पत्रादेवी स्मारकावर 74 हुतात्म्यांची नावे कोरणार

0
3

>> मुख्यमंत्र्यांची माहिती, मुक्तीलढ्यातील 15 शहिदांचा मरणोत्तर सन्मान

पत्रादेवी येथील स्मारकाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गोवा स्वातत्र्यलढ्यात शहीद झालेल्या सर्व 74 हुतात्म्यांची नावे पत्रादेवी येथील स्मारकावर ठळक अक्षरात लिहिली जाणार आहेत. गोवा मुक्त करण्यासाठी शहीद झालेल्या या शूरवीरांची गाथा पुढील पिढीला कळावी व त्यांचा विसर पडू नये यासाठी ते महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

काल मंत्रालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात गोवा स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी शहीद झालेल्या 15 स्वातंत्र्यसेनानींचा मरणोत्तर सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील उद्गार काढले. या कार्यक्रमात 15 हुतात्म्यांचा सन्मान होणार होता. मात्र, त्यापैकी 12 हुतात्म्यांचे नातेवाईक हजर राहिल्याने अन्यांचा सन्मान होऊ शकला नाही.

यावेळी मुख्यमंत्र्यांहस्ते 12 हुतात्म्यांच्या पहिल्या पिढीतील व्यक्तींना प्रत्येकी 10 लाख रु. व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी हुतात्मा बाळा राया मापारी यांच्यावतीने त्यांची कन्या लक्ष्मी आगरवाडेकर, बसवराज हुडगी यांच्यावतीने त्यांचे पुत्र दिलीप कुमार, शेषनाथ वाडेकर यांच्यावतीने त्यांचे नातू कुणाल वाडेकर, तुळशीदास हिरवे यांच्यावतीने त्यांचे पुत्र प्रदीप हिरवे, सखाराम शिरोडकर यांच्यावतीने त्यांचे पुत्र हनुमंत शिरोडकर, रोहदास मापारी यांच्यावतीने त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर मापारी, यशवंत आगरवाडेकर यांच्यावतीने त्यांचे पुत्र रामदास आगरवाडेकर, रामचंद्र नेवगी यांच्यावतीने त्यांची कन्या माणिक शिरोडकर व पुत्र सुरेश नेवगी, बापू विष्णू गावस यांच्यावतीने त्यांचे पुत्र मनोहर गावस, लक्ष्मण वेलिंगकर यांच्यावतीने त्यांचे पुत्र नारायण वेलिंगकर, केशव टेंगसे यांच्यावतीने त्यांचे पुत्र विनायक टेंगसे व परशुराम आचार्य यांच्यावतीने त्यांचे पुत्र अनिल आचार्य यांनी सन्मान स्वीकारला.

गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांनी, गेल्या 60 वर्षांच्या काळात एकाही मुख्यमंत्र्याला गोवा स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करावा असे वाटले नाही. मात्र, आताचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांचा मरणोत्तर सत्कार करण्याचे कार्य केलेले असून हे फार मोठे काम असल्याचे सांगितले.यावेळी हुतात्मा तुळशीदास हिरवे यांचे पुत्र प्रदीप हिरवे, हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांचे पुत्र कुणाल वाडेकर व हुतात्मा रामचंद्र नेवगी यांचे पुत्र सुभाष नेवगी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले.