पतीच्या खून प्रकरणी पत्नीसह प्रियकर अटकेत

0
19

>> कोलवा पोलिसांची बेळगाव येथे कारवाई

पेडा-बाणावली येथे एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या विश्वनाथ सिदाल (35) याचा निर्घृण खून केल्या प्रकरणी कोलवा पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांना काल बेळगाव येथे अटक करण्यात आली. मृताच्या पत्नीचे नाव मंगला उर्फ वैभवी सिदाल (27) असे असून, तिच्या प्रियकराचे नाव सूरज म्यागेरी असे आहे. दोन्ही संशयितांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विश्वनाथ आणि वैभवी हे पती-पत्नी बाणावली येथील जुझे रोमन फर्नांडिस यांच्या भाड्याच्या खोलीत राहात होते. विश्वनाथ सिदाल याचे आई-वडील मुंगूल-फातोर्डा येथे राहतात. ते मूळ लोंढा येथील आहेत. मुलाच्या खुनाची घटना समजातच वडील शंकर सिदाल यांनी कोलवा पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली.

लग्नापूर्वीपासून मंगला उर्फ वैभवीचे सूरजवर प्रेम होते. लग्नानंतरही त्यांचे संबंध होते आणि या विषयावरून ती वारंवार पतीशी भांडत असे. सूरज हा देखील विवाहित असून, त्याचे एका दिव्यांग मुलीशी लग्न झाले होते. सहा महिन्यांपासून पतीचा काटा काढण्यासाठी ती मोहीम आखत होती. त्यासाठी 25 मार्चचा दिवस दोन्ही संशयितांनी निश्चित केला. त्या दोघांनी विश्वनाथच्या डोक्यावर लोखंडी सळईने प्रहार केला, तसेच उजवा डोळा फोडला. खून केल्यानंतर दोघांनीही दुचाकीवरून बेळगाव येथे पलायन केले.
या खुनाच्या प्रकरणात संशयितांच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी पोलिसांच्या चार तुकड्या बनवल्या. त्यापैकी दोन कर्नाटकात पाठवल्या, तर दोन गोव्यात नेमून तपासास सुरुवात केली. कोलवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी अधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.