हे, तर स्वतःचेच भले करू पाहत आहेत. ‘‘आवो जावो हिंदुस्थान आपका. लूट लो’’ अशी स्थिती झाली आहे. मला तर वाटले की ब्रिटिशांनीही लुटले नसेल, तेवढे आजचे राजकारणी भारताला लुटत आहेत.

* या परिस्थितीतून देशाला वर काढायचे असेल तर त्यासाठी तरुण पिढीने काय करावे असे आपल्याला वाटते?

** आज तरुणांना संदेश द्यायचा तर एकच देईन. तो म्हणजे, आजचे नेतृत्व नाटकी आहे. तुम्ही त्यांची जागा घ्या. भारताचे राजकारण पुन्हा मार्गावर आणा. देश शक्तिशाली बनवा, महासत्ता बनवा. देशाला भ्रष्टाचाराची जी कीड लागली आहे, ती मुळासकट उखडून टाका. तरुणांवरच या देशाचे भवितव्य अवलंबून आहे असे मला वाटते. सध्याच्या राजकारण्यांनी करून ठेवलेली भ्रष्टाचाराची घाण स्वच्छ करा. कर्करोगासारखा तो वाढत चालला आहे. तो थांबवा. आज स्थिती अशी आहे की एकही सरकारी कार्यालय भ्रष्टाचार आणि लाचलुचपतमुक्त नाही. हे सारे स्वच्छ करायचे आहे आणि हे सगळे कार्य तरुणांना करायचे आहे. भारताचे भविष्य तुमच्या हाती आहे. बस् एवढेच!..