पणजी स्मार्ट सिटीच्या कामांच्या दर्जाची जबाबदारी सल्लागाराचीच

0
16

>> राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या बैठकीत सल्लागार, कंत्राटदारांना तंबी

राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी काल पणजी स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या कंत्राटदार, सल्लागार व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सध्या जी कामे चालू आहेत, ती 31 मेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा आदेश कंत्राटदारांना देण्यात आला. तसेच चालू कामे पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यातील कामे हाती घेण्यात यावी, असा सल्ला देण्यात आला. स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची झाली, तर सल्लागारांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.

स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांची ‘वन टू वन’ अशी बैठक घेण्यात आली आणि त्यांना काम कसे करावे आणि ते कधीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली. या बैठकीला पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडटचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका अभियंते, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, तसेच अन्य खात्यांतील अधिकारीही उपस्थित होते.

सध्या जी मलनिस्सारण वाहिन्यांची कामे चालू आहेत, ती पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे कंत्राटदारांना कळवण्यात आले आहे. सध्याची कामे पूर्ण करण्यास विलंब झाला, तर पुढील कामांनाही विलंब होणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले, असे बाबूश मोन्सेरात यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्मार्ट सिटीच्या कामांबाबत सल्ला देण्यासाठी सल्लागारांना मोठी रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी कामे चांगल्या दर्जाची झाली आहेत की नाहीत, याची तपासणी करणे आवश्यक आहे. कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यापूर्वीच सल्लागारांनी कामांची तपासणी करायला हवी. तसेच कामांचा दर्जा घसरला तर कंत्राटदारांची बिले मंजूर करता कामा नयेत, असे मोन्सेरात म्हणाले. कामांच्या दर्जाबाबत आताच काही सांगता येणार नाही. त्यासाठी पावसाळा जावा लागेल. कामे निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास सल्लागारांची बिले आम्ही रोखणार. तसेच सल्लागारच या गोष्टीला थेट जबाबदार असतील. 31 मे पर्यंतच्या मुदतीत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होतील, यासाठी पाठपुरावा करणे एवढेच आपले काम आहे. मुख्य सचिवांनी सर्व कंत्राटदारांना कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

मोन्सेरात यांनी पुन्हा हात झटकले
स्मार्ट सिटीची कामे हलक्या दर्जाची झाली, तर सल्लागारांनाच जबाबदार धरावे लागेल. कारण त्यांच्या सल्ल्यासाठी त्यांना मोठी रक्कम अदा करण्यात आली आहे. आपले काम हे केवळ पणजीतील स्मार्ट सिटीची कामे मे महिन्याच्या 31 तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा हे आहे, असे सांगत पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या कामांच्या दर्जाची जबाबदारी घेण्याचे टाळत हात झटकले. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीच्या झालेल्या दुर्दशेबाबत दिवंगत मनोहर पर्रीकरांना जबाबदार धरणारे मोन्सेरात हे स्वत: विद्यमान आमदार असूनही जबाबदारी घेण्याचे टाळत असल्याने लोकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याची सूचना
सर्व कामे 31 मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदत निश्चित केली आहे. वेगवेगळे कंत्राटदार वेगवेगळी कामे करत आहेत. कोणी भूमिगत मलनिस्सारण वाहिन्यांचे, तर कोणी अन्य काम करत आहे. वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचे काम हाती घेता येणार नाही. त्यामुळे वाहिन्या टाकणाऱ्या कंत्राटदारांना निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे बाबूश मोन्सेरात म्हणाले.