पदार्पणातील शतकवीर

0
123
– सुधाकर नाईक
कसोटी पदार्पणात तब्ब्ल पंधरा फलंदाजांनी तीन अंकी जादुई आकडा पार करण्याची मर्दुमकी गाजविली पण यातील सात भारतीय दिग्गजांना मात्र कसोटी पदार्पणातील शतकानंतर कारकिर्दीत पुन्हा तीन अंकी जादुई आकडा पार करण्यात यश आले नाही.
भारतीय क्रिकेटचा इतिहास अत्यंत रोमांचक असून अनेक भारतीय दिग्गजांनी आपल्या अजोड कामगिरीने तो संस्मरणीय बनविला आहे. कसोटी पदार्पणात शतक हा उमद्या क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण असतो. आतापर्यंत पंधरा भारतीय फलंदाजांनी हा भीमपराक्रम नोंदवीत आपल्या अजोड कामगिरीने जागतिक स्तरावर नामना प्राप्त केलेली आहे. इंग्लंडविरुध्द लॉर्डसवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा सुरू केलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत ५४५ कसोटी सामने खेळले असून १५७ विजय नोंदले. १६७ कसोटीत भारताला हार पत्करावी लागली तर १ सामना टाय आणि २१७ अनिर्णित राहिले. भारतीय क्रिकेटच्या या आजवरच्या इतिहासात अनेक नामवंत क्रिकेटपटूंनी अजोड कामगिरीत आपला ठसा उमटविलेला आहे. कसोटी पदार्पणात तब्ब्ल पंधरा फलंदाजांनी तीन अंकी जादुई आकडा पार करण्याची मर्दुमकी गाजविली पण यातील सात भारतीय दिग्गजांना मात्र कसोटी पदार्पणातील शतकानंतर कारकिर्दीत पुन्हा तीन अंकी जादुई आकडा पार करण्यात यश आले नाही.
भारतातर्फे पहिले कसोटी शतक नोंदण्याचा मान मिळविलेले लाला अमरनाथ यांच्यासह दीपक शोधन, ए. जी. कृपाल सिंह, अब्बास अली बेग, हनुमंत सिंह, सुरिंदर अमरनाथ आणि प्रवीण आम्रे आदी सातजणांना पदार्पणातील शतकानंतर परत हा जादुई आकडा पार करता आला नाही. गुंडाप्पा विश्‍वनाथ, मोहम्मद अझरुद्दिन, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा आणि सर्वात कमी वयात शतक नोंदण्याचा मान मिळविलेला पृथ्वी शॉ आदी अन्य फलंदाजांनीही कसोटी पदार्पणात शतक ठोकण्याचा भीम पराक्रम केलेला आहे.
लाला अमरनाथ : माजी भारतीय कर्णधार लाला अमरनाथ यांनी भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिले शतक झळकविण्याचा मान मिळविला आहे. अमरनाथ यांनी १९३३ मध्ये इंग्लंडविरुध्द बॉंबे जिमखान्यावर दुसर्‍या डावात ११८ धावा ठोकीत इतिहास रचला, पण नंतर २३ कसोटीत त्यांना तीन अंकी जादुई आकड्यांनी सतत हुलकावणी दिली. अमरनाथजींनी कारकिर्दीतील २४ कसोटीत १ शतक आणि ४ अर्धशतके नोंदली.
दीपक शोधन : दीपक शोधन यांनी आपला पहिला कसोटी सामना १९५२ मध्ये कोलकाता येथे पाकिस्तानविरुध्द खेळला. विशेष म्हणजे आठव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या या जिगरबाज क्रिकेटपटूने पदार्पणात शतक झळकविण्याची किमया साधली. दीपन शोधन यांना कारकीर्दीत केवळ तीनच कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे त्यामुळेही असेल कदाचित त्याना परत तीन अंकी जादुई आकडा गाठण्यात यश आले नाही. आपल्या पदार्पणातील कसोटीत शोधन यांनी ११० धावांची बहुमूल्य खेळी केली.
ए. जी.कृपाल सिंह : कृपाल सिंह यांनी १९५५ मध्ये हैदराबाद येथे न्युझिलंडविरुध्द कसोटी पदार्पणात नाबाद १०० धावा ठोकल्या. कृपाल सिंह यांनी त्यानंतर १४ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले पण जादुई तीन अंकी धावसंख्या ओलांडण्यात त्यांनाही यश आले नाही. कारकिर्दीतील १४ कसोटीत कृपाल सिंहजींनी १ शतक आणि २ अर्धशतकांसह ४२२ धावा नोंदल्या.
