पद्मविभूषण पं. जसराज यांचे निधन

0
409

>> भारतीय शास्त्रीय संगीताचा तारा निखळला

>> देशविदेशातील भारतीय शास्त्रीय संगीतविश्वावर शोककळा

ख्यातनाम भारतीय शास्त्रीय गायक पद्मविभूषण पं. जसराज यांचे काल अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. जवळजवळ आठ दशकांच्या त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये त्यांना असंख्य मानसन्मानांनी गौरविले गेले होते. गेल्याच वर्षी त्यांचे नाव अंतराळातील एका ग्रहालाही देण्यात आले होते. भारतीय शास्त्रीय संगीताची धुरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात योगदान दिलेल्या या महान शास्त्रीय गायकाच्या मृत्यूमुळे भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

पं. जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी हरयाणातील हिसार जिल्ह्यात पिली मंडोरी या गावी झाला. पिता पं. मोतीराम यांनी त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे दिले. शास्त्रीय संगीताच्या मेवाती घराण्याचे अनुयायी असलेल्या पं. जसराज यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीत देश – विदेशामध्ये हजारो संगीत मैफली करून रसिकांना रिझवले. त्यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या कित्येक ध्वनिमुद्रिका निघाल्या. भारत, कॅनडा व अमेरिकेत ते शास्त्रीय संगीत शिकवीत असत. पं. संजीव अभ्यंकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, सुविख्यात व्हायोलीनवादक कला रामनाथ यांच्यासारखे अनेक शिष्यही त्यांनी घडवले.

चित्रपती व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा शांताराम यांच्याशी जसराजयांचा विवाह झाला होता. त्यांच्या कन्या दुर्गा जसराज यांनी पं. जसराज यांचे काल अमेरिकेत निधन झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.

पं. जसराज यांचे बालपण हैदराबादेत गेले. त्यानंतर मेवाती घराण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी त्यांनी गुजरातमधील साणंद गाठले. महाराज जसवंत सिंग वाघेला या साणंदच्या ठाकुरसाहेबांच्या बैठकीत पं. जसराज गवय्ये होते. त्यांच्याकडून त्यांनी संगीतविद्या संपादन केली. ४६ साली पं. जसराज कोलकात्याला गेले व आकाशवाणीसाठी शास्त्रीय संगीत कारकिर्दीस प्रारंभ केला.

ख्यालगायकीसाठी प्रख्यात असलेल्या मेवाती घराण्याचे संस्कार जरी जसराज यांच्यावर झाले असले तरी ठुमरीसारख्या संगीतप्रकारांवरही त्यांची नाममुद्रा होती. आपल्या गायकीत इतर घराण्यांचे संस्कार आणल्याबद्दल त्यांच्यावर सुरवातीला टीकाही होत असे. पं. जसराज यांनी ‘जसरांगी’ नामक जुगलबंदीला साकारले, जी मूर्च्छना या प्राचीन भारतीय संगीतरचनेवर आधारित होती व त्यात पुरुष व स्त्री गायिका एकाचवेळी विभिन्न राग आळवतात. अबिरी तोडीसारख्या दुर्मीळ रागांनाही जसराज यांनी प्रकाशात आणले.

अलौकिक गायक आणि
इतरांचे प्रेरणास्थान ः मोदी
पं. जसराज यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतविश्वामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे गायन अलौकिक तर होतेच, शिवाय इतर अनेक गायकांचे ते प्रेरणास्थानही होते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.