पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे निधन

0
219

गोव्यातील सुप्रसिद्ध लेखक, शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक, बहुभाषा कोविद अशी ओळख असलेले कोकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर (८४) यांचे अल्पकालीन आजाराने काल पणजीतील एका खासगी रुग्णालयात दुपारी २ वा. निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते.
२२ मार्च १९३५ रोजी त्यांचा बोरी येथे जन्म झाला. गोवा मुंबई, पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर (एमए बीटी) पदवी घेतली. १९५६ ते ६० या काळात त्यांनी मुंबासा, केनिया येथे अध्यापन केले. त्यानंतर त्यांचे वडील गुंडू आमोणकर यांनी स्थापन केलेल्या न्यू गोवा विद्यालयात (आताचे जी. एस. आमोणकर विद्यामंदिर) अध्यापनाचे कार्य केले. १९९६ मध्ये ते मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले.

राजकारणातही त्यांनी सहभाग दिला होता. म्हापसा पालिकेचे ते ११ वर्षे सदस्य होते तसेच १ वर्ष नगराध्यक्षही होते.
सुरेश आमोणकर यांनी शिक्षण व साहित्य या क्षेत्रात चांगले योगदान दिलेले असून गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे. तसेच कोकणी साहित्य क्षेत्रात मोठे योगदान देताना त्यानी ज्ञानेश्‍वरी, भगवद्गीता, धम्मपद व गोस्पल ऑफ जिझस या ग्रंथांचा कोकणी अनुवाद करण्याचे मोठे काम केलेले आहे.

‘धम्मपद’ ह्या ग्रंथाच्या कोकणी अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. राज्य सरकारने त्यांना उत्कृष्ट राज्य शिक्षक पुरस्कारानेही सन्मानित केलेले आहे. त्याशिवाय त्यांना ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. राज्य साक्षरता मिशन व प्रौढ शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून तसेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता. भाषा चळवळीतही सुरेश आमोणकर यांनी योगदान दिलेले असून संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले आमोणकर हे अत्यंत विजिगीषू वृत्तीचे लेखक व शिक्षणतज्ज्ञ होते. तब्बल चार वेळा कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी यशस्वी लढा दिलेल्या या ऋषितुल्य व्यक्तीने ‘धम्मपद’ या बौध्द धर्मियांच्या धर्मग्रंथाचा कोकणी अनुवाद करण्यासाठी पाली भाषा शिकून घेतली होती.

शेक्सपियरच्या निवडक नाटकांचा कोकणी अनुवाद करायचे कामही त्यांनी हातात घेतले होते. त्याची सुरुवात म्हणून शेक्सपियरच्या विविध नाटकातील प्रसिध्द संवाद, म्हणी यांचे संकलन करून त्यानी कोकणी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन केले होते. वर्षभरापूर्वीच त्यांची गोवा कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. ते कोकणी भाषाभिमानी असले तरी त्यांच्या मनात मराठी विषयी कधीच द्वेष नव्हता. मराठीप्रेमींशी त्यांचे शेवटपर्यंत मैत्रिपूर्ण संबंध होते. त्यांचे पार्थिव आज सोमवारी अंत्यदर्शनासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंत आमोणकर विद्यामंदिर, म्हापसा येथे ठेवण्यात येणार आहे.

सुरेश आमोणकर यांच्या निधनावर कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष व साहित्यिक एन्. शिवदास, बिंब प्रकाशनचे मालक व साहित्यिक दिलीप बोरकर, माजी केंद्रिय कायदा मंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी दु:ख व्यक्त केले आहे.