अब्बास अली बेग : १९५६ मध्ये इंग्लंडविरुध्द अब्बास अली बेग यांनी कसोटी पदार्पणात शतक नोंदण्याचा मान मिळविला. विजय मांजरेकर जायबंदी झाल्याने युवा अब्बास यांना भारतीय संघात स्थान मिळाले आणि त्यांनी या संधीचे सोने बनविताना मँचेस्टर कसोटीत इंग्लिश गोलंदाजीचा सामना करीत ११२ धावा नोंदल्या. विशेष म्हणजे २० वर्षीय बेग यांनी पदार्पणात शतक नोंदणारा सर्वात युवा भारतीय फलंदाज बनण्याचा मान मिळविला. नंतर पृथ्वी शॉने २०१८ मध्ये त्यांचा विक्रम मोडला. अब्बास अली बेग भारतातर्फे १० कसोटी सामने खेळले पण नंतर त्यांना शतक नोंदण्याची किमया परत साधली नाही.
हनुमंत सिंह : हनुमंत सिंह यांनी १९६४ मध्ये इंग्लंडविरुध्द कसोटी पदार्पणात शतक नोंदण्याचा पराक्रम नोंदला. दिल्ली येथील या कसोटीत हनुमंत सिंह यांनी १०५ धावांची अप्रतिम खेळी केली पण नंतर १४ कसोटीत त्याना परत तीन अंकी जादुई आकडा गाठण्यात यश आले नाही. हनुमत सिंह यांनी कारकिर्दीतील १४ कसोटीत पाच अर्धशतकेही झळकविली.
सुरिंदर अमरनाथ : सुरिंदर अमरनाथ यांनी १९७६ मध्ये न्युझिलंडविरुध्द कसोटी पदार्पणात कसोटी शतक झळकविले. पण सुरिंदर यांना आपले पिताजी लाला अमरनाथ यांच्याप्रमाणे कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय शतक नोंदण्यात यश आले नाही. पंधराव्या वर्षी रणजी पदार्पण केलेल्या सुरिंदर यांच्याकडे दर्जेदार फलंदाज म्हणून पाहिले जात होते आणि न्युझिलंड दौर्‍यातील ऑकलंड कसोटीत त्यांनी पदार्पणातील सामन्यात १२४ धावा चोपल्या. त्यानंतर ते १० कसोटी सामने खेळले पण तीन अंकी जादुई आकड्यानी मात्र सतत हुलकावणी दिली. सुरिंदर यांनी कारकिर्दीतील दहा सामन्यांत पदार्पणातील शतकासह अन्य ३ अर्धशतकेही नोंदली.
प्रवीण आम्रे : प्रवीण आम्रे यांनी १०९२ मध्ये द. आफ्रिकेविरुध्द कसोटी पदार्पणात शतक नोंदण्याचा पराक्रम गाजविला. तब्बल १२ कसोटी सामने राखीव राहिलेल्या प्रवीण यांना दर्बान कसोटीत प्रशिक्षक अजित वाडेकर यांनी संधी दिली आणि या संधीचे सोने करीत आम्रे यांनी झुंजार १०३ धावा ठोकातानाच ३ बाद ३८ या बिकट स्थितीतून भारतीय संघाला सावरले. प्रवीण यांनी नंतर ११ कसोटीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले पण परत जादुई तीन अंकी आकडा गाठण्यात यश आले नाही. ३७ वन-डे सामन्यांतही भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आम्रे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणातील शतकासह तीन अर्धशतकेही नोेंदली.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांनी आपल्या अजोड कामगिरीने आपला ठसा उमटविलेला असून पदार्पणात असफल ठरलेल्यानीही जागतिक क्रिकेटमध्ये आपले श्रेष्ठत्व प्रगटविलेले आहे. पण पदार्पणात शतकी खेळी ही विलक्षण बाब असून अशी कामगिरी बजावणार्‍या भारतीय फलंदाजांना प्रणाम!
कसोटी पदार्पणात शतक नोंदलेले भारतीय फलंदाज
फलंदाज प्रतिस्पर्धी  धावा साल
१. लाला अमरनाथ ११८ इंग्लंड   १९३३
२. दीपक शोधन ११० पाकिस्तान   १९५२
३. ए. जी. कृपाल सिंह (नाबाद) १०० न्युझिलंड १९५५
४. अब्बास अली बेग ११२ इंग्लंड   १९५९
५. हनुमंत सिंह १०५ इंग्लंड   १९६४
६. गुंडाप्पा विश्‍वनाथ   १३७ ऑस्ट्रेलिया   १९६९
७. सुरिंदर अमरनाथ १२४ न्यूझिलंड १९७६
८. मोहम्मद अझरुद्दिन १० इंग्लंड १९८४
९. प्रवीण आम्रे १०३ द. आफ्रिका १९९२|९३
१०. सौरव गांगुली १३१ इंग्लंड १९९६
११. वीरेंद्र सेहवाग १०५ द. आफ्रिका २००१
१२. सुरेश रैना १४० श्रीलंका २०१०
१३. शिखर धवन १८७ ऑस्ट्रेलिया २०१३
१४. रोहित शर्मा १७७ वेस्ट इंडीज २०१३
 १५. पृथ्वी शॉ १३४ वेस्ट इंडीज २०१८