– गंगाराम म्हांबरे, माजी संपादक, दैनिक गोवादूत
एका पत्रकाराने निवृत्तीनंतर ‘पत्रकारितेकडून जनतेच्या अपेक्षां’ संबंधी लिहावे हे अनेकांना खटकणारे असेल, हे जरी खरे असले तरी पत्रकारितेला रामराम ठोकल्यानंतरही लेखनासाठी असे (किंवा कोणतेही) विषय निवडण्यात गैर काही नाही, असे वाटल्यानेच हा लेखप्रपंच. लेखाचा विषय ‘पत्रकारांकडून अपेक्षा’ असा नाही हेही लक्षात घ्यावे. पत्रकारिता हा सध्या व्यापक आणि तेवढाच गुंतागुंतीचा विषय बनला आहे. पत्रकारांवर सतत येणारे दडपण जेवढे धोकादायक ठरत आहे, तेवढीच पत्रकारांची होणारी उपेक्षाही चिंताजनक आहे.
सरकारी पातळीवरील अशा अनास्थेच्याही बातम्या आता वृत्तपत्रांना द्याव्या लागत आहेत, त्यामुळे या स्थितीत ते वाचकांच्या (जनतेच्या) अपेक्षा किती प्रमाणात पूर्ण करू शकतील, असा प्रश्न उपस्थित होतो.आपल्या प्रतिनिधीने रोज काही तरी नवे वाचकांसाठी आणावे, अशी संपादकांची अपेक्षा असते. वाचकाचीही रोज काही तरी वेगळे वाचायला मिळावे, अशीच अपेक्षा असते. सकाळपासून रात्रीपर्यंत दूरचित्रवाणीवरील बातम्यांनी जागृत वाचक ‘अपडेट’ असतो. त्याला पुन्हा सकाळी त्याच बातम्या वाचायची सक्ती केल्यास तो त्याच्यावर अन्याय ठरेल. मग ‘खास’ बातम्या आणायच्या कुठून? हा प्रश्न कोणत्याही बातमीदाराला पडू नये! त्याला बातमीचा, घटनेचा किंवा प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या माहिती हक्क कायद्याचा पदर धरून पाठपुराव्यासह पुढे जावे लागेल.
काही वृत्तपत्रांचे बातमीदार नेहमीच्या घटना घडामोडींच्याच बातम्या देण्यात सार्थक मानतात. पण नेहमीच्या बातम्या देणार्या बातमीदारापेक्षा ‘वेगळी’ बातमी देणारा बातमीदारच कौतुकाचा धनी ठरतो. अर्थात, असे करण्यासाठी वृत्तपत्राजवळ बातमीदारांची संख्याही पुरेशी हवी. तसे नसेल तर मग असे वृत्तपत्र वाचकांना वेगळे असे काय देणार?
वाचकांच्या नेमक्या काय अपेक्षा असतील याचा अंदाज मी स्वतः वाचक या नात्याने घेतला. सर्वच वृत्तपत्रांत तेच वाचायला मिळत असेल, तर मग एखादेच वृत्तपत्र वाचलेले बरे, दोन चार वृत्तपत्रे का घ्यायची, असा विचार वाचक करतो.
काही चटपटीत वाचायला वाचकांना आवडते, त्याचबरोबर विचारप्रवर्तक लेखही आवडतात. आज काल लांबलचक लेख वाचायला वाचकांना वेळ नसतो. जुने संदर्भ देत, कुठून तरी उतारे घेऊन वाचकांच्या गळी आपला विचार उतरविण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. त्याऐवजी वर्तमानातील ज्वलंत घटनेवर टिप्पणी करणे, तीही मर्यादित शब्दांत आणि सुटसुटीत शैलीत हा आजचा ट्रेंड बनला आहे. असे काही आपण वाचकांना देतो का, याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी आठवड्यातून दोन तीन पुरवण्या देण्याचा उपक्रम स्वागतार्ह ठरतो. असे असले तरी बातम्यांचे काय? नावीन्यपूर्ण बातम्या, विशेष बातम्या दिल्या जातात का?
वृत्तपत्रे केवळ घटनांच्या बातम्याच देण्यासाठी आहेत का? त्यात ‘बात’ असावीच, पण ‘मी’ ही असावा. मतप्रदर्शन करीत लिहिलेल्या बातम्या आजकाल अधिक चवीने वाचल्या जातात. बातमीचा सूर कसा आहे, त्यावरही वाचकांचे लक्ष असतेच. केवळ सरकारची री ओढणार्या बातम्या देणारी वृत्तपत्रे चालत नाहीत. जनतेला आपल्या समस्या पोटतिडकीने मांडणारी वृत्तपत्रे जशी आवडतात, तशी आपल्या गावची बातमी देणारी वृत्तपत्रे त्याहून अधिक लोकप्रिय ठरतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बातम्यांचाही एक वाचकवर्ग आहे, याकडे वृत्तपत्रांनी कानाडोळा करू नये. अमूक एक बातमी दिल्यास आपल्या जाहिराती कमी होतील, अशी चिंता करण्यापेक्षा सत्य जनतेसमोर आणून सरकारला जेरीस आणणारी वृत्तपत्रे अधिक संख्येने वाचली जातात. सरकार कोणत्या पक्षाचे आहे, याची सामान्य जनतेला फिकीर नसते. त्या सरकारवर होणारी टीका खरी आहे, आपल्या भावना व्यक्त करणारी आहे, असे ज्यावेळी वाचकाला वाटते, त्यावेळी ते वृत्तपत्रही त्याला आपलेच वाटते.
सरकारी कार्यालयांतील कारभार किती सुधारला आहे, सोपस्कार, हेलपाटे किती कमी झाले आहेत, याची वाच्यता वृत्तपत्रांनी करायला हवी. त्यासंबंधीची वस्तुस्थिती मांडायला हवी. बातमीदार त्यासाठी कार्यालयात बसायला हवा, त्याने तेथील निरीक्षण करायला हवे. संबंधितांचे म्हणणे जाणून घेणे ही पुढची पायरीही त्याने चढायला हवी. पत्रकारांना हे सारे शक्य होते का, याचा विचार वाचकांनी का करावा? सुरवातीस म्हटल्याप्रमाणे पत्रकारितेकडून अनेक अपेक्षा आहेत, त्यासाठी पत्रकार मुळात सक्षम आहेत का हेही पाहणे आवश्यक ठरते. बातमीदाराच्या अज्ञानामुळे काही चुका घडतात, त्या बातम्या संपादित करण्याची यंत्रणा ‘उपसंपादक’ या नावाने सर्वच कार्यालयांमध्ये असते. तरीही जर चुकीचे प्रसिद्ध झाले तर? त्याची जबाबदारी मग संपादकांवरही येते.
मध्यंतरी आपल्या एका नेत्याने पत्रकारांना ‘बिनडोक अथवा अर्धेकच्चे’ अशी विशेषणे लावली. पत्रकारितेतील कोणता अभ्यासक्रम गोव्यात राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे, असा रोखठोक प्रश्न मात्र कोणी त्यांना विचारला नाही! पत्रकारांना ‘सुपीक डोके’ उपलब्ध करून देण्याची सुविधा या राज्यात नाही, हे खरे ना? आपली कुवत आणि धडपड यातून तयार झालेले पत्रकार सध्या उपेक्षेचे धनी बनले आहेत, हे जरी खरे असले तरी वाचकांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पत्रकारितेवर आहे, हे कोणीही नाकारू नये, असे एक वाचक या नात्याने मला वाटते